नोकऱ्यांसाठी पैशांच्या प्रकरणाने घेतले गंभीर वळण
पणजी,दि.२८(प्रतिनिधी)-
सरकारी नोकऱ्यांच्या नावाने अनेकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेल्या पुजा नाईक उर्फ रूपा पालकर हीच्याकडे अलिशान गाड्या तर सापडल्या आहेतच परंतु तिने ९ ते १० वेळा विदेश दौरे केल्याचीही माहिती आता समोर आली आहे. आपल्या घरी कुणाला तरी घेऊन आली असता पुजा हीच्यावर संशय आल्याने तिला अटक करून दिली होती, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सनसनाटी उडवली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीत पुजा नाईक हीच्याकडे सुमारे ५० हून अधिक अर्जांच्या प्रती सापडल्या आहेत. तिने आत्तापर्यंत केलेल्या व्यवहारांत किमान २ कोटी रूपयांचा व्यवहार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आपेव्हाळ- प्रियोळ येथील गुरूदास गावडे यांच्या दोन मुलांना नोकरी देतो असे सांगून तिने ठकवल्यानंतर पोलिस तक्रार दाखल झाली आणि या प्रकरणाचा भांडोफोड झाला. या घटनेनंतर अशा तऱ्हेने पैसे देऊन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी आता पुढे येऊन तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली आहे. अशाच तक्रारीवरून फोंडा तालुक्यातील सागर सुरेश नाईक हा पोलिस शिपाई आणि प्रकाश मुकुंद राणे या पशुचिकीत्सकालाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनीही वेगवेगळ्या प्रकरणांत ५० लाखांहून अधिक रकमेला ठकवल्याची माहिती समोर आली आहे.
५ कोटींच्या प्रकरणाचे काय झाले ?
मागील वर्षी सर्वण डिचोली येथील समीर धावस्कर आणि दिनकर सावंत यांच्याविरोधात सुमारे ३१ लोकांनी सरकारी नोकरी, भूखंड तथा पंचतारांकित हॉटेलांत गाड्या भाड्याने लावण्याच्या बहाण्याने सुमारे ५ कोटी रूपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण घडले होते. या दोघांवर गुन्हा नोंद होऊन आरोपपत्रही जारी झाले होते. या प्रकरणाचे नेमके काय झाले, याचीही माहिती सरकारने जनतेसमोर ठेवावी,अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
तक्रारदारांनी पुढे यावे
सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेऊन लोकांना गंडा घातल्याची प्रकरणे असतील तर तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केली आहे. नोकऱ्यांसाठी पैसे देणे हा देखील गुन्हा ठरतो हे खरे असले तरी नोकऱ्यांसाठी रोख रकमेच्या व्यवहारांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसून आल्याने लोकांची अधिक फसवणूक होऊ नये, यासाठी पोलिसांनी तक्रारदारांना निर्धास्तपणे पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे
पोलिस चौकशीत पुजा नाईक हीच्या मोबाईलवर दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नंबर आढळून आले आहेत. तिने दिलेल्या जबानीत आपण दोन अधिकाऱ्यांना हाताशी धरून दोन नोकऱ्या दिल्याचेही म्हटले आहे. या प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी होईल,असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज दक्षता सप्ताहानिमित्त कार्यक्रमांत बोलताना सांगितले. सुमारे २ कोटींना ठकवल्याचा अंदाज