
भ्रष्टाचारासोबत अनैतिकतेचा शिरकाव होऊ लागल्यामुळे यातून पवित्र होण्यासाठी कुंभमेळ्यात जाऊन स्नान करून चालणार नाही, तर बी.एल.संतोष यांना पूर्णतः पक्षाचे शुद्धीकरण करावे लागणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल.संतोष पुढील आठवड्यात गोव्यात येणार आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामोदर नाईक यांनीच त्यासंबंधीचे सुतोवाच केले आहे. संघटनात्मक बाबतीत संतोषजी यांचा हातखंडा असल्याने त्यांना पक्षात आदराचे स्थान आहे. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ डॉ. प्रमोद सावंत यांच्या गळ्यात घालण्यासंबंधीच्या निर्णयात त्यांचा सिंहाचा वाटा होता, असे म्हटले जाते. त्यांची निवड ही पक्की होती हे नंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी सिद्ध करून दाखवलेच. आता मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाबरोबरच राज्यातील भाजपच्या संघटनात्मक रचनेवर सखोल चर्चा करून २०२७ च्या विधानसभेसाठी भाजपला सज्ज करण्याचे काम ते करणार आहेत.
कुठल्याही राजकीय पक्षासाठी सत्ता महत्त्वाची असते. नितीमत्तेच्या गोष्टी ठरावीक काळासाठी सांगता येतात परंतु सत्ता नसेल तर काहीच शहाणपण नाही. केवळ एका मताने अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळले होते, आज त्याच भाजपकडे तिसऱ्यांदा केंद्राची सत्ता हाती आली आहे, हे केवळ सत्तेमुळेच घडू शकले. गोव्यात परिवर्तन घडविण्याचा शब्द देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची २०१७ च्या निवडणुकीत घसरण झाली. तरीही राजकीय डावपेचाच्या बळावर भाजपने सत्तेवर पकड ठेवली. ह्याच काळात सरसकट विरोधकांच्या आयातीचा धंदा तेजीत सुरू झाला आणि आजतागायत तो सुरू ठेवूनच भाजपने सत्तेवर आपली पकड घट्ट केली आहे. हे करत असताना आपल्या मूळ कार्यकर्ते, नेत्यांवर अन्याय झाल्याचे अजिबात दुःख पक्षाला नाही कारण सत्ता नसती तर या मूळ कार्यकर्ते आणि नेत्यांना देखील कुणी विचारले नसते. सत्तेसाठी हे सगळे करावे लागते हे एकवेळ ठीक असले तरी गरजेबाहेर काही लोकांचे इतके चोचले पुरवले जात आहेत की त्यामुळे पक्षाची आणि सरकारची बेईज्जती होईपर्यंत तडजोडीची खरोखरच गरज आहे का, हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे.
गोव्याच्या राजकारणात काही उपद्रवी नेते आहेत. या नेत्यांना सत्तेबाहेर ठेवले तर सत्तेतील सरकारला झोप लागू देत नाहीत. आर्थिक ताकदीच्या बळावर सत्तेतील सरकारला नामोहरम करण्याची कारस्थाने त्यांच्याकडून सुरूच असतात. ह्याच मुळे भाजपने अशा उपद्रवी नेत्यांना सरसकट आपल्या पक्षात आणून सत्तेवर बसवले आहे. या नेत्यांना इतकी मोकळीक दिली आहे की ते कुणालाही जुमानत नाहीत. त्यांच्या काँग्रेसच्या सरकारात जितका त्यांचा शब्द चालत नव्हता तितके स्वातंत्र्य त्यांना भाजपने दिल्यामुळे भाजपच्या प्रतिमेला आणि एकूणच नितिमत्तेला कलंक लागल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचारासोबत अनैतिकतेचा शिरकाव होऊ लागल्यामुळे यातून पवित्र होण्यासाठी कुंभमेळ्यात जाऊन स्नान करून चालणार नाही तर बी.एल.संतोष यांना पूर्णतः पक्षाचे शुद्धीकरण करावे लागणार आहे. या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव नसेल असे अजिबात म्हणता येणार नाही. त्यांची संघटनात्मक रचना इतकी मजबूत आहे की इथे काय काय चालले आहे, याची इत्यंभूत माहिती त्यांना पोहचत असते. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर भाजपात अनपेक्षीत निर्णय क्षणात होत असतात हे आपण अनेक राज्यांत पाहीले आहे.
संघटनात्मक फेररचनेसह मंत्रिमंडळ फेररचना आणि खातेबदलांचीही चर्चा सुरू आहे. सरकारातील काही मंत्री हे पूर्णतः अज्ञातवासात असल्यागत वावरत आहेत. या मंत्र्यांचा सर्वसामान्य जनतेशी काहीच संबंध नाही. अशा लोकांना आत्ताच बाजूला काढण्याची ही वेळ आहे. या व्यतिरीक्त काही जुन्या लोकांना पुन्हा पक्षात सक्रीय करण्याचीही योजना असू शकते. बी.एल.संतोष यांची ही भेट नक्कीच काहीतरी ठोस बदल घडवणारी ठरेल,असा विश्वास भाजपातील काही नेते व्यक्त करत आहेत हे मात्र नक्की.