
मुळापासूनच आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांना पाऊले टाकावी लागतील, तरच त्यांच्या प्रयत्नांची खऱ्या अर्थाने चीज होईल.
कर्करोगासारख्या आजारामुळे एखादे कुटुंब केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही उध्वस्त होते. हा आघात सहन करणे अनेकांना कठीण होऊन जाते. विशेषतः युवा वयात जेव्हा या आजाराचे निदान होते, तेव्हा अशा पीडित कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकते. या आजारातून आपली व्यक्ती वाचू शकत नाही हे कळूनही शेवटपर्यंत अशा व्यक्तीचा श्वास चालू ठेवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारी कित्येक कुटुंबे आपल्या अवतीभोवती असतील. राज्य सरकारने अलिकडे राज्यभरात कर्करोग निदान शिबिरांचे आयोजन करण्याचा सपाटाच सुरू केला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ही शिबिरे आयोजित केली जातात. उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी अशा शिबिरांसाठीचे मोबाईल वाहन उपलब्ध करून दिले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर जगदीश काकोडकर यांच्याकडे या शिबिरांचे नोडल अधिकारीपद बहाल करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नव्या रुग्णांचे निदान झाल्याने त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य झाले आहे. कर्करोगाबाबत वेळीच निदान झाल्यास उपचारातून या रोगावर मात करणे शक्य आहे.
आपल्या राज्यात महिलांतील स्तनकर्करोगाचे प्रमाण गंभीर आहे. या व्यतिरिक्त ग्रामीण भागांत पान, तंबाखूमुळे तोंडाच्या कर्करोगाचीही प्रकरणे आढळून येत आहेत. या व्यतिरिक्त कर्करोगाशी संबंधित विविध प्रकारच्या रुग्णांचा शोध घेण्यात या जागृतीमुळे आणि शिबिरांमुळे सोपे बनले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात टाटा मेमोरियल इस्पितळाच्या सहकार्यातून कर्करोग उपचाराची सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त स्पेशल कर्करोग इस्पितळाची उभारणीचे काम जोरात सुरू आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी याबाबतीत स्वतः विशेष रस दाखवला आहे. कर्करोगाचे गांभीर्य काय असते हे त्यांनी स्वतःच्या कुटुंबात पाहीले आहे आणि त्यामुळे याबाबतीत ते अत्यंत संवेदनशील आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हृदयरोग विभागाची यशोगाथा तर यापूर्वीही अनेकांनी सांगितली आहे. या विभागाबाबतही विश्वजीत राणे यांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल. एकीकडे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावत असताना जिल्हा इस्पितळे आणि सामाजिक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत सरकारची अनास्था हा चिंतेचा विषय ठरला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री या नात्याने विश्वजीत राणे यांनी चालवलेल्या कामाचे कौतुकच करावे लागेल. अर्थात टीकाकारांना हे कदाचित सहन होणार नाही. परंतु आजच्या घडीला विश्वजीत राणे हेच आरोग्यमंत्रीपदासाठी पात्र नेते आहेत, हे त्यांचे टीकाकारही नाकारू शकणार नाहीत. कोविडच्या काळात झालेले त्रास, अडचणी आदींचा विषय देशभरात होता. तरीही ते आव्हान आरोग्य खात्याने स्वीकारून लोकांना वाचवले ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. कर्करोगाने त्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासंबंधी सरकार विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारी इस्पितळांत परवडणाऱ्या दरांत केअरटेकरची व्यवस्था करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. रुग्णाश्रयासारख्या संस्थांकडून केअरटेकरचे प्रशिक्षण दिले जाते. या मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. गोवेकरांसाठी आणि विशेष म्हणजे कमी शिक्षण असलेल्यांसाठी योग्य कौशल्ययुक्त प्रशिक्षणातून ही कमतरता दूर केली जाऊ शकते तसेच रोजगाराची एक मोठी संधीही उपलब्ध होऊ शकणार आहे.
मये येथील आरोग्य शिबिरातील घोषणेनंतर चर्चेत आलेले विश्वजीत राणे यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळात आकस्मिक भेट देऊन सर्वांनाच चकीत केले. तिथे तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. राज्यभरातील आरोग्य व्यवस्था ठीकठाक करण्यासाठी त्यांना असेच सतर्क राहावे लागणार आहे. मुळापासूनच आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांना पाऊले टाकावी लागतील, तरच त्यांच्या प्रयत्नांची खऱ्या अर्थाने चीज होईल.