उसगांव-तिस्क येथील राणे समर्थकांचा इशारा
गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)
“बाबांच्या वाटेला जाल तर खबरदार!” असा इशारा नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या समर्थकांनी विरोधकांना दिला आहे. नगर नियोजन कायद्यातील कलम ३९(ए) विधानसभेने मंजूर केल्यानंतरच कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे या कायद्याचे पालन करून नगर नियोजन खाते प्रकरणे हाताळत असताना, केवळ विश्वजीत राणेंनाच जबाबदार धरणे योग्य नाही, असा सवाल उसगांव–तिस्क येथील त्यांच्या समर्थकांनी केला. आझाद मैदानावरील आंदोलनावेळी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची टीका करत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला.
दोनापावला येथील राणे यांच्या खाजगी बंगल्यावर मोर्चा, आंदोलकांकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह घोषणा आणि वैयक्तिक टीकेमुळे समर्थक संतापले. वाळपईत शक्तीप्रदर्शन करून भव्य बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न झाला, मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने उसगांव–तिस्कवासीयांनी पुढाकार घेतला. त्यांनी मोठी गर्दी करून राणेंना भक्कम साथ असल्याचे दाखवले.
मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष शरसंधान
राणे समर्थकांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. आंदोलकांनी आझाद मैदानावरून दोनापावला येथे मोर्चा नेण्याची घोषणा केली तेव्हा तो मोर्चा अडवण्यात पोलिस अपयशी ठरले, असा सवाल त्यांनी केला. मोर्चादरम्यान राणेंवर झालेल्या वैयक्तिक टीका, अपमान आणि शिव्यांचा वर्षाव सुरू असताना पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका अस्वीकारार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी आरोप केला की कुणीतरी आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राणेंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. विधानसभेत मंजूर झालेल्या कायद्याचे खापर केवळ एका मंत्र्यावर फोडून त्यांची बदनामी करणे म्हणजे षडयंत्रच असल्याचे त्यांनी म्हटले.
या बैठकीत माजी सरपंच रामनाथ डांगी, तुळशीदास प्रभू आणि उसगांव–गांजेच्या जिल्हा पंचायत सदस्य सौ. समिक्षा नाईक उपस्थित होते.
……………………………………………………………
आमदार जीत आरोलकर यांची
दोन खाजगी विधेयके सादर
गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी नगर नियोजन कायद्यातील कलम ३९(ए) अंतर्गत झोन बदल आणि भूरूपांतराला तीव्र हरकत घेतली आहे. या अनुषंगाने त्यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात दोन खाजगी विधेयके सादर केली आहेत.
आरोलकर यांनी नगर नियोजन कायद्यातील कलम ३९(ए) मध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक खाजगी विधेयक आणि संवेदनशील क्षेत्र संरक्षणासाठी स्वतंत्र खाजगी विधेयक सादर केले आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन रिबेलो यांनी तयार केलेल्या कृषी जमीन संरक्षण विधेयकाचा मसुदा खाजगी विधेयक म्हणून सादर केला आहे. तसेच आमदार विरेश बोरकर आणि आमदार जीत आरोलकर यांनी आपापली स्वतंत्र खाजगी विधेयके विधानसभेत मांडली आहेत.
सरकारकडून यापैकी कोणती विधेयके मान्य केली जातात आणि किती विधेयके चर्चेसाठी येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आरोलकर यांनी स्पष्ट केले की कलम ३९(ए) चा सर्वात मोठा फटका पेडणे तालुक्याला बसला आहे आणि याबाबतीत आपण गप्प बसणार नाही.





