बहुजनांचे ‘पात्रांव’ रवी नाईक यांचे निधन

तीन दिवसांचा दुखवटा; सार्वजनिक सुट्टी जाहीर


गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)

राज्याचे कृषीमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी खासदार आणि बहुजन समाजाचे लोकप्रिय नेते रवी नाईक यांचे मंगळवारी रात्री ११.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ‘बहुजनांचे पात्रांव’ म्हणून ओळखले जाणारे रवी नाईक यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
मंगळवारी त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. फोंडा नगरपालिकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाची बातमी पसरताच राज्यभरातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सकाळपासून त्यांच्या खडपाबांध येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा लपेटून विशेष मानवंदना देण्यात आली.
रवी नाईक यांच्या जाण्याने बहुजन समाजाचा एक मोठा आधार हरपला आहे. “बहुजनांची एकजूट हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा भावना राज्यभरातून व्यक्त होत आहेत.

राजकारणातील चढ-उतारांना समर्थपणे तोंड दिले
रवी नाईक यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले. मोटरसायकल पाटलट आणि तावेर्न चालवणारे रवी नाईक सामाजिक कार्यामुळे १९७६ साली फोंडा नगरपालिकेचे नगरसेवक बनले. त्यानंतर मगो पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
१९८० साली त्यांनी मगोच्या उमेदवारीवरून फोंडा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली, मात्र अवघ्या ७०० मतांनी काँग्रेसचे ज्योएल्डो आगीयार यांनी त्यांचा पराभव केला. १९८४ मध्ये त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर १९८९, १९९९, २००२, २००७, २०१७ आणि २०२२ अशा सात वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. तीन वेळा पराभव होऊनही त्यांनी हार मानली नाही. सहा वेळा फोंडा आणि एकदा मडकई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. सुरूवातीला मगो, काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला.
१९९८ मध्ये ते काँग्रेसचे उत्तर गोव्याचे खासदार झाले. २५ जानेवारी १९९१ ते १८ मे १९९३ या कालावधीत ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. नंतर केवळ सहा दिवसांसाठीही त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. गोव्याच्या राजकीय इतिहासात भंडारी समाजाचे एकमेव मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.
मुंडकारांना संरक्षण देणारा कायदा आणण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. आदिवासी समाजाला इतर मागासवर्गात समाविष्ट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कुळ-मुंडकारांना जमीन हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शांत, सुहास्य आणि धूर्त राजकारणी अशी त्यांची ओळख होती. राजकारणात अनेक आरोपांचा सामना करत त्यांनी आपला तोल कायम राखला.

तीन दिवसांचा दुखवटा आणि अंत्यसंस्कार
रवी नाईक यांच्या निधनानंतर राज्य सरकारने १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, बुधवार १५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बुधवारी संध्याकाळी ४ वाजता खडपाबांध येथे त्यांच्या खाजगी जमिनीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांना विशेष पोलिस मानवंदना दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या संदेशात त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा, पुत्र रितेश आणि रॉय, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे.

  • Related Posts

    Congress Reviews Goa Political Situation, Begins Strategy for Ponda By-Poll and 2027 Elections

    Panaji: The Goa unit of the Indian National Congress held a strategic meeting at the AICC headquarters to discuss the political situation in the state and plan the party’s roadmap…

    MoUs Signed to Strengthen School Education in Goa

    Panaji: Chief Minister Pramod Sawant chaired the signing of two Memorandums of Understanding (MoUs) aimed at strengthening school education in Goa through institutional collaboration. Under the Dempo Vishwa Gramshala Initiative,…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…