पार्सेकरांच्या काळातील प्रकल्प आणि नोकऱ्यांचीही थट्टा
पणजी,दि.१०(प्रतिनिधी)
राज्यात भाजप पक्षाच्या उभारणीत महत्वाचे योगदान दिलेले, पक्षाचे दोन वेळा प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस तथा सरकारात माजी आरोग्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री राहीलेले लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याप्रती भाजप बराच खफा असल्याचेच दिसून येत आहे. पार्सेकरांच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प तसेच त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकरभरतीतील सरकारी कर्मचाऱ्यांची सतावणूक भाजप सरकारकडूनच सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
तुये इस्पितळ प्रकल्प रेंगाळला
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस पदांच्या संख्येत वाढ करताना त्यासाठी तुये येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालय संलग्नीत इस्पितळ उभारण्याचा प्रकल्प त्यांनी मंजूर करून घेतला होता. मंडुर प्रमाणेच हे इस्पितळ थेट गोमेकॉशी संलग्नीत असेल आणि त्यामुळे उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाचा भार कमी होऊन पेडणे, डिचोली, सत्तरी आदी तथा गोव्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांचीही सोय होऊ शकली असती. २०१७ च्या निवडणूकीत ते पराभूत झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या त्यांच्याच भाजप सरकारने तुये इस्पितळासहित, इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प गुंडाळून ठेवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत बरीच नाराजी पसरली आहे.
पार्सेकरांच्या काळातील नोकरदारांची छळवणूक
लक्ष्मीकांत पार्सेकर हे आरोग्यमंत्री आणि तदनंतर मुख्यमंत्री असताना त्यांनी आरोग्य खात्यात आणि विशेष करून गोवा वैद्यकीय महाविद्यालय, मानसोपचार इस्पितळात पेशंट अटेंडंट आणि एमटीएस पदांवर भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नोकरीत कायम करण्यात आलेले नाही. त्यांच्यानंतर झालेल्या भरतीतील पदांचा कायम नोकरीसाठी विचार झाला. गेली दहा वर्षे हे लोक कंत्राटी पद्धतीवर काम करत असून त्यांचे कुणीच म्हणणे एकून घेत नाही. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यापर्यंत त्यांनी हा विषय पोहचवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फुकाची सहानुभूती दाखवतात परंतु अद्याप काहीच करत नाहीत,अशी तक्रार त्यांनी केली आहे.
पार्सेकरांसहित सर्वांच्या ‘फाईल्स’?
भाजप पक्षावर सध्या आयात केलेल्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कब्जा मिळवला आहे. अलिकडेच मंडळ अध्यक्ष निवडीतही त्यांनी बाजी मारली आहे. अशावेळी पक्षाचे जुने नेते आणि कार्यकर्ते बरेच नाराज आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असल्याने उघडपणे नाराजी व्यक्त करणे परवडणारे नसल्याने ते गप्प आहेत. २०२२ च्या निवडणूकीत पार्सेकरांनी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी दाखल केली. ते पक्षात नाहीत हे जरी खरे असले तरी एका फटक्यात त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान विसरता येणे शक्य आहे काय,असा सवाल त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. पक्षातील मुळ नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील असंतोषाला पार्सेकर सारख्या नेत्यांनीच वाट मोकळी करून देण्याची गरज आहे,असेही अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पार्सेकरांसहित सर्वांच्यात फाईल्स पक्षाकडे आहेत आणि त्यामुळे कुणीच ब्र काढणार नाही,असा दावा पक्षाचे काही पदाधिकारी आणि नेते करताना दिसतात.