
एकंदरीत एनकेन डॉ. सावंत यांना या पदावरून हटविण्याच्या हालचाली कुणीतरी सरकारात छुप्या पद्धतीने करत असले तरी दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी तयार केलेले आपले वलय आणि त्यांचे होणारे आदरातिथ्य हे काहीजणांची पोटदुखी ठरली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अचानक दिल्लीत पोहोचतात काय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेतात काय, हा विषय सर्वांनाच चकित करणारा ठरला आहे. अशी काय परिस्थिती उद्भवली की त्यांना तातडीने दिल्लीत जावे लागले आणि हे फोटोसेशन करून घ्यावे लागले. वेगवेगळ्या भेटींबाबत विविध विकासकामे, राज्याला पाठींबा वगैरे वगैरे काहीबाही निरर्थक कारणे दिली गेली ती सर्वसामान्य लोकांना हजम होणे अशक्य आणि त्यामुळेच या भेटींचे नेमके प्रयोजन काय, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाला अलिकडे पक्षांतर्गत आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारातील दोन क्रमांकाचे नेते आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. तरीही काँग्रेसप्रमाणे सहज मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची संस्कृती भाजपात नसल्याने राणे यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. विश्वजित राणेंमुळे सत्तरीत कमळ फुलले. लोकसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक यांच्या मतदानयंत्रात भरभरून मते पडली. पक्ष सदस्य मोहिमेत केवळ सत्तरी तालुक्यातच ५० हजार सदस्य नोंदणीचा विक्रमही गाठला. या सर्व गोष्टींचा लाभ भाजपला भविष्यातही मिळणार आहे हे पक्ष जाणून आहे परंतु काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या विश्वजित राणेंच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढवण्याचा धोका ते पत्करणार काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
केंद्रातील आपल्या नातेसंबंधांचा वापर करून विश्वजित राणे यांनी नकळतपणे भाजपात प्रवेश मिळवला. स्व. मनोहर पर्रीकर यांनी स्वतः ते मान्य केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या खास मर्जीतील असल्याची प्रतिमा त्यांनी आपली बनवली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीविना थेट दिल्लीत पंतप्रधानांची भेट ही राजशिष्टाचारात बसत नाही परंतु विश्वजित राणे हे एकच मंत्री आहेत ज्यांना हे विशेषाधिकार प्राप्त आहेत, हेच त्यांनी आपल्या दिल्ली भेटीवरून सिद्ध करून दाखवले.
सरकारातील विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यातील अंतर्गत स्पर्धा ही देखील आता सार्वजनिक झालेली आहे. हल्लीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या साखळी निवासस्थानी भागवत ज्ञान सप्ताहाचे आयोजन केले होते. विश्वजित राणे यांनी साखळीतच कारापूर येथील विठ्ठल मंदिरात भव्य भगवतगीता पारायण सप्ताहाचे आयोजन करून आपले श्रेष्ठत्व दाखवून दिले. या दोन्हींचा कदाचित संबंध नसेलही परंतु दोघांतील संघर्षामुळे आपोआप तो संबंध लावला जाणे क्रमप्राप्त आहे. मध्यंतरी राणे यांना हे पद मिळू शकत नसल्याने पर्यायी नावांचीही चर्चा सुरू झाली होती आणि त्यात विद्यमान केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे नाव पुढे आले होते. आर्लेकर यांनी या गोष्टीचा स्पष्ट नकार दर्शवला असला तरी जेव्हा मुख्य माध्यमांत हे वृत्त प्रसिद्ध झाले तेव्हा कुठेतरी पाणी मुरते आहे हेच दिसून येते. एकंदरीत एनकेन डॉ. सावंत यांना या पदावरून हटविण्याच्या हालचाली कुणीतरी सरकारात छुप्या पद्धतीने करत असले तरी दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी तयार केलेले आपले वलय आणि त्यांचे होणारे आदरातिथ्य हे काहीजणांची पोटदुखी ठरली आहे. तूर्त या पोटदुखीवर तात्काळ औषधोपचार करून त्यातून सुटका करून घेणेच उचित ठरेल अन्यथा तो आजार बळावण्याचा धोकाच अधिक दिसतो.