विजयबाब संयमाने घ्या…

सरदेसाई यांना श्रद्धा आणि सबुरी हे दोन मंत्र जपावे लागतील. हुळवारपणे आपली डागाळलेली प्रतिमा सुधारून फासे टाकले तरच ते राजकारणात विजयी ठरतील हे त्यांनी लक्षात ठेवावे.

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हीएगस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची तुलना गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी करून अप्रत्यक्ष सर्वांनाच धक्का दिला. अर्थात बाणावलीसारख्या मतदारसंघात भाऊसाहेबांशी तुलना करण्याचे आमदार वेन्झी व्हीएगस यांचे विधान हे खरोखरच कौतुकाचे होते की नकळतपणे मारलेला टोला होता हे काही समजू शकत नाही. पण काही का असेना सत्ताधारी आमदारातल्या ३२ पैकी एकाही आमदाराला मुख्यमंत्र्यांचे कौतुक करण्याचे धाडस झाले नाही, ते काम विरोधातल्या आमदाराने करून मुख्यमंत्र्यांचे लौकिक वाढवले हे महत्वाचे.

आमदार वेन्झी यांच्या या विधानामुळे अनेकांचे पित्त खवळले. सध्याच्या राजकीय दहशतीच्या वातावरणात पित्त खवळल्यानंतर ते व्यक्त करण्याची मुभा नाही. औषधोपचार करून ते गिळून टाकावे लागते. सरकारवरील टीका म्हणजे महापाप. मग सुडाचे राजकारणाचे चट्टे अनेकांनी सहन केले आहेत. मगो पक्ष सरकारचा घटक आहे. तिखट प्रतिक्रिया देणे अशक्य तरीही सुदीन ढवळीकरांनी भाऊसाहेबांशी कुणीही तुलना करू नये, असा सल्ला देऊन कमी तिखटमार्गाने आपली सुटका करून घेतली.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे स्वभावानेच असंयमी. आपल्या वक्तव्याने ते भाजपच्या फासात अडकले. भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची एलर्जी होती. डॉ. प्रमोद सावंत यांचे महाराष्ट्र कनेक्शन असे आरोप त्यांनी करून ओपिनियन पोलचा दाखला देत गोव्याच्या अस्मितेला हात घातला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी धूर्तपणे भाऊसाहेबांच्या अपमानाची ढाल पुढे करून आपला बचाव केलाच पण विजय सरदेसाई यांच्या फुगलेल्या अहंकारालाही डिवचले. शेवटी सरदेसाई यांना खुलासा करून भाऊसाहेबांप्रती आदर व्यक्त करून आपली सुटका करून घ्यावी लागली ह्यातच भाजपची सरशी स्पष्ट झाली.

गोवा फॉरवर्ड पक्षाने प्रादेशिक अस्मितेचा आधार घेऊन चांगली सुरूवात केली होती. पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. त्यांचे दोन आमदार हे उत्तर गोव्यातून निवडून आले. हे दोन्ही मतदारसंघ हे कधीकाळी मगोचे बालेकिल्ले होते. विजय सरदेसाई यांचे मोठेपण म्हणजे पहिल्यांदाच निवडून आलेल्या या दोन्ही बहुजन समाजाच्या आमदारांना त्यांनी मंत्रीपद मिळवून दिले. परंतु कालांतराने हे दोन्ही आमदार त्यांना सोडून गेले. बहुजन समाजाच्या नेत्यांचा तो एक कमजोर भाग आहेच. परंतु प्रादेशिक अस्मितेचा पाया असलेला पक्ष २०१७ मध्ये भाजपच्या दावणीला बांधण्याचा त्यांचा निर्णय आत्मघातकी ठरला. मनोहर पर्रीकरांच्या मोहाला ते बळी पडले. २१ जागांवरून फक्त १३ जागांवर घसरलेल्या भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याच्या पापाचे ते मुख्य धनी बनले. एवढेच नव्हे तर विजय सरदेसाई, सुदीन ढवळीकर, रोहन खवंटे आदींनी दिल्लीत पत्र पाठवून पर्रीकरांनाच मुख्यमंत्री करण्याची अट घातली होती. हा डाव त्यावेळी बहुजन समाजाने पचवला खरा परंतु पर्रीकर गेल्यानंतर हाच डाव उलटला. विजय, सुदीन आणि रोहन हे तीघेही सरकारातून बाहेर फेकले गेले. रोहन आणि सुदीन पुन्हा दाखल झाले पण विजय मात्र एकाकी पडले.

बहुजन समाजाचे कार्ड मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अत्यंत चालाखीने वापरले आहे. विजय सरदेसाई यांची टीका ही त्यांच्यासाठी कौतुकाची थापच ठरते हे विजय सरदेसाई समजून घेत नाहीत. राजकारणात संयम आणि रणनिती महत्वाची असते. भावनेच्या भरात घडलेले राजकारण मातीमोल होण्यास वेळ लागत नाही. सरदेसाई यांना श्रद्धा आणि सबुरी हे दोन मंत्र जपावे लागतील. हुळवारपणे आपली डागाळलेली प्रतिमा सुधारून फासे टाकले तरच ते राजकारणात विजयी ठरतील हे त्यांनी लक्षात ठेवावे.

  • Related Posts

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर पोलिसांकडे पुरेशी माहिती, मनुष्यबळ आणि स्वायत्तता असती, तर ‘एनएसए’चा आधार घ्यावा लागला नसता. गोव्यात नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅक्ट (रासुका) लागू करण्याचा निर्णय म्हणजे कायद्याच्या राज्यात गंभीर…

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

    निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक आहे, जेणेकरून आयोग या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल. लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नाही,…

    You Missed

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    06/11/2025 e-paper

    05/11/2025 e-paper

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग
    error: Content is protected !!