‘बुद्धी दे म्हणजे काय गे’ ?

पोट कसे भरायचे, स्वतःचे भले कसे करुन घ्यायचे ही बुद्धी आपल्यात उपजत भरलेली असते. पण ज्या बुद्धीची आपल्यात कमी असते, ती म्हणजे दुसर्‍याचा विचार करण्याची बुद्धी. स्वतःच्या स्वार्थाला मुरड घालून दुसर्‍याच्या भल्याचा विचार करणारी आणि तशी वागणूक निर्माण करणारी बुद्धी!’

बाबा शेतातून परतायला उशीर झाला तर दिवेलागणीला आई मला देवाच्या पुढ्यात घेऊन बसे. नेहमीची काही स्तोत्रे व मनाचे श्लोक ती माझ्याकडून म्हणून घेई. आणि शेवटी देवाकडे ‘बुद्धी दे’ म्हणून माग असे सांगे. ती सांगे तसे मी म्हणे. पण ‘बुद्धी दे’ म्हणजे ‘नक्की काय दे’ हे मला कळत नव्हते. एक दिवस मी तिला म्हणालो, ‘बुद्धी दे म्हणजे काय गे?’ माझ्या या प्रश्नावर ती हसली.
त्या दिवशी शिवरात्र होती. असे काही व्रत असेल त्यादिवशी ती त्या व्रताची कथा मला वाचून दाखवे. आमच्या घरात ‘संपूर्ण चातुर्मास’ नावाचे एक पुस्तक होते. त्यात वेगवेगळ्या अनुष्ठानांसोबत वेगवेगळ्या व्रतांविषयीच्या कथा होत्या. या कथांची सुरवात बहुधा ‘आटपाट नगर होते’ या शब्दांनी सुरू होई.
त्या दिवशी शिवरात्र असल्याने तिने मला शिवरात्रीची कथा वाचून दाखवायला सुरवात केली. कथा ऐकायला मला फार आवडे.
‘एका गावात एक व्याध रहात होता. शिकार करुन तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करी. एक दिवस तो शिकारीला रानात गेला. दिवसभर फिरुन देखील त्याला त्यादिवशी कोणतीच शिकार मिळाली नाही. काळोख पडत आला तसा तो जंगलातल्या पाठवठ्याजवळ आला. पाणवठ्यावर कोणी ना कोणी प्राणी येईल म्हणून तो पाणवठ्याशेजारच्या झाडावर चढून सावजाची वाट पहात बसला. रात्रीच्यावेळी एक हरिणी त्या पाणवठ्यावर पाणी प्यायला आली. तिला पाहून व्याधाने नेम धरला. पण त्याच्या हालचालीचा आवाज त्या हरिणीला आला. ती सावध होऊन आवाजाच्या दिशेने पाहू लागली. आपला वेध घेतला जाणार हे जाणून ती हरिणी म्हणाली, ‘व्याधा, मी तुझे सावज आहे. तू मला मारणार हे मला माहित आहे. पण तुला मी एक विनंती करते. माझी दोन पाडसे माझी वाट बघत माझ्या निवाऱ्याच्या ठिकाणी आहेत. मी त्यांना शेवटचं पाजून येते. तू काळजी करु नकोस, मी माझ्या पिल्लांची शपथ घेऊन सांगते, मी नक्की परत येईन. मग तू माझी शिकार कर.’ त्या शिकार्‍याला तिने काकुळतीने केलेली विनंती ऐकून दया आली. त्याने तिला जायला दिले आणि तो तिच्या परत येण्याची वाट पहात बसला. वेळ जसाजसा जाऊ लागला तसतसा तो व्याध बेचैन होऊ लागला. आपण त्या हरिणीवर विश्वास ठेवला हे चुकीचे झाले असे त्याच्या मनात आले. वचन दिले म्हणून कोणी मरायला परत येईल का? जीव वाचवण्यासाठी कोणीही आपल्या पोरांची खोटी शपथ घेणार नाही का? या संशयी विचारांनी तो बेचैन झाला. आपण बेचैन झालो की आपले हात जसे अस्वस्थ होतात तसे त्याचे हात अस्वस्थ झाले. ते त्या झाडाची पाने खुडू लागले. त्याच्या हातातून पाने खाली पडू लागली. योगायोग असा की तो बसला होता ते झाड बेलाचे होते आणि त्या झाडाखाली शंकराची पिंडी होती. तो सहज टाकत असलेली पाने त्या पिंडीवर पडत होती. आणि दुसरा योग असा की ती शिवरात्र होती.’
‘चुकून पडलेल्या पानांना पुजा कसे म्हणता येईल?’ मी विचारले.
‘तू दिव्याला चुकून हात लाव, नाहीतर जाणूनबुजून हात लाव, तुला चटका बसणारंच ना. तसेच हे आहे,’ ती म्हणाली.
तिकडे ती हरिणी तिच्या रहाण्याच्या ठिकाणी गेली. तिची पाडसे तिची वाट बघत होती. आईला बघून त्यांना आनंद झाला. ती उड्या मारत आईजवळ आली. आईने त्यांना चाटले. ती त्यांना शेवटचेच पाजायला आली होती. काही क्षणांनी ती त्यांच्यापासून कायमची दूर जाणार होती. आपण नसताना आपल्या पाडसांचे कसे होईल? त्यांना दूध कोण पाजेल? इतर हरिणी त्यांना पाजतील का? त्यांना मायेने कोण चाटेल? कोणी वाघ त्यांच्यावर चालून आला तर त्यांना कोण लपवेल? या विचारांनी तिचे काळीज भरुन आले. तिच्या डोळ्यात दाटलेले दुख पाडसांना जाणवले. ‘बाळांनो, मी नसेन तेव्हा एकमेकांना सांभाळून घ्या,’ ती आवंढा गिळत म्हणाली.
‘असं काय गं बोलतेस आई? तू नसशील असे कसे होईल. कितीही दूर गेलीस तरी उशीरा का होईना, तू परत येशीलंच ना!’ पाडसे म्हणाली.
आपल्या निष्पाप पाडसांचे शब्द ऐकून हरिणीला हुंदका अनावर झाला. आईच्या डोळ्यातील आसवे पाहून पिल्लांना काहीतरी अशुभ होणार असल्याचे जाणवले. त्यांनी आईकडे पाहिले, ‘आई, तू आम्हाला सोडून तर नाही ना चाललीस? आमच्यावर तू रागावली तर नाहीस ना?’ त्यांनी निरागसपणे विचारले.
हरिणीने मनाचा हिय्या करून आपल्या पाडसांना सत्य सांगितले. ती निष्पाप पाडसे म्हणाली, ‘आई, आम्ही तुला जाऊ देणार नाही. नकोच जाऊस तू.’
‘बाळांनो, मी तुमची शपथ घेऊन व्याधाला परत येण्याचे वचन दिलेय. बाळांनो, प्राण गेला तरी वचन मोडू नये. आणि वचन पाळणे झेपणार नसेल तर कधी कोणाला वचन देऊ नये!’
‘मग आई, आम्ही पण तुझ्यासोबत येऊ.’
पाडसांनी आपल्यासोबत येऊ नये यासाठी हरिणीने त्यांना परोपरीने समजावले. पण ती काही ऐकेनात. शेवटी ती हरिणी आणि तिची दोन्ही पाडसे तो व्याध बसलेल्या पाणवठ्यावर पोचली.
इकडे बराच वेळ झाला तरी हरिणी कशी आली नाही म्हणून व्याध बेचैन झाला होताच. शेवटी त्याला पानांची सळसळ ऐकू आली. हरिणी येतेय असे वाटून तो आपला धनुष्यबाण सरसावून बसला. पुढचे दोनचार दिवस लुसलुशीत मांस आपल्या कुटुंबाला खायला मिळेल या विचारांने त्याचे मन पुन्हा उल्हसित झाले. पण ती हरिणी एकटी न येता तिच्यासोबत तिची पिल्लेदेखील आली होती. त्या तिघांना पाहून त्याला आश्चर्य वाटले.
‘व्याधा, तुला वचन दिल्याप्रमाणे मी आले आहे. ही माझी वेडी पाडसे माझ्या मागून धावत आलीत. त्यांना तू काहीही इजा न करता परत जाऊ दे.’
व्याधाकडे पहात पाडसे म्हणाली, ‘व्याधदादा, तू आमच्या आईच्या ऐवजी आमची शिकार कर. आईशिवाय आम्ही जगू शकणार नाही.’
ती हरिणी म्हणाली, ‘व्याधा, मीच तुझी शिकार होते. माझ्या पाडसांना परत जाऊ दे. माझ्यावर बाण चालवं.’
हे दृश्य त्या शिकाऱ्यासाठी अलौकिक होते. चक्क बळी जाण्यासाठी त्याच्या पुढ्यात मायलेकांची चढाओढ चालली होती.’
एवढी गोष्ट वाचून दाखवून आई थांबली आणि म्हणाली, ‘त्या व्याधाचा शिवरात्रीच्या त्यादिवशी अनायासे कडकडीत उपवास झाला होता. अनवधानाने त्याने टाकलेल्या बिल्वदलांनी भगवान शंकरांची पूजा झाली होती. पुण्यकर्म घडल्यामुळे त्याचे मन पवित्र झाले होते. साक्षी भाव त्याच्या मनात उदय पावला होता. त्या मायलेकरांची ताटातूट करावीशी त्याला वाटेना. देवाने त्याला सुबुद्धी दिली. त्याने त्या तिघांनाही सोडून दिले. त्या व्याधाप्रमाणे ‘दुसर्‍याचे भले करण्याची बुद्धी आपल्याला मिळो’ हे मागायचे असते. पोट कसे भरायचे, स्वतःचे भले कसे करुन घ्यायचे ही बुद्धी आपल्यात उपजत भरलेली असते. पण ज्या बुद्धीची आपल्यात कमी असते, ती म्हणजे दुसर्‍याचा विचार करण्याची बुद्धी. स्वतःच्या स्वार्थाला मुरड घालून दुसर्‍याच्या भल्याचा विचार करणारी आणि तशी वागणूक निर्माण करणारी बुद्धी!’
……
डाॅ.रुपेश पाटकर

  • Related Posts

    पडत्या फळाची आज्ञा !

    हनुमान म्हणाला, ‘माई, या मोत्यांत राम आहे का ते शोधतोय. ज्या गोष्टीत राम आहे, तीच गोष्ट माझ्या उपयोगाची, बाकीचा कचरा घेऊन काय करू?’‘पडत्या फळाची आज्ञा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल.…

    “कोकणचा प्रेरणादायक प्रवास—रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या कार्याचा गौरव”

    रानमाणसाचे त्रिवार अभिनंदन! अस्सल कोकण ब्रॅण्ड “रानमाणूस” म्हणून ओळख मिळवलेले प्रसाद गावडे यांना यंदाचा युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एक लाख रुपये रोख आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    10/07/2025 e-paper

    10/07/2025 e-paper

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    09/07/2025 e-paper

    09/07/2025 e-paper

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!
    error: Content is protected !!