
“गीता हा शब्द दहादा उच्चारा म्हणजे शेवटी तुमच्या तोंडातून ‘त्यागी’ ‘त्यागी’ हा उच्चार येईल. ‘त्याग’ हेच गीतेचे सार आहे. सर्वत्र व्यापलेल्या देवासाठी संकुचित ‘मी’पणाचा त्याग! सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग!”
मी नववीत होतो तेव्हाची गोष्ट. आईबाबा मुंबईला मामाकडे गेले होते. तिथेच बाबांना पहिला हार्ट अॅटॅक आला. त्यातून ते बचावले. पण आता पथ्यपाणी सुरू झाले. जड उचलायचे नाही, धावपळ करायची नाही वगैरे मर्यादा आल्या. एका शेतकर्यासाठी अशा मर्यादा पाळणे बरेच कठीण होते. पण आता इलाज नव्हता. शक्य तितकी काळजी घेणे आवश्यक होते.
आईबाबा मुंबईहून परतल्यावर त्यांचे अनेक स्नेही त्यांना भेटायला येत. सर्वांच्या बोलण्यात एक सूर असा असे की ‘हे तुमच्या वाट्याला का आले? तुम्ही सज्जन माणूस. तुम्ही कोणाचे काही वाईट केले नाही. मग हा त्रास तुमच्याच वाट्याला का आला?’ बाबा त्यावर काही बोलत नसत. फक्त हसून दुर्लक्ष करीत. पण आईने मात्र हे गांभीर्याने घेतले. ती बाबांना म्हणाली, ‘आम्ही असं काय वाईट केलं होतं की देवानं हे आमच्या वाट्याला द्यावं?’
बाबा म्हणाले, ‘मी इतरांशी चांगलं वागण्याचा आणि माझं शरीर आजारी पडण्याचा काय संबंध आहे? शरीर आजारी पडणं किंवा ठणठणीत राहणं, याचं कारण आरोग्यशास्त्रात आहे. मी किती माणुसकीने वागतोय याच्यात नाही. दुसरा म्हणजे आपण कोणाचं काही वाईट केलंय का, असा प्रश्न निदान माणसाने तरी विचारू नये. आपण जाणीवपूर्वक कोणा माणसाला त्रास दिलेला नसेलही, पण माणूस सोडून इतर प्राण्यांना आपण मारलेले नाही का? पिकांची नासाडी करतात म्हणून मी डुकर मारलेत, माकडे मारलीत. मुंग्यांसारखे किती प्राणी मारलेत याची गणतीच नाही. देवाच्या नजरेत माणूस श्रेष्ठ आणि प्राणी कमी असे असेल का? उलट जेवढे आपण पाप करतो, त्याच्या तुलनेत काहीच शिक्षा नाही झालीय आपल्याला.”
“माणसाला जगण्यासाठी काही हिंसा करावी लागणारच,” आई म्हणाली.
“हो. त्यामुळेच म्हणतोय की माणसाने हा प्रश्न कधी उभा करू नये की माझ्याच वाट्याला हे का आले. माणसे अडचणीत आली की हा प्रश्न उभा करतात आणि देवाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. काही वेळा तर आम्ही देवाचे इतके केले, पूजाअर्चा केली तरी हे आमच्या वाट्याला का, असे विचारतात. कधी इतरांच्या जीवनाशी तुलना करतात. आणि शेवटी काहीजण नास्तिक बनतात. त्यांना देवाने आपल्यावर अन्याय केलाय असे वाटते.
हे लक्षात घ्यायला हवे की आपण काहीच पाप केले नाही, असे नाही. फक्त आपल्याला आपण केलेल्या पापाची जाणीव नाही. कारण आपण फक्त आपल्या नजरेतून बघतो, देवाच्या नाही,” बाबा म्हणाले.
“देवाच्या नजरेतून बघणे म्हणजे कसे?” मी विचारले.
“म्हणजे जीवनमूल्याला सर्वात श्रेष्ठ मानून विचार करणे आणि त्या मुल्यांप्रमाणे वागणे. आपले वैयक्तीक हित अडचणीत येत असले, तरीदेखील मुल्यनिष्ठ जीवन जगणे.
रामकृष्ण परमहंसांच्या वडीलांची गोष्ट सांगतो. मग तुझ्या लक्षात येईल. रामकृष्ण परमहंसांचा जन्म कामारपुकूर नावाच्या गावी झालेला असला तरी ते त्यांच्या वडीलांचे मूळ गाव नव्हे. त्यांच्या वडिलांना त्यांच्या मुल्यनिष्ठ जीवन जगण्यामुळे आपले मूळ गाव सोडावे लागले होते,” बाबा म्हणाले.
मी रामकृष्ण परमहंसांचे मुलांसाठी लिहिलेले चरित्र वाचले होते. त्यांच्या जन्माआधी त्यांच्या आईवडिलांना झालेले दैवी साक्षात्कार मला आठवत होते. पण त्यांच्या वडिलांना कामारपुकूरला का यावे लागले हा प्रसंग आठवत नव्हता.
“चमत्कारिक गोष्टी लक्षात राहतात. पण त्या होण्यासाठी कठोर मुल्यनिष्ठ जीवन जगावे लागते हे विसरले जाते.
क्षुदीराम चट्टोपाध्याय हे ज्या गावात राहत होते, त्या गावच्या जमीनदाराने त्यांना एका खटल्यात खोटी साक्ष द्यायला सांगितले. हा दोनशे वर्षापूर्वीचा काळ होता, जेव्हा जमीनदार हेच गावाचे राजे असत. त्यांच्या विरुद्ध जाण्याची हिम्मत कोणी करत नसे. पण मुल्यनिष्ठ जीवन जगणाऱ्या क्षुदीरामनी ती केली. त्यांनी खोटी साक्ष देण्यास नकार दिला. त्याची शिक्षा म्हणून जमिनदाराने त्यांचे घरदार, जमीन जुमला जप्त केला. क्षुदीरामनी आपल्या कुटुंबासह ते गाव कायमचे सोडले आणि ते कामारपुकूरमध्ये झोपडी बांधुन राहू लागले. त्या झोपडीत रामकृष्ण परमहंस जन्माला आले,” बाबा म्हणाले.
हे ऐकत असतात मला विनोबांनी यज्ञ, दान आणि तप यांच्या केलेल्या व्याख्या आठवल्या. विनोबा म्हणतात, ‘आपण जन्माला येतो तेव्हा शरीर, समाज आणि विश्व या तीन संस्था आपल्या भोवती असतात. आपल्या जगण्यासाठी या तिन्हींची झीज होत असते. ही झीज भरून काढणे हे आपले कर्तव्य आहे. विश्वाची झीज भरून काढण्याचा मार्ग म्हणजे यज्ञ, समाजाची झीज भरून काढण्याचा मार्ग म्हणजे दान आणि शरीराची झीज भरून काढण्याचा मार्ग म्हणजे तप!
बाबा म्हणाले, “विनोबांचे जीवन या तिन्हींचा आदर्श होते. त्यांनी चालवलेला भूदान यज्ञ हा विश्वातला सर्वात मोठा आणि कधीही न घडलेला चमत्कार होता. एका व्यक्तीने आपल्यातील दैवी गुण दुसर्यात संक्रमित करण्याचे हे मानवी इतिहासातील कदाचित एकमेव ठळक उदाहरण असेल. आणि तेही कलियुगातील! हा माणूस तब्बल वीस वर्षे सतत भारतभर फिरत होता, जमिनीचे दान मागत. कोणासाठी दान मागत होता तो? दात्याच्या गावातील गरीब कष्टकरी लोकांसाठी. आणि लोकानी भूदान केले.
जमिनीच्या लहानशा तुकड्यासाठी जिथे माणसे एकमेकांच्या उरावर बसतात, तिथे या माणसाला लोकांनी लाखो एकर जमिनी दिल्या.”
ज्यांच्यात विनोबा आपली करुणा संक्रमित करू शकले अशा लाखो लोकांपैकी एक माझे पणजोबादेखील होते. माझे पणजोबा हे व्यापारी. ते सावकारी देखील करीत. कमी देणे आणि जास्त कमावणे, हे व्यापाराचे मुख्य मुल्य. हे मुल्य अंगी बाणलेल्या माणसात विनोबांनी करुणा जागवली आणि भूदान करण्यासाठी सक्रीय केली. विनोबांनी हे करणे मला ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवण्याइतकेच चमत्कारिक वाटते.
विनोबांचे संत ज्ञानेश्वरांशी भावनिक नाते आहे. मोक्षाच्या मार्गावर चालण्यासाठी विनोबांनी घर सोडले तेव्हा त्यांच्यासोबत जो एकमेव ग्रंथ होता तो म्हणजे ज्ञानेश्वरी. त्यांची ज्ञानेश्वरीवर इतकी श्रद्धा होती की काशीत असताना एकदा त्यांना वाईट स्वप्न पडले, तेव्हापासून ते ज्ञानेश्वरी उशाशी ठेवून झोपू लागले. विनोबा सांगतात की त्यानंतर त्यांना पुन्हा स्वप्नं पडले नाही.
ज्ञानेश्वरांनी अठरा अध्याय आणि सातशे श्लोक असलेल्या भगवद्गीतेवर नऊ हजार ओव्यांचे भाष्य लिहीले तर विनोबांनी अनुष्टुप छंदातील गीतेच्या सातशे श्लोकांना मराठीत गीताईच्या रुपात आणले. गीतेच्या प्रत्येक श्लोकावर त्यांनी केलेले चिंतन त्यांनी पुस्तक रुपाने लोकांच्या पुढ्यात ठेवले. त्यांनी गीतेवर प्रवचने दिली. कुठे? धुळ्याच्या तुरुंगात सत्याग्रही म्हणून अटकेत असताना. आणि ती लिहून घेतली कोणी? साने गुरुजींनी! गीतेने ठेवलेला आदर्श म्हणजे स्थितप्रज्ञ. विनोबांनी त्यावर केलेले चिंतनदेखील पुस्तक रुपाने लोकांपुढे ठेवले.
गीता सांगणे हे भगवान कृष्णांना आवडणारे काम. अठराव्या अध्यायात भगवान गीता लोकांपर्यंत पोचवण्याची फलश्रुती सांगताना म्हणतात,
सांगेल गुज हे थोर माझ्या भक्त गणात जो
तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित!
गीतेचा अठरावा अध्याय हा शेवटचा अध्याय. यात भगवान पुन्हा एकदा कर्म, कर्मफलत्याग, संन्यास, ज्ञान वगैरे गोष्टी सांगतात आणि शेवटी म्हणतात,
सर्वधर्मान्परित्यज्य मामेक॔ शरणं व्रज
हेच गीतेचे सार आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, “गीता हा शब्द दहादा उच्चारा म्हणजे शेवटी तुमच्या तोंडातून ‘त्यागी’ ‘त्यागी’ हा उच्चार येईल. ‘त्याग’ हेच गीतेचे सार आहे. सर्वत्र व्यापलेल्या देवासाठी संकुचित ‘मी’पणाचा त्याग! सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग!”
………
– डॉ. रुपेश पाटकर