काँग्रेसचे संघटन सैन्य कुठे ?

भाजपच्या दबावतंत्राला आणि दादागिरीला तोंड देण्याची धमक असलेले कार्यकर्ते जोपर्यंत काँग्रेसला संघटनेत मिळत नाहीत, तोपर्यंत भाजपला सत्तेवरून खाली खेचणे पक्षाला कठीण बनणार आहे. हे संघटन सैन्य काँग्रेस तयार करू शकेल काय ?

राज्यातील सत्ताधारी भाजपने आपल्या संघटनात्मक फेररचनेची प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण केली आहे. बहुतांश मतदारसंघांचे मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांची फेररचना करून आता लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षांचीही घोषणा होणार आहे. सत्तेसाठी इतर पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांना पक्षसंघटनेत सामावून घेताना मुळ नेते आणि कार्यकर्त्यांना गप्प ठेवण्यात पक्षाने यश मिळवले आहे. या फेररचनेवरून अनेकांची नाराजी, धुसफुस ही असणारच, परंतु त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून न देणे हीच भाजपची शिस्त आहे. काहीजण याला वादळापूर्वीची शांतता म्हणतात, परंतु वादळ येईल तेव्हा बघितले जाईल. तूर्त भाजप पक्षसंघटनेने कुस बदलली आहे हे खरे.
एकीकडे भाजपच्या संघटनात्मक निवडणूकांचा समारोप होत असताना विरोधी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणूकांची नांदीही सुरू झालेली दिसत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींनी पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांना संघटनात्मक फेररचनेची जबाबदारी दिली आहे. अमित पाटकर यांना शह देण्यासाठी पक्षांतर्गत वेगवेगळे गट सक्रीय आहेत, परंतु त्यांना अद्यापही यश आलेले दिसत नाही. प्रदेशाध्यक्षांसाठी आपल्या मर्जीतील संघटनात्मक लोकांची गरज लागते आणि त्यामुळे अमित पाटकर यांना आपल्या विश्वासातील माणसांची गरज भासणार आहे. काँग्रेसमध्ये जुना इतिहास आणि आपले योगदान मिरवण्याची परंपरा अजूनही आहे. तिथे पक्षाकडून जर मानसन्मान मिळाला नाही तर पक्षाला वेठीस धरण्याचे प्रकार सर्रास चालतात. गोव्यात भाजप रूजविण्यात योगदान दिलेले आणि सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्या नेत्यांचीही पक्षाने कदर केली नाही. भाजपात व्यवहारिकता पाळली जाते तर काँग्रेस पक्षात अजूनही वारसा जपण्याची सवय आहे. काँग्रेसलाही आता व्यवहारीक बनूनच या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे.
काँग्रेस पक्षाकडे तूर्त फक्त तीन आमदार आहेत. या पक्षाकडे संपूर्ण राज्यभर पक्षाचे कार्यकर्ते, हीतचिंतक आहेत. हे कार्यकर्ते गटनिहाय विभागले गेले आहेत. या कार्यकर्त्यांवर पक्षाचे नेते आपला दावा करतात. नेत्यापेक्षा पक्ष श्रेष्ठ हे तत्वज्ञान कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. ह्याच कार्यकर्त्यांच्या बळावर काँग्रेस पक्षातील पुढारी आपल्यासाठी पदांची तडजोड करतात. पक्षाने तडजोडीला नकार दर्शवला तर लगेच बंडखोरी करून भाजप किंवा अन्य पक्षाशी जवळीक करून आपल्याच पक्षाला अडचणीत आणतात. भाजपसाठी काँग्रेस नेत्यांचा हा स्वभाव चांगलाच उपयोगी पडला आहे. अशा नेत्यांना जवळ करून काँग्रेसची जास्तीत जास्त नाचक्की करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही.
यंदा पहिल्यांदाच भाजपच्या संघटनात्मक निवडणूकांना मोठी प्रसिद्धी मिळाली. सर्व प्रमुख मीडियाकडून याची दखल घेण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणूका हे गुपीतच बनले आहे. भाजपच्या दबावतंत्राला आणि दादागिरीला तोंड देण्याची धमक असलेले कार्यकर्ते जोपर्यंत काँग्रेसला संघटनेत मिळत नाही तोपर्यंत भाजपला सत्तेवरून खाली खेचणे पक्षाला कठीण बनणार आहे. हे संघटन सैन्य काँग्रेस तयार करू शकेल काय ?

  • Related Posts

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    खंडपीठाच्या आदेशांची पूर्तता सरकारने करणे आवश्यक आहे. मात्र सध्या सरकारने नोकरशाहीच्या अधिकारांना मर्यादा घालून विधीमंडळाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदा बांधकामांविषयीच्या प्रकरणात…

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!

    अशा परिस्थितीत गोव्याचा भूमिपुत्र पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळू शकते, आणि त्यामुळे या पदासाठी आदिवासी समाजात आत्तापासूनच स्पर्धा सुरू झालेली दिसते. राज्यातील आदिवासी समाजात सध्या वातावरण बरेच तणावपूर्ण बनले…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    10/07/2025 e-paper

    10/07/2025 e-paper

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    09/07/2025 e-paper

    09/07/2025 e-paper

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!
    error: Content is protected !!