
भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हटल्यावर या पदाची प्रतिष्ठा, मानसन्मान आणि निर्णय प्रक्रियेतील या पदाचे वजन कायम राहणे ही खरी गरज आहे.
गोवा भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामोदर उर्फ सर्वांचे जवळचे दामू नाईक यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आज भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आली. पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता केवळ निष्ठा, प्रामाणिकपणा आणि संयमाच्या जोरावर पक्षाच्या सर्वोच्च पदावर पोहचू शकतो याचे उदाहरण म्हणून दामू नाईक यांच्या निवडीकडे पाहता येईल. यापूर्वी सगळेच प्रदेशाध्यक्ष याच निकषांच्या आधारे या पदांवर पोहचले होते आणि दामू हा ह्याच भाजपच्या विचारनिष्ठ परंपरेचा वारसा म्हणावा लागेल. सर्व ज्येष्ठ मंडळींसोबत दामू नाईक यांनी काम केले आहे, परंतु आज ही सगळी ज्येष्ठ मंडळी नव्या भाजपात अदखलपात्र ठरली आहेत. मनोहर पर्रीकर स्वर्गवासी झाल्यानंतर राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर हे सक्रिय संघटनेत नाहीत. उर्वरित भाजपची जुनी मंडळी पक्षात असूनही नसल्यासारखीच आहे आणि त्यामुळे दामू नाईक यांना या नव्या भाजपात स्वतःला जुळवून घ्यावे लागणार आहे. पक्षसंघटनेवर जुन्या मंडळींचा वरचष्मा असला तरी हल्लीच झालेल्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीत आयात मंडळींना आपल्या मर्जीतील लोकांची निवड करण्याची मोकळीक मिळाल्याचे दिसून येते. शेवटी सत्ता हेच राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय असते आणि त्यामुळे सत्तेसाठी कायम तडजोड ही करावीच लागते. ह्या तडजोडीच्या राजकारणाचा सराव करून भाजपची विचारसरणी किंवा संस्कार यांचा काहीही संबंध नसलेल्या मंडळींसोबत जुळवून घेण्याचे काम दामू नाईक यांना करावे लागणार आहे हे विशेष.
एकीकडे सत्तेच्या लाटेने भाजपात वाहून आलेला विरोधी गाळ साफ करून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर भाजपसाठी उपयुक्त संसाधनात करावयाचे आहे. दुसरीकडे सत्तेच्या सारीपाटाच्या या खेळात बेदखल झालेल्या मूळ कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांनाही या प्रवासाचे सक्रिय सहकारी बनवण्यासाठी दामू नाईक यांना काम करावे लागणार आहे. दामू नाईक हे बहुजन समाजाचे नेते आहेत. विशेष म्हणजे गोव्यातील बहुसंख्य भंडारी समाजातून ते येतात. हा समाज अनेक कारणांमुळे भाजपावर नाराज आहे. या समाजाचे वेगवेगळे विषय आहेत. या समाजाचा भाजपावरचा विश्वास अढळ ठेवून त्यांच्या विषयांना न्याय मिळवून देण्याचे शिवधनुष्य दामू नाईक यांना पेलावे लागणार आहे.
उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे पक्षाचे ज्येष्ठ नेते जरी असले तरी त्यांच्या शब्दाला आज पक्षात अजिबात स्थान नाही. फक्त श्रीपाद नाईक यांना पद देऊन त्यांची सोय केली जाते, परंतु निर्णय प्रक्रियेत त्यांच्या मताला महत्त्व नाही. श्रीपाद नाईक हे विक्रमी मतांनी निवडून येतात, पण त्याचे श्रेय मात्र आमदार घेतात. विरोधकांतील आमदार आयात करताना श्रीपाद नाईक यांना विश्वासात घेतले होते काय हा मुख्य सवाल आहे. फक्त पदावर विराजमान करून पक्षाचे काही मोजकेच नेते जर आपली मनमानी करणार असतील तर मग त्या पदाला तरी काय मान. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हटल्यावर या पदाची प्रतिष्ठा, मानसन्मान आणि निर्णय प्रक्रियेतील या पदाचे वजन कायम राहणे ही खरी गरज आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जुना भाजप आणि नवा भाजप ह्यात बराच फरक पडला आहे. पक्षाचे सरचिटणीस म्हणून दामू नाईक यांनी त्याचा अनुभव घेतला असेलच आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यासमोर काय आव्हाने आहेत याचीही जाणीव त्यांना झालेली असेल. सासष्टीसारख्या अल्पसंख्याकबहुल तालुक्यातून भाजपचे प्रतिनिधित्व करणारे दामू नाईक यांना हे पद मिळाल्याने त्याचे एक वेगळेपण आहे. या पदाला शोभेसे काम करून आपल्या नेतृत्वाची एक वेगळीच उंची गाठण्याची नामी संधी त्यांना यानिमित्ताने मिळणार आहे. त्यांच्या भावी वाटचालीला आमच्या शुभेच्छा.