
राजन कोरगांवकर यांची मागणी
पेडणे, दि. २१ (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यासाठी धारगळ येथे रविंद्र भवनसाठी सरकारने जागा निश्चित केली आहे. कला आणि संस्कृती खात्याच्या ताब्यात ही जागा दिली असतानाही काही लोक विनाकारण जागेचा वाद निर्माण करून हे रविंद्र भवन तालुक्यात अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी करत आहेत. धारगळ ही रविंद्र भवनसाठी योग्य जागा आहे आणि या जागेत रविंद्र भवन उभारणीसाठी चालना देण्यात यावी, अशी मागणी मिशन फॉर लोकल, पेडणेचे संस्थापक राजन कोरगांवकर यांनी केली.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी रविंद्र भवन तुये येथे उभारण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. पेडणे तालुक्यासाठी धारगळ येथे जागा निश्चित होऊनही जागेवरून नवा वाद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही. पेडणे मतदारसंघासाठी धारगळ ही जागा योग्य आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक तसेच आयुष इस्पितळ, मोपा विमानतळ आणि अन्य नियोजित प्रकल्पांमुळे रविंद्र भवन येथे शोभणार आहे, असेही राजन कोरगांवकर म्हणाले. तुये येथे नवीन रविंद्र भवन होत असेल तर त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही, परंतु धारगळ रविंद्र भवनला हरकत घेणे किंवा अपशकून करणे अयोग्य आहे, असे मत कोरगांवकर यांनी बोलून दाखवले.
पेडणेच्या आमदारांनी पुढाकार घ्यावा
पेडणे मतदारसंघातील धारगळ याठिकाणच्या नियोजित रविंद्र भवनला पर्यायी जागा शोधण्याचे काम आमदार जीत आरोलकर करत असताना पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर हे गप्प का, असा सवाल राजन कोरगांवकर यांनी केला. उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रश्न जीत आरोलकर यांनीच मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला पण तिथेही आमदार दिसले नाहीत. आमदारांनी पेडणे मतदारसंघ सोडला की काय, असा सवालही राजन कोरगांवकर यांनी केला. पेडणेतील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन तसेच मांद्रे मतदारसंघातीलही कलाकारांनी पाठींबा देऊन जागा निश्चित झालेल्या धारगळ याठिकाणीच रविंद्र भवन उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही राजन कोरगांवकर यांनी केले.
नियोजित जागेत आग
तुये येथे जिथे रविंद्र भवनसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे, तिथे काजू तथा अन्य झाडे असल्याने शनिवारी या जागेत कुणीतरी अज्ञातांनी आग लावण्याचा प्रकार घडला. या जागेचे मापन मामलेदार, टीसीपी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. मुळात ही आल्वारा जमीन आहे आणि तिथे शेतकरी काजूचे पीक घेत आहेत. इलेक्ट्रॉनिक सिटी प्रमाणेच आता रविंद्र भवनच्या नावे ही जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय, असा सवाल शेतकरी करत आहेत.