
कोरगांवात संशयितांची प्रचंड दहशत
पेडणे, दि. २२ (प्रतिनिधी)
गावडेवाडा-भटवाडी, कोरगांव येथील एक वृद्ध महिला सावित्री गावडे यांच्या बागायतीतील २८ पोफळी आणि २ कवाथे कापून टाकल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या घटनेमागे कोण आहेत हे स्थानिकांना माहित असूनही संशयितांबाबत गावांत प्रचंड दहशत असल्यामुळे या वृद्ध महिलेला न्याय मिळवून देण्यासाठीही कुणीच पुढे येत नसल्याची दुर्दैवी परिस्थिती उद्भवली आहे.
वृद्ध महिला आणि तिची मुलगी
गावडेवाडा-भटवाडी येथे राहणारी ही वृद्ध महिला आणि तिची दिव्यांग मुलगी ही दोघीच तिथे राहतात. दयानंद सामाजिक योजनेचे अर्थसहाय्य आणि त्याला काबाडकष्टाची जोड यातूनच या दोघींचा उदरनिर्वाह चालतो. ही दोघीजणी कुणाच्याच वाटेला जात नाहीत तसेच त्यांचा कुणाला कसलाच त्रास नाही, अशी माहिती शेजारील लोकांकडून देण्यात आली. या दोघांना कुणाचाही आधार नसल्याने त्यांच्या या बागायती जवळ गावांतील काही टारगट मुले रात्रीच्या वेळेला दारू पिण्यासाठी बसतात तसेच धिंगाणा घालतात, अशीही माहिती प्राप्त झाली आहे. या तरुणांनीच ही कृती केली असावी, असा संशय गावांतून व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात
भटवाडी-कोरगांव येथील सराईत गुन्हेगार स्नेहल संतोष नरसे या युवकाला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचा शाळेतून येता जाता पाठलाग करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हाच गुन्हेगार सावित्री गावडे यांच्या बागायतीच्या नुकसानीत सहभागी असल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर युवकाचा अनेक गुन्हेगारी प्रकरणात सहभाग असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. हे काम एकट्या संशयिताने केले की त्याच्यासोबत अन्य साथीदार होते, याचाही पोलिस शोध घेत आहेत.