‘दी मोस्ट पॉवरफुल ग्रामसेवक’ !

ग्रामसेवकाच्या विषयावरून सरकारची नामुष्की

गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)

पंचायत मंत्री मॉविन गुदीन्हो यांचे खास विश्वासू आणि मर्जीतले म्हणून ओळखले जाणारे सांकवाळ पंचायतीचे ग्रामसेवक तथा सचिव ओर्विल सी. वालीस यांच्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पंचायत मंत्र्यांसमोर शरणागती पत्करावी लागल्याचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
सांकवाळ पंचायतीच्या विविध विषयांवरून ग्रामसेवक आणि सचिवपदाचा ताबा मिळवलेले ओर्विल वालीस हे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त घडामोडी घडल्या आहेत. पंचायत खात्याची जबाबदारी मॉविन गुदीन्हो यांच्याकडे आल्यानंतर वालीस यांचा प्रशासनातील दबदबा अधिकच वाढला. हा दबदबा इतका आहे की सरकारचे प्रमुख असूनही मुख्यमंत्र्यांचेही या ग्रामसेवकापुढे काहीच चालत नाही, अशी चर्चा प्रशासनात सुरू आहे.


राजकीय दबदबा आणि नियुक्ती आदेश
ग्रामसेवक असूनही पंचायत मंत्र्यांची विशेष मर्जी असलेले ओर्विल वालीस यांची सांकवाळ पंचायतीच्या सचिवपदी नियुक्ती करणारा आदेश १५ मार्च २०२३ रोजी पंचायत खात्याने जारी केला. सांकवाळ पंचायत भूतानी, कचरा व्यवस्थापन आणि इतर अनेक विषयांवरून चर्चेत आहे. कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरचे आरोप असून, त्यासंबंधी अनेक तक्रारी पंचायत खाते व दक्षता विभागाकडे दाखल झाल्या आहेत. एवढ्या तक्रारी असूनही सचिवांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांचा राजकीय दबदबा अधोरेखित होत आहे.


दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा अवमान
कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी जुवारीनगर येथील चक्रीवादळ निवारा शेडसंबंधी विधानसभेत अतारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तत्कालीन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्वीन चंद्रू (आयएएस) यांनी आमदारांना बैठकीसाठी पाचारण केले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या एका बांधकाम प्रकरणात व्यस्त असल्याचे कारण देत ओर्विल वालीस यांनी अनुपस्थिती दर्शवली. दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती करूनही ते गैरहजर राहिले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली, तरीही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर, १९ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निलंबनाची शिफारस पंचायत संचालकांकडे केली, आणि त्याच दिवशी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला.


दीड महिन्यातच पुन्हा नियुक्ती
निलंबनानंतर केवळ दीड महिन्यातच ओर्विल वालीस पुन्हा सांकवाळ सचिवपदी रूजू झाले. ६ सप्टेंबर २०२४ रोजी पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी प्रशासकीय कामकाज आणि जनहिताच्या कारणास्तव त्यांना तात्काळ नियुक्त केल्याचा आदेश जारी केला.


मुख्य सचिवांची शिफारस बासनात
ओर्विल वालीस यांच्याविरोधात दाखल तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य दक्षता अधिकारी आणि मुख्य सचिव डॉ. व्ही. कॅडवेलू यांनी २ जुलै २०२५ रोजी त्यांच्या निलंबनाची शिफारस पंचायत संचालकांकडे केली. मात्र, एक महिना उलटूनही या शिफारशीची पूर्तता झालेली नाही. पंचायत संचालकांनी मुख्य सचिवांच्या शिफारशीकडे दुर्लक्ष करून पंचायत मंत्र्यांच्या आदेशावरून ओर्विल वालीस यांना पूर्ण संरक्षण दिले, त्यामुळे त्यांच्या राजकीय ताकदीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. पंचायत संचालकांच्या या निर्णयाची प्रशासनात जोरदार चर्चा सुरू आहे.


मुख्यमंत्री फाईल तपासणार
आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “मी ही फाईल तपासतो आणि नंतर कारवाई करतो” असे आश्वासन दिले. मात्र, कारवाईचे आदेश अद्याप जारी झालेले नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री फाईलमध्येच अडकले की काय, असा टोला विरोधकांनी लगावला आहे.

  • Related Posts

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा अभ्यास अपुरा आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बिल्डरला मदत करण्यासाठी महामार्गात बदल गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्ग-६६ वर आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. या महामार्गाच्या मूळ आराखड्यात गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने एका बिल्डरला मदत करण्याच्या…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!