पणजी,दि.४(प्रतिनिधी)- भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी राज्यातील ९० टक्के सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर आहेत असा आरोप केल्याने सामाजिक कार्यकर्ते बरेच खवळले आहेत. वेर्णेकर यांनी हे आरोप सिद्ध करावेत अन्यथा जाहीर माफी मागावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले गिरीराज पै वेर्णेकर ?
राज्यात सुमारे ९० टक्के सामाजिक कार्यकर्ते हे खंडणीखोर आहेत आणि केवळ कमवण्यासाठी ते वावरतात असा आरोप गिरीराज पै वेर्णेकर यांनी केला होता. जे कुणी प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, त्यांचे म्हणणे सरकार आणि पक्ष एकून घेण्यास तयार आहे. हल्ली सगळ्याच विषयात हे सामाजिक कार्यकर्ते तज्ज्ञ असल्यासारखे बोलतात,असा टोलाही त्यांनी हाणला.
पोलिसांना सांगा आणि अटक करा?
खंडणी वसूल करणे हा गुन्हा आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आहे. पोलिस, गुप्तचर यंत्रणा सरकारकडे आहे. सामाजिक कार्यकर्ते जर खंडणीखोरी करत आहेत तर पोलिसांना कारवाई करण्यास कुणी रोखले आहे,असा सवाल सांकवाळचे आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांनी केला. भाजपच्या राजवटीत जेव्हा हेच कार्यकर्ते तत्कालीन काँग्रेस सरकारच्या चुकांवर बोलत होते तेव्हा कोण भाजप त्यांना खंडणी देत होता काय,असा टोलाही त्यांनी हाणला.
श्री बोडगेश्वराकडे साकडे
भाजप प्रवक्ते गिरीराज पै यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील समस्त सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्या गोव्यासाठी आणि गोव्याच्या रक्षणासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यांची अशी अवहेलना करणाऱ्या गिरीराज पै यांना देवाने सुबुद्धी द्यावी आणि त्यांनी आपला हा शब्द मागे घ्यावा,अशी प्रार्थना सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हापसाचा राखणदार श्री देव बोडगेश्वराकडे केली. याप्रसंगी संजय बर्डे, शंकर पोळजी, रामा काणकोणकर व इतर हजर होते.
राजकीय पक्षांकडूनही टीका
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनेच २०१२ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपने खुर्ची मिळाल्यानंतर लगेच सामाजिक कार्यकर्त्यांवर लाथ मारली. त्यावेळी आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या पर्वरी विधानसभेच्या कार्यालयात बसून काँग्रेसविरोधी रणनिती आखत होते. गिरीराज पै वेर्णेकर यांनी भाजपने राजकीय खंडणीखोरी केली त्याचा तपास पहिल्यांदा लावावा,असा आरोप काँग्रेसचे नेते एल्वीस गोम्स यांनी केला. बेकायदा खाण, अबकारी घोटाळा, सेझ जमिन घोटाळा, आयडीसी भूखंड घोटाळा हे सगळे घोटाळे भाजपनेच बाहेर काढले होते, ते अचानक गडप कुठे झाले,असा सवालही त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसचे तनोज अडवलपालकर यांनीही गिरीराज पै वेर्णेकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.