गोवा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल (जीएमसी), बांबोळी हे केवळ गोवा राज्यातीलच नव्हे, तर शेजारील सिंधुदुर्ग आणि कारवार परिसरातील रुग्णांसाठीही एक महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र आहे. अत्यंत कमी खर्चात मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ सर्वसामान्य लोकांना होतो. जे उपचार खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये खर्च करून करावे लागतात, तेच जीएमसीमध्ये माफक दरात, अनेकदा मोफत मिळतात. त्यामुळे ही सेवा गरिबांसाठी “आधार” ठरली आहे.
मात्र अलीकडील काळात जीएमसीमध्ये एक गंभीर बाब समोर आली आहे. रूग्णालयात अनधिकृत केअरटेकर सेवा सुरू आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी मदत करणारे काही लोक स्वतःला केअरटेकर म्हणून ओळखतात, पण हे लोक नेमके कोण आहेत, कुठून आले आहेत, याची अधिकृत माहिती कोणाकडेच नाही.
ओळखीशिवाय रुग्णालयात मुक्त वावर
या केअरटेकरांकडे कोणतीही ओळखपत्रे नाहीत, ना त्यांच्या पार्श्वभूमीची कोणतीही खात्री. यापैकी काही जण रुग्णालय परिसरातच दिवसरात्र वास्तव करताना दिसतात. ते लॉबी, कॅन्टीन किंवा वॉर्डबाहेर थांबून रुग्णांच्या नातेवाईकांना सेवा देण्याची तयारी दाखवतात. काही वेळा त्यांच्यातील गोंधळ, भांडणं, मोठ्याने बोलणं यामुळे रुग्णालयातील शिस्त आणि शांतता भंग होते.
एकाच समाजघटकाचे प्राबल्य
या केअरटेकरांमध्ये एका विशिष्ट समाजघटकाचे लोकच अधिक प्रमाणात असल्याचे चित्र दिसते. यामुळे सामाजिक समतोलावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. वैद्यकीय सेवेसारख्या संवेदनशील ठिकाणी विविध समाजघटकांना समान संधी मिळाली पाहिजे, हीच लोकशाहीची अपेक्षा आहे.
शासनाने लक्ष घालण्याची गरज
या प्रकरणावर जीएमसी प्रशासनाने किंवा राज्य शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. हे केअरटेकर अधिकृत आहेत की नाही, यावर कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अनोळखी व अनधिकृत व्यक्ती रुग्णांच्या संपर्कात येणे हे केवळ अस्थिरताच नव्हे, तर धोका देखील ठरू शकतो.
जर केअरटेकर सेवा जीएमसीमध्ये खरंच आवश्यक असेल, तर ती अधिकृत पद्धतीने सुरू केली पाहिजे. शासनाने अशा सेवांना मान्यता देऊन पुढील उपाययोजना कराव्यात:
• पात्र व गरजू व्यक्तींना केअरटेकर म्हणून नोंदणी करावी
• पोलीस पडताळणी अनिवार्य करावी
• अधिकृत ओळखपत्र, गणवेश आणि प्रशिक्षणाची अट घालावी
• सेवा पेड स्वरूपात ठेवून दरवर्षी नूतनीकरणाची प्रक्रिया राबवावी
• रुग्णालय प्रशासनाच्या नियंत्रणाखाली ही सेवा चालवावी
या उपायांमुळे गरजूंना रोजगाराची संधी मिळेल, तर रुग्णांना सुरक्षित आणि नीटनेटकी सेवा मिळेल.
गोवा मेडिकल कॉलेजसारख्या शासकीय संस्थेमध्ये अशा अनधिकृत सेवा राबवण्यात येत असतील, तर हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. वैद्यकीय सेवा ही अत्यंत संवेदनशील बाब असते आणि तिच्यात कोणताही अराजक किंवा अनधिकृत हस्तक्षेप होणे टाळलेच पाहिजे. शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि रुग्णसेवेतील अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालावा.
– तुषार तेली






