गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) : गोव्यातील मोठे उद्योग, व्यावसायिक आस्थापने आणि हॉटेल व्यावसायिकांकडून स्थानिक वाहतूकदारांना डावलून परराज्यातील व्यावसायिक वाहनांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप ऑल गोवा प्रायव्हेट बस ओनर्स असोसिएशनचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केला आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या (जीआयडीसी) भूखंडधारक उद्योगांनी कर्मचारी वाहतूक, मालवाहतूक आणि अन्य वाहतूक सेवांसाठी स्थानिक गोमंतकीय वाहतूकदारांनाच प्राधान्य देणे सक्तीचे करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ताम्हणकर यांनी आज, ११ नोव्हेंबर रोजी गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना यासंबंधी लेखी निवेदन सादर केले. राज्यातील स्थानिक व्यावसायिक वाहनमालकांच्या उपजीविकेवर परराज्यातील वाहतूकदारांच्या वाढत्या स्पर्धेचा गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
गोव्यात कार्यरत असलेले अनेक मोठे उद्योगपती, व्यावसायिक आणि हॉटेलमालक आपल्या कर्मचारी वाहतुकीसाठी तसेच मालवाहतुकीसाठी स्थानिक वाहतूकदारांना संधी देण्याऐवजी बाहेरील वाहतूकदारांची सेवा घेत असल्याचा आरोप ताम्हणकर यांनी केला आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिक वाहनमालकांच्या व्यवसायावर आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तात्पुरत्या कागदपत्रांच्या आधारे कायमस्वरूपी नोंदणीचा आरोप
परराज्यातील काही वाहतूकदार गोव्यातील तात्पुरत्या पत्त्यांचा आणि व्यावसायिक भाडेकरारांचा आधार घेऊन आपल्या वाहनांची गोव्यात कायमस्वरूपी नोंदणी करून घेत असल्याचा दावा ताम्हणकर यांनी केला आहे.
यासाठी प्रतिज्ञापत्रे, ना हरकत दाखले, भाडेकरार, वीजबिले, आस्थापना नोंदणी प्रमाणपत्रे, पंचायत किंवा पालिकांकडून दिले जाणारे व्यापार परवाने तसेच स्थानिक पत्ता दर्शविणारी आधारकार्डे यांचा वापर केला जात असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
अशा कागदपत्रांच्या आधारे बाहेरील वाहतूकदारांना गोव्यात कायमस्वरूपी व्यावसायिक वाहन नोंदणी मिळत असल्यामुळे स्थानिक वाहतूकदारांसमोर असमान स्पर्धा निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जीआयडीसीच्या संचालक मंडळात ठराव घेण्याची मागणी
गोवा औद्योगिक विकास महामंडळ हे राज्यातील औद्योगिक वसाहतींचे व्यवस्थापन आणि उद्योगांना भूखंड वाटप करणारे प्रमुख प्राधिकरण असल्याने या प्रश्नावर महामंडळाने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे ताम्हणकर यांनी म्हटले आहे.
महामंडळाच्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडून औपचारिक ठराव मंजूर करावा. त्यानंतर जीआयडीसीचे भूखंड मिळालेल्या सर्व उद्योग, मोठ्या व्यावसायिक आस्थापना आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी स्पष्ट परिपत्रक किंवा कार्यालयीन आदेश जारी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या आदेशानुसार कर्मचारी वाहतूक, मालवाहतूक आणि संबंधित सर्व वाहतूक सेवांसाठी गोव्यातील स्थानिक वाहनमालक आणि वाहतूकदारांकडूनच सेवा घेणे बंधनकारक करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
स्थानिक वाहतूकदारांच्या उपजीविकेचा प्रश्न
स्थानिक वाहतूकदार अनेक वर्षांपासून या व्यवसायावर अवलंबून असून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायातून चालतो. परराज्यातील वाहनांच्या वाढत्या वापरामुळे स्थानिक वाहनमालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे ताम्हणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री, जीआयडीसीचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.





