
शिवजयंतीदिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श स्वराज्याची स्थापना केली होती. तसेच गोव्याचे सुराज्यात परिवर्तन व्हावे ही आपली इच्छा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. स्वराज्याचा पाया हा देखील अंत्योदय तत्त्वावर अवलंबून होता. तोच अंत्योदय मंत्र घेऊन आपले सरकार काम करत आहे. शिवशाहीची स्वप्ने पुन्हा देशात साकारण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
फोंडा फर्मागुडी येथील राज्यस्तरीय शिवजयंती उत्सवाला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. याप्रसंगी मंत्री गोविंद गावडे, मंत्री सुभाष शिरोडकर तसेच अन्य मान्यवर हजर होते. छत्रपतींमुळेच संपूर्ण गोव्याचे ख्रिस्तीकरण करण्याचा पोर्तुगीजांचा डाव उधळला गेला. वास्तविक ४५१ वर्षे पोर्तुगीजांनी फक्त तीन तालुक्यांवरच राज्य केले. उर्वरित तालुक्यात सुमारे अडीचशे वर्षे शिवशाही होती, असे विधानही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. बार्देश तालुक्यातील लोकांवर धर्मांतरणाची सक्ती केल्यामुळेच महाराजांना बार्देशवर स्वारी करावी लागली. या स्वारीत पोर्तुगीजांना नामोहरम केल्यानंतर त्यांच्याकडे तह करून हिंदू लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याला संरक्षण मिळवून देण्याचे वचन महाराजांनी घेतले. सर्वाधिक पाडण्यात आलेली मंदिरे ही फक्त या तीन तालुक्यातीलच होती. तिथूनच ती इतर तालुक्यात सुरक्षित स्थलांतरित केली गेली यामागची ताकद ही शिवाजी महाराजांच्या संरक्षणाची होती, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवाजी महाराजांनी गोव्यावर केलेली स्वारी हे राजकीय आणि धार्मिक स्वरूपाचे होते. आर्थिक हितासाठी त्यांनी ही स्वारी केलेली नव्हती. बेतुल येथे जलदुर्ग ही त्यांचीच निर्मिती होती. १६८० साली महाराजांच्या निधनानंतरच पोर्तुगीजांनी सुटकेचा श्वास घेतला आणि संपूर्ण गोव्यावर आपला अंमल आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी करून गोमंतकीयांच्या धर्माचे रक्षण केले.
रयतेचे राजे हा आदर्श
शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. कमी तकरा रयतेवर करांचा बोजा टाकला जाईल. आपले सरकार देखील अंत्योदय तत्त्वाचे पालन करून प्रशासन चालवत आहे. अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य चालवले. प्रत्येकाची ताकद त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी वापरली. देशात पहिले नौदल स्थापन करून पोर्तुगीजांच्या समुद्रावरील एकाधिकारशाहीला छेद देण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले, असेही डॉ. सावंत म्हणाले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या शासन व्यवस्थेत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
एक तरी गुण अंगीकारावा
शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगीकारावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शिक्षकांनी मुलांना खरा इतिहास शिकवावा, असेही आवाहन त्यांनी केले.