
आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांचे आवाहन
पणजी, दि. २० (प्रतिनिधी)
गोमंतभूमीचे रक्षण आणि या भूमीचे स्वराज्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सगळ्या मावळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केले. अन्याय, भ्रष्टाचार, दलाली, दादागिरी, गुंडगिरी, बेरोजगारी ही विद्यमान सरकारची ओळख बनली आहे. ही ओळख पुसून टाकण्यासाठी सर्वांना बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत, असेही ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शिवजयंतीदिनाच्या भाषणाबाबत आपली प्रतिक्रिया देताना मनोज परब बोलत होते. विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवू नका, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री शिक्षकांना करतात यासारखे दुर्दैव नाही. सरकारने लागू केलेली पुस्तकेच शिक्षकांना शिकवावी लागतात. शिक्षणमंत्री या नात्याने ही पुस्तके त्यांनी स्वतः तयार केली आहेत तर मग शिक्षक कसे जबाबदार, असा टोला मनोज परब यांनी हाणला.
पोर्तुगीजांपासून गोव्याचे अनेक भाग शिवशाहीमुळे सुरक्षित राहिले. जे पोर्तुगीजांनी देखील केले नाही ते पाप विद्यमान सरकार करत आहे. इथल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्यासाठी नवे नवे कायदे तयार केले जातात आणि या जमिनी व्यवहारांतून संपत्ती गोळा करून लोकांना लाचार बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो, असा आरोप मनोज परब यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले. इथे गोव्यात सरकारचे काही मंत्री आपापल्या मतदारसंघांचे वतनदार बनले आहेत. दिवसाढवळ्या महिलांवर अन्याय होतो, भ्रष्टाचाराला पारावार राहिला नाही, बाऊन्सर्स आणि गुंडांचा वापर करून गोमंतकीयांना घराबाहेर काढले जाते, काही सरकारी अधिकारी जनतेचे सेवक बनण्याचे सोडून रिअल इस्टेटवाल्यांचे एजंट म्हणून काम करत आहेत, हे सगळे घडत असताना शिवाजी महाराजांच्या आदर्शाच्या गोष्टी या सरकारला शोभत नाहीत, असा टोलाही मनोज परब यांनी हाणला.
राज्याची प्रादेशिक अस्मिता जपा
गोवा भारताचा घटक आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तरीही प्रत्येक राज्याची प्रादेशिक अस्मिता जपण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या सरकारांनी ही प्रादेशिक अस्मिता संपवण्याचा विडा उचलला आहे. या सरकारांनी गोव्याच्या जमिनी परप्रांतीयांना विकण्याचा सपाटाच लावला आहे. या पक्षांच्या दिल्लीतील नेत्यांची नजर गोव्याच्या जमिनींवर पडल्यामुळेच त्यांना इथे सत्ता हवी आहे. गोंयकार हे कधी समजतील हेच कळत नाही. वेळीच समज आली तरच गोवा वाचवणे शक्य आहे. आरजीपीचे क्रांतीकारी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच आपल्या प्रदेशाच्या सरंक्षणासाठी काम करत आहेत आणि आता लवकरच ही क्रांती एक नवे रूप घेणार आहे, असे सुतोवाच मनोज परब यांनी केले.