
सभापती रमेश तवडकर यांच्या मंत्रीपदाबाबत चाचपणी
गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)
कला आणि संस्कृती, तसेच क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर आज अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे. गावडे यांचे मंत्रीपद काढून घेऊन ते सभापती रमेश तवडकर यांना देण्याची भाजपची योजना आहे.
काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे गोविंद गावडे यांची भेट घेणार आहेत. दामू नाईक यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्रीमंडळ फेरबदलाचा मुहूर्त निश्चित करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी एका माध्यमाशी बोलताना नमूद केले आहे.
सभापती रमेश तवडकर मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. गोविंद गावडे यांचे मंत्रीपद रमेश तवडकर यांना दिल्यास अनुसूचित जमातीचा रोष पत्करावा लागणार नाही, असे भाजपला वाटते. मात्र, गोविंद गावडे स्वतः राजीनामा देतील की त्यांना मंत्रीपदावरून हटवले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गावडे यांच्या मंत्रीपदाच्या निमित्ताने मंत्रीमंडळात फेरबदल होणार असल्याने इतर खात्यांमध्येही काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.