
हायकोर्टाच्या निवाड्याने जनतेच्या हक्कांना संरक्षण
म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) –
नगर नियोजन खात्याच्या कलम १७(२) अंतर्गत जमिनींची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा घाट अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उधळून लावला आहे. या निवाड्यातून जनतेच्या हक्कांना संरक्षण मिळाल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस एड. श्रीनिवास खलप यांनी सांगितले.
उत्तर गोवा जिल्हा प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव विजय भिके, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर आणि युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा उपस्थित होते. विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गोवा वाचवण्यासाठी सुरू केलेल्या लढ्यामुळे हे शक्य झाले आहे, असेही यावेळी एड. खलप म्हणाले.
भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात जमिनींचे रूपांतर, डोंगर कापणी आणि बेकायदेशीर पद्धतीने मोठमोठ्या प्रकल्पांना परवानगी देऊन गोव्याच्या पर्यावरणाचा नाश करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. राज्याचे पर्यावरण आणि ओळख जपणाऱ्या कायद्यांना फाटा देऊन जमिनी लाटण्यासाठी तयार केलेल्या कायद्यांचा या निकालाने पर्दाफाश केल्याचा आरोप काँग्रेसने केला.
भाजपचा हेतू नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास करणे नाही, तर त्यांच्या उद्योगपती मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी गोव्याच्या नाशाला चालना देणे हा आहे. गोमंतकीयांनी आता अधिक सावध आणि एकजूट राखून गोवा विरोधी या धोरणांना विरोध करायला हवा. काँग्रेस पक्ष हे षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लढण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.