
हरमलच्या शॅकला २५ लाखांचा दंड
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)
पेडणे- हरमल किनाऱ्यावरील वादग्रस्त सी लाँज बीच शॅकचे मालक मान्यूएल फर्नांडिस यांना २५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी आपला शॅक भाडेपट्टीवर दिल्यामुळे त्याचा परवाना रद्द करून त्याला कायम काळ्या यादीत टाकण्यात आले आहे तसेच पुढील सात दिवसात हा शॅक हटविण्याचे कडक निर्देश पर्यटन खात्याने जारी केले आहेत.
हरमल येथील या शॅकच्या कामगारांकडून अमर बांदेकर या युवकाचा खून करण्यात आल्याने राज्य सरकारची बरीच नाचक्की झाली आहे. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी मंगळवारी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पर्यटकांची सुरक्षा तसेच किनारी भागातील वाढत्या बेकायदा प्रकारांवर आळा घालण्याबाबत चर्चा केली. बुधवारी सकाळपासूनच ठिकठिकाणची पोलिस पथके किनाऱ्यांवर दाखल होऊन शॅक तसेच अन्य व्यावसायिकांची चौकशी आणि तपासणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पर्यटनाशी निगडीत सर्व खाते प्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून त्यात विविध विषयांवर सखोलपणाने चर्चा आणि कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
कठोर कारवाईचे स्वागत
पर्यटन खात्याने हरमल शॅकबाबत घेतलेल्या कठोर कारवाईचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. उर्वरीत शॅकच्या मालकांचीही चौकशी करून ते भाडेपट्टीवर दिले आहेत का, याचाही तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिकांना व्यवसायाची संधी प्राप्त होण्यासाठी शॅक व्यवसायाची आखणी करण्यात आली आहे. हे शॅक प्राप्त करून ते परस्पर परप्रांतीयांना चालवण्यासाठी देण्याची प्रथा सुरू झाली आहे. राज्यात मंजूर झालेल्या सर्व शॅकधारकांची तपासणी करून ते शॅक स्थानिकच चालवतात का, याची खातरजमा करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.