
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)
राज्यातील पर्यटनाची सरकारकडून नाचक्की सुरू आहे. पर्यटनावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. पर्यटनातील वाढती गुन्हेगारी धोकादायक ठरत असून पर्यटनाच्या बदनामीमुळे पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवत असल्याची टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
इथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हरमल किनारी अमर बांदेकर याचा झालेला खून आणि एकंदरीत शॅक व्यावसायिकांची मुजोरी यावर अमित पाटकर यांनी बोट दाखवले. शॅक धोरणात स्थानिकांना व्यावसायिक संधी देण्यासाठी शॅक दिले जातात पण हे शॅक परप्रांतीयांना भाडेपट्टीवर कसे काय दिले जातात, असा सवाल त्यांनी केला. या परप्रांतीयांना सरकारचा पाठींबा मिळत असल्यामुळेच ते लोकांना जिवंत मारण्याचे धाडस करू शकतात. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम पर्यटन उद्योगावर पडल्याचा आरोप त्यांनी केला.
शॅक व्यवसायानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ तसेच राष्ट्रीय हरित लवादाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात नाही. या सर्व निर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याची टीकाही यावेळी पाटकर यांनी केली. दक्षिण गोव्यातील युवतीवर झालेला अत्याचार ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याची सरकारने बदली का केली, असा सवालही यावेळी पाटकर यांनी केला.