हे कालचक्र कोण थांबवणार ?

वास्तवाला भीडणे एवढेच आपल्या हाती आहे आणि त्यासाठी नव्या वर्षांत प्रत्येकाने सज्ज व्हावे हीच इच्छा.

माणसाच्या जन्मात आणि मरणात कुणाचे तरी भले हे होतच असते. तो निसर्गनियम आहे. प्रत्येकजण आपापल्यापरिने देशाच्या, राज्याच्या आर्थिक विकासाचा वाटेकरी असतो. तो कमी जास्त प्रमाणात जरी असला तरीही त्याचे योगदान हे असते. गोव्याच्या आर्थिक विकासात पर्यटनाचा हिस्सा आता मोठा बनला आहे आणि त्यामुळे अतिथी देवो भव हा मंत्र आम्ही जपायला हवा. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाशी आम्ही अदबीने वागायला हवे.
कुणी दारू पिऊन पडला असेल तर त्याला पुन्हा एकदा उठवून दारूपिण्या योग्य करायला हवे. कुणीतरी जुगारात सगळे काही गमावलेला व्यक्ती घरी जायलाही पैसा नाही म्हणून विवंचनेत असेल तर त्याची घरी जाण्याचे तिकीट काढून तो पुन्हा नव्याने पैसा घेऊन येऊन जुगारावर ते उधळेल, यासाठी त्याला सक्षम बनवावे लागेल. ही सगळी यंत्रणा सातत्याने चालू राहिली तरच आपले चलन-वाहन होईल, याची आठवण आम्हाला सदैव राहायला हवी.
खरंच खोल विचार करत असता वास्तवाला भीडावे लागते आणि नंतर या भयानक वास्तवाचे दर्शन घडल्यानंतर आयुष्याची ही विचित्र घडी कधी सुटणार आहे काय, असा प्रश्न पडतो. सरत्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपल्याकडे पर्यटकांची झुंबड उडते. या पर्यटकांमुळे आपली रोजची गैरसोय होते आणि आपण मनस्ताप करतो. नको हे पर्यटक आणि पर्यटन, असाही टोकाचा विचार आपण करतो.
परंतु हा विचार करत असताना आपण पर्यटन किंवा त्या अनुषंगाने आलेल्या इतर नैतिक, अनैतिक गोष्टींवरील अवलंबित्वतेचा कधीच विचार करत नाही. इथे पर्यटक येऊन केवळ देवदर्शन घेऊन गेला किंवा किनाऱ्यावर चणे-फुणाणे खाऊन गेला म्हणून होणार नाही. या पर्यटकाने चिक्कार दारू ढोसली पाहिजे, गोवन फिश करी तसेच स्पेशल डीशेसवर ताव मारला पाहिजे, रात्रीच्या वेळी कॅसिनोत जाऊन उधळपट्टी करायला पाहिजे आणि हे करत असताना किमान तीन ते चार दिवस तरी हॉटेल, गेस्ट हाऊस किंवा रेंट ए रूममध्ये घालवले पाहिजेत. हे सगळे केले तरच राज्याचे आर्थिक चलन-वाहन होऊ शकेल.
आपल्याकडील सामाजिक योजना आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बराचसा वाटा हा अबकारी, मनोरंजन, कॅसिनो शुल्क आदींतून वसूल होत असतो. हा महसूल कमी होणे आपल्याला अजिबात परवडणार नाही. तो अधिकाधिक वाढला तरच आपण तग धरू शकतो.
आता हा महसूल वाढायला हवा तर दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, त्यांची आर्थिक शक्ती वाढली पाहिजे. कॅसिनोंत उधळायला त्यांच्याकडे पैसा असायला हवा आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. समजा सरकारने जाहीर केले की राज्यातील सर्व मद्यालये बंद केली जातील, कॅसिनो बंद केले जातील परंतु त्याच्या बदल्यात सामाजिक योजना बंद होतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होईल, हे कुणी मान्य करणार आहे का? हेच दाखवते की कुणाच्या तरी भल्यात किंवा संकटात किंवा मरणात कुणाचे तरी हित जपलेले असते हा निसर्गनियम आहे.
आपले नशीब, आपले संस्कार, आपले विचार, आपली जडणघडण यावर अवलंबून आहे की या जीवनचक्रात आपण कुठे असणार आहोत. आपण कितीही बोललो, भाषणे केली, आंदोलने केली म्हणून हे कालचक्र थांबणार नाही. अर्थात आपली टीका, आपला विरोध केवळ या कालचक्राची गती मंदावत असते परंतु ती थांबवता येणे शक्य नाही. वास्तवाला भीडणे एवढेच आपल्या हाती आहे आणि त्यासाठी नव्या वर्षांत प्रत्येकाने सज्ज व्हावे हीच इच्छा.

  • Related Posts

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    खंडपीठाच्या आदेशांची पूर्तता सरकारने करणे आवश्यक आहे. मात्र सध्या सरकारने नोकरशाहीच्या अधिकारांना मर्यादा घालून विधीमंडळाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदा बांधकामांविषयीच्या प्रकरणात…

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!

    अशा परिस्थितीत गोव्याचा भूमिपुत्र पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळू शकते, आणि त्यामुळे या पदासाठी आदिवासी समाजात आत्तापासूनच स्पर्धा सुरू झालेली दिसते. राज्यातील आदिवासी समाजात सध्या वातावरण बरेच तणावपूर्ण बनले…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    10/07/2025 e-paper

    10/07/2025 e-paper

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    09/07/2025 e-paper

    09/07/2025 e-paper

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!
    error: Content is protected !!