श्रीमदभागवतात अवैध्य पैसा कमवण्याच्या यादीत दारू, जुगाराचा समावेश असला तरी त्यापासून आता आमची मुक्तता नाही हे खरेच आहे, बाकी श्रीमदभागवतातील अन्य गोष्टींवर लक्ष देऊन तिथे काही सुधारणा घडवणे शक्य आहे का, तेच आपण पाहु.
सरत्या वर्षांला बायबाय आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोवा हे एक उत्तम ठिकाण म्हणून पर्यटन नकाशावर प्रसिद्ध झाले आहे. गोव्याच्या पर्यटनासाठी हे ब्रँडींग अत्यंत फायदेशीर आहे. या काळात अगदी सर्वसामान्य व्यवसायिक ते पर्यटन उद्योगातील बडे उद्योजक अशा सर्वांनाच व्यवसाय मिळतो आणि त्यातून सरकारच्या तिजोरीतही चलनाचा संचय होतो. अलिकडच्या काळात पायाभूत सुविधा आणि इतर अव्यवस्थापनामुळे वाढत्या पर्यटकांची इथल्या स्थानिकांसाठी डोकेदुखी वाढत चालली आहे. वाहतूक कोंडी, बेदरकार वाहने चालवणे, किनारी भागांतील पार्ट्यांचा धुमाकुळ, मद्यप्राशन करून धांगडधिंगा घालणे आणि ड्रग्सचा वाढता फैलाव अशी अनेक कारणे देता येतील. या सगळ्या गोष्टींमुळे गोमंतकीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रोजच्या कामाच्या नियमावलीत तसेच इतर रोजच्या व्यवहारांत पर्यटकांची गर्दी ही अडचण, अडथळा बनू लागली आहे आणि त्यामुळे नको हे पर्यटक अशी अनेकांची भावना बनू लागली आहे.
ही भावना आपल्याला वेळीच डोक्यातून काढून टाकावी लागणार आहे आणि या परिस्थितीला आणि त्याहीपुढे जाऊन यापेक्षा अधिक गंभीर परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आणि सवय आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. मुंबई, पुणेसारख्या मेट्रोपोलिटन सिटीमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण गोव्याच्या बहुतांश शहरी आणि किनारी भागांत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या परिस्थितीचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची कुवत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांत आणि सरकारातही नाही, हे अमान्य करून काहीही उपयोग नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येणे शक्य नाही आणि त्यामुळे त्याची सवय करून घेणे आणि हळूहळू मनाला ते पटवून देण्यातच आपले भले आहे.
खाणींनंतर पर्यटन, मनोरंजन, अबकारी, कॅसिनो हे आपल्या राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत बनले आहेत. या सगळ्या गोष्टींच्या नावाखाली जे जे प्रयोग सुरू आहेत, त्यात गिनीपिग बनून ते सहन करून घेणे एवढेच आपल्या हातात राहीले आहे. २०१५-१६ या वर्षी अबकारी खात्याचे उत्पन्न ३१६ कोटी रूपये होते ते २०२२-२३ वर्षी ८६५ कोटींवर पोहचले. २०१२ मध्ये ६८१८ मद्यालयांचा आकडा २०२१ मध्ये १२६०६ वर पोहचला. कॅसिनोंकडून फक्त पाच वर्षांत सुमारे एक हजार कोटी रूपयांचा महसूल सरकारला मिळाला. आता या सगळ्या खात्यांच्या महसूलात वाढ व्हायची असेल तर दारूची दुकाने, दारूचे सेवन आणि कॅसिनोंमधील जुगार खेळणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. ही संख्या वाढणार आणि तेव्हा त्याचे बरे नव्हे तर वाईटच परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेतच. आता हे वाचल्यानंतर लगेच नको रे बाबा हे अशी आपली भावना बनू शकेल. पण ते शक्य आहे का. कारण सुमारे एक लाख दयानंद सामाजिक योजनेचे लाभार्थी, दीड लाख गृहआधार, ७५ हजार लाडली लक्ष्मी हा सगळा पैसा ह्याच महसूलातून किंवा उत्पन्नातून तर खर्च केला जातो. श्रीमदभागवतात अवैध्य पैसा कमवण्याच्या यादीत दारू, जुगाराचा समावेश असला तरी त्यापासून आता आमची मुक्तता नाही हे खरेच आहे, बाकी श्रीमदभागवतातील अन्य गोष्टींवर लक्ष देऊन तिथे काही सुधारणा घडवणे शक्य आहे का, तेच आपण पाहु.