इन्कलाब झिंदाबाद !

गोव्याचा युवक आपल्या जमीन, रोजगार, पर्यावरण आणि भवितव्याबाबत निर्भयपणे सवाल करू लागला, तर त्याच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल की त्याच्या सवालांनाच समस्या मानून त्यांना दिमागी नक्षल म्हटले जाईल ?

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन करत त्यांच्या दुर्दम्य साहसाने स्वातंत्र्यलढ्याला नवी धार दिल्याचे म्हटले. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भगतसिंगांची भावना भारतातील युवकांच्या साहस आणि दृढनिश्चयाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले. भगतसिंग युवकांचे प्रेरणास्थान आहेत, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

पण या निमित्ताने एक प्रश्न विचारायला हवा. आजचा युवक खरोखर भगतसिंगांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन प्रश्न विचारू लागला, तर त्याचे स्वागत होईल काय ? भगतसिंग म्हणजे केवळ टोपी घातलेली छायाचित्रातील क्रांतिकारी प्रतिमा किंवा हौतात्म्याची गौरवगाथा नव्हे. भगतसिंग वाचत होते, लिहीत होते, तर्क करीत होते आणि प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारत होते. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेणे म्हणजे केवळ घोषणा देणे नव्हे; अन्याय वाटणाऱ्या गोष्टींबाबत निर्भयपणे प्रश्न उपस्थित करण्याची वृत्तीही त्यात अभिप्रेत आहे.

गोव्याच्या संदर्भात हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. गोव्याचा युवक रोजगार कुठे आहे, असा प्रश्न विचारतो. आपल्या गावातील डोंगर का कापले जात आहेत, शेतजमिनींचे रूपांतर का होते, पाण्याचे स्रोत सुरक्षित राहतील काय, मोठ्या प्रकल्पांचा गावाच्या पर्यावरणावर आणि लोकजीवनावर काय परिणाम होईल, असा सवाल करतो. आपल्या जमिनी, नद्या, जंगल आणि गावांचे अस्तित्व जपण्यासाठी आवाज उठवतो.

अशा प्रश्नांकडे सरकारविरोध किंवा विकासविरोध म्हणून पाहण्याऐवजी लोकशाहीतील सहभाग म्हणून पाहण्याची गरज आहे. अर्थात आंदोलन करणाऱ्यांनीही कायद्याच्या आणि शांततामय लोकशाही प्रक्रियेच्या चौकटीत राहणे अपेक्षित आहे. पण सरकार कोणत्याही पक्षाचे असो, प्रश्न विचारण्याचा नागरिकांचा अधिकार मान्य करणे ही लोकशाहीची मूलभूत कसोटी आहे.

हा मुद्दा केवळ मोदी सरकार किंवा भाजपपुरता मर्यादित नाही. काँग्रेस असो, प्रादेशिक पक्ष असोत किंवा भविष्यात सत्तेवर येणारे कोणतेही सरकार असो. विरोधात असताना अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार आणि सत्तेत आल्यानंतर टीकेबाबत असहिष्णुता, अशी विसंगती कोणत्याही पक्षासाठी योग्य ठरणार नाही.

भगतसिंगांना पुष्पहार घालणे सोपे आहे; भगतसिंगांसारखी चिकित्सक वृत्ती घेऊन प्रश्न विचारणाऱ्या नव्या पिढीला लोकशाहीत पुरेशी जागा देणे अधिक कठीण आहे.

म्हणून भगतसिंगांच्या जयंतीनिमित्त गोव्याच्या युवकांनीही स्वतःला विचारावे, भगतसिंग आपल्यासाठी केवळ इतिहासातील प्रतिमा आहेत की विचारांची प्रेरणा?

आणि सत्तेनेही स्वतःला विचारावे, गोव्याचा युवक आपल्या जमीन, रोजगार, पर्यावरण आणि भवितव्याबाबत निर्भयपणे सवाल करू लागला, तर त्याच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल की त्याच्या सवालांनाच समस्या मानून त्यांना दिमागी नक्षल म्हटले जाईल?

लोकशाहीच्या दृष्टीने या प्रश्नाचे उत्तरच भगतसिंगांना अधिक अर्थपूर्ण अभिवादन ठरेल.

  • Related Posts

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    एका घराच्या हक्कासाठी तीन पिढ्यांनी लढायचे आणि सरकारने प्रत्येक वर्षी नवी मुदत द्यायची, यालाच विकसित गोवा म्हणायचे काय? माजी मुख्यमंत्री तथा माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे…

    आल्वारा जमिनी; आव्हान स्वीकारा !

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महसूल अधिकाऱ्यांसह आमच्यासोबत बैठक घ्यावी. या बैठकीत आल्वारा जमिनींसंदर्भातील गैरकारभाराची सर्व प्रकरणे आम्ही त्यांच्यासमोर ठेवू. त्यानंतर ते नेमकी कोणती कारवाई करतात, तेच पाहायचे आहे. हे…

    You Missed

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    15/10/2026 e-paper

    15/10/2026 e-paper

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process