अँथोनी डिसिल्वा यांचे विरोधकांना आवाहन
गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)
भाजपची राजवट गोव्याच्या मुळावरच आली आहे. काँग्रेसच्या चुका सुधारून भाजप राज्याला चांगले शासन देईल, अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र, जनतेचा पूर्णतः अपेक्षाभंग झाला आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचायचे असेल, तर विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. विरोधकांनी जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता आपापसातील मतभेद दूर सारून एकजुटीने भाजपचा सामना केला, तरच सत्तांतर शक्य आहे, असे मत आंबेली-वेळ्ळीचे सामाजिक कार्यकर्ते अँथोनी डिसिल्वा यांनी व्यक्त केले.
गोव्याच्या हितरक्षणासाठी राज्यातील विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते काम करत आहेत. या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्याचा पहिला शत्रू भाजप आहे आणि या शत्रूला सत्तेवरून खाली खेचणे हे प्राधान्य आहे. विधानसभेबाहेर कितीही आदळआपट केली किंवा आरोप-प्रत्यारोप केले, तरी त्याचा काही उपयोग नाही. विधानसभेत पोहोचून राज्याच्या हितासाठी कायदे तयार करणे गरजेचे आहे.
विधानसभेत दाखल होण्यापूर्वीच विरोधी पक्ष एकमेकांना अटी घालत असल्याचे पाहून वाईट वाटते. विरोधकांची ही कृती पाहिल्यानंतर तेच भाजपला पुन्हा सत्तेत येण्यासाठी मदत करत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विरोधकांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असेही डिसिल्वा म्हणाले.
मसुदा तयार करून विधानसभा रिंगणात उतरा
आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी दोन प्रमुख मागण्या विरोधकांसमोर ठेवल्या आहेत. गोंयकारांची व्याख्या स्पष्ट करणे, गोव्याच्या जमिनींच्या संवर्धनासाठी भक्कम कायदा तयार करणे. विरोधकांनी आत्ताच पुढाकार घेऊन चर्चेअंती हे दोन्ही मसुदे तयार करावेत. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असल्याने त्यांनी पुढाकार घ्यावा. सर्व विरोधी पक्ष व समविचारी विधीतज्ज्ञांची मदत घेऊन हे मसुदे तयार करून विधानसभेत मांडावेत आणि त्याचे जोरदार समर्थन करावे. हे मसुदे विधानसभेत मंजूर झाले नाहीत, तरी त्याच मसुद्यांच्या आधारे आगामी निवडणुकीत भाजपचा एकत्रितपणे सामना करावा, असेही डिसिल्वा यांनी सांगितले.
म्हादईबाबतची मागणी अव्यवहार्य
म्हादईबाबत राष्ट्रीय पक्षाच्या गोवा विभागाला ठाम भूमिका घेता येणे शक्य नाही. ही मागणी मान्य होणार नाही, हे माहित असल्यामुळेच आरजीपीने ती अट विरोधकांसमोर ठेवली आहे की काय, असा सवाल अँथोनी डिसिल्वा यांनी उपस्थित केला. म्हादईच्या विषयावर दिल्लीतील नेते काय विचार करतात, यापेक्षा गोव्यातील सर्व नेत्यांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. दिल्लीतील श्रेष्ठींच्या मनात काहीही असले, तरी गोव्यातील नेते पक्षविरहित एकत्र राहिले, तरच म्हादईबाबत गोव्याचे हित जपले जाऊ शकते. प्रादेशिक पक्षच म्हादईचे हित जपू शकतो, असे नाही. कारण हा आंतरराज्य विषय असल्यामुळे कायदेशीर आणि राजकीय मार्गानेच हा विषय सोडवावा लागणार आहे.





