जयदेव मोदींच्या हुकुमाचे ताबेदार !

धारगळ डेल्टीन कॅसिनो टाउनशिपवरून सरकारवर टीका

गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)

पेडणे तालुका आणि संपूर्ण उत्तर गोव्यावर दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या धारगळ-पेडणे येथील नियोजित डेल्टीन कॅसिनो टाउनशिप प्रकल्पासाठी सामाजिक परिणाम अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. मात्र, जनतेचा विचार न करता सरकार फक्त कॅसिनो सम्राट जयदेव मोदी यांच्या हुकुमाचे ताबेदार बनून काम करत असल्याची जोरदार टीका आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली.
तिळारी जलसिंचन प्रकल्पांतर्गत अधिसूचित ओलीत क्षेत्रातील सुमारे तीन लाख चौ. मीटर जमीन सरकारने कॅसिनो कंपनीला देण्यासाठी रूपांतरित केली आहे. यावरून हे सरकार गोव्यातील पारंपरिक अस्तित्व नष्ट करण्यासाठीच काम करत आहे, असा आरोप करण्यात आला.
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असून, धारगळ येथे आयुष इस्पितळही उभारण्यात आले आहे. मात्र, स्थानिकांना रोजगारसंधी मिळत नाहीत.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळही अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असताना स्थानिकांना डावलण्यात आले आहे, आणि आता सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प सरकार पेडणेकरांवर थोपवू पाहत आहे, असा खडा सवाल मनोज परब यांनी उपस्थित केला.
कॅसिनो उद्योजकांसमोर शरणागती?
राज्यात एकीकडे मांडवी नदी कॅसिनो जुगाराचे जागतिक केंद्र बनले आहे. आता समुद्राबाहेर जमिनींवरही या उद्योगाचा वेगाने विस्तार सुरू आहे.
कॅसिनो उद्योजकांसाठी सरकारने लाल गालिचा अंथरला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दिल्लीतील गुंतवणूकदारांनी पेडणेतील किनारपट्टीच्या जमिनी विकत घेत धोकादायक परिस्थिती निर्माण केली असताना, आता अंतर्गत गावांमध्येही कॅसिनो टाउनशिपसारख्या प्रकल्पांना संधी देऊन सरकार नक्की काय साध्य करू पाहत आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थित केला.
स्थानिकांनी आतातरी आपल्या अस्तित्वाचा विचार करून रस्त्यावर उतरायला हवे, असे त्यांनी नमूद केले. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असेल, असेही युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले.
सनबर्न कडून कचरावाहू वाहन लवकरच!
धारगळ पंचायतीला सनबर्न महोत्सव आयोजकांकडून कचरावाहू वाहन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे वाहन लवकरच पंचायतीच्या ताब्यात येणार असल्याची माहिती माजी सरपंच सतीश धुमाळ यांनी दिली.
मात्र, धारगळ कॅसिनो टाउनशिप प्रकल्पाबाबत स्थानिक पंचायत मंडळ गप्प आहे. सरकारने ही जागा गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे स्थानिक पंचायतीला तिथे कोणताही अधिकार प्राप्त नाही.
या प्रकल्पाबाबत नेमके काय उभारले जाणार याची कोणतीही माहिती ग्रामसभेला देण्यात आलेली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
शेती धोरणाला सरकारचा धक्का?
सरकारने आपल्या कृषी धोरणालाच तडा दिला आहे. शेतीसाठी अधिसूचित केलेली जमीन बिगरशेतीसाठी वापरण्याची मोकळीक देणे निषेधार्ह आहे, असे मत ओलीत क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सदस्य तथा आमदार एड. कार्लूस फेरेरा यांनी व्यक्त केले.
पेडणेकरांच्या प्रश्नांचा विचार न करता आणि त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारचे प्रकल्प पेडणेकरांवर थोपवणे चुकीचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
सरकार पेडणेकरांच्या भविष्यासोबत खेळत असून त्यांच्या पुढील पिढीचे भविष्य धोक्यात आणत आहे, अशी खंत मिशन फॉर लोकल, पेडणेचे राजन कोरगांवकर यांनी व्यक्त केली.

मांडवीत लवकरच भव्य कॅसिनो जहाज !
मांडवी नदीत लवकरच भव्य कॅसिनो जहाज उतरणार आहे. या जहाजाचे बांधकाम पूर्ण झाले असून डेल्टीन कंपनीकडून त्याचे लवकरच जलप्रवासासाठी लोकार्पण होणार आहे.
शेकडो लोक एकाच वेळी या बहुमजली जहाजावर प्रवेश घेऊ शकतील आणि कॅसिनोचा आनंदही लुटू शकतील. या जहाजाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहेत. मात्र, सरकारी पातळीवर याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
डेल्टा कॉर्प कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी हार्दिक देबार यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना या नव्या जहाजाचा उल्लेख केला होता.

  • Related Posts

    ‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

    ‘सीईओ’ च्या कानउघडणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) पणजी मतदारसंघात ३० पैकी २८ बुथस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) अचानक बदली करण्यात आल्याचे प्रकरण सिटीझन्स फॉर डेमोक्रेसीचे एल्वीस गोम्स यांनी बरेच लावून…

    राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

    मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) कारापूर-साखळी येथील लोढा कंपनीच्या वन गोवा पंचतारांकित प्रकल्पासाठी विक्री झालेल्या जमिनीच्या मालकीवरून केरी-सत्तरी येथील राणे कुटुंबात भाऊबंदकी सुरू आहे. या प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजीत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

    ‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

    13/06/2025 e-paper

    13/06/2025 e-paper

    “दया, कुछ तो गडबड है…”

    “दया, कुछ तो गडबड है…”

    12/06/2025 e-paper

    12/06/2025 e-paper

    राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

    राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

    न्यायदानात गोव्याची घसरण

    न्यायदानात गोव्याची घसरण
    error: Content is protected !!