
काँग्रेस – आपचे झगडे चव्हाट्यावर
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी पहिल्यांदा दिल्ली सांभाळावी आणि मगच गोव्यात येण्याचा विचार करावा. दिल्लीत आपची काय परिस्थिती झाली हे सर्वांनीच पाहीले आहे. आपले घर आधी सांभाळा आणि मगच गोव्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या घोषणा करा,असा टोला काँग्रेसच्या सहप्रभारी डॉ.अंजली निंबाळकर यांनी लगावला.
गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. प्रतिक्षा खलप यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आणि शपथ देण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या गरजल्या. यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा, प्रभारी माणिकराव ठाकरे, राष्ट्रीय सचिव डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार कार्लूस आल्मेदा आदी हजर होते.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी अलिकडेच गोवा भेटीत आगामी जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणूका आप स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर पक्षाचे राज्य निमंत्रक एड. अमित पालेकर यांनीही एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यावर टीकात्मक भाष्य केले होते. या एकमेकांविरोधातील वक्तव्यबाजीमुळे दोन्ही पक्षांचे संबंध बिघडले असून आज काँग्रेसकडून या सगळ्या गोष्टींचा समाचार घेण्यात आला.
घरभेदीना हाकलून लावणे काळाची गरज
गुजरातेत काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी बोलताना पक्षातील अंतर्गत घरभेदीना पक्षातून हाकलून लावण्याबाबत महत्वाचे विधान केले होते. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी या वक्तव्याचा पुर्नउल्लेख करून गोव्यातही पक्षातीलच लोक पक्षविरोधी कारवाया करत आहेत आणि त्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखविण्याची गरज आहे. सत्ताधारी पक्षाचा सामना करण्याचे सोडून या अंतर्गत विरोधकांना तोंड देण्यातच सगळी ताकद पणाला लागते,अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. प्रतिक्षा खलप यांच्या निवडीचे स्वागत करून प्रदेश काँग्रेसचा त्यांच्या कार्याला पूर्ण पाठींबा मिळणार असल्याची हमी त्यांनी दिली.
अतृप्त घटकांनी पक्षाचा राजीनामा द्यावा
पक्षांतर्गत काही अतृप्त घटक पक्षविरोधी काम करत आहेत. ही बेशीस्ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ज्यांना पक्षात राहण्यात रस नाही त्यांनी खुश्शाल पक्ष सोडावा, असा सल्ला पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिला. यापुढे बेशिस्ती आणि पक्षविरोधी कारवायांची माहिती मिळाल्यास थेट कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
आप, तृणमुलने माघार घ्यावी
गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर करायचे असेल तर आप, तृणमूल काँग्रेस पक्षाने २०२७ च्या निवडणूकीत उतरू नये,असे आवाहन डॉ.अंजली निंबाळकर यांनी केले. २०२२ च्या निवडणूकीत या पक्षांनी काँग्रेसचे नुकसान केले. आता पुन्हा एकदा हे पक्ष निवडणूकीत उतरणे म्हणजे जाणीवपूर्वक भाजपला मदत करण्यासाठीच ते हे करत असल्याचे सिद्ध होईल,असा चिमटा डॉ.निंबाळकर यांनी काढला.