आत्ताची आक्रमणे ही अंतर्गत आहेत. इथे गोव्यावर भारतीयांचेच राज्य असेल भारतीय गोंयकार मात्र आपले अस्तित्व गमावून बसेल की काय, अशी परिस्थिती आहे.
राज्यातील एक अभ्यासू आणि युवा सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी नवीन वर्षात प्रत्येकाने किमान दिवसातील पाच मिनिटे तरी आपल्या गावासाठी द्यावीत, असे आवाहन केले आहे. ह्याचवेळी रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी नवीन वर्ष शुभेच्छा पोस्टात २०२५ मध्ये क्रांती होणार, असे संकेत दिले आहेत. सामाजिक आणि राजकीय पटलावर युवापिढीत एक जोश, आत्मविश्वास प्राप्त करून देणाऱ्या या दोन तरुणांच्या आवाहनांनी निश्चितच एक सकारात्मकता तयार करण्यात यश मिळवले आहे.
पूर्वीच्या राजवटी आणि त्यात ४५१ वर्षांची पोर्तुगीजांची प्रदीर्घ राजवट सहन करूनही गोव्याने आपले अस्तित्व राखून ठेवले. गोवा मुक्त होऊन भारताचा भाग बनल्यानंतर आत्ताच कुठे फक्त ६३ वर्षे झाली आहेत. आपल्याच देशाचा एक भाग असतानाही आपल्या गोव्याच्या भवितव्याबाबत आपण चिंतीत होणे हे नेमके काय आहे, असा सवाल सहजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनांत उत्पन्न झाला असेल. पूर्वीची आक्रमणे ही विदेशी राजवटींची होती. आत्ताची आक्रमणे ही अंतर्गत आहेत. इथे गोव्यावर भारतीयांचेच राज्य असेल भारतीय गोंयकार मात्र आपले अस्तित्व गमावून बसेल की काय, अशी परिस्थिती आहे.
आपल्या देशाने संघराज्य पद्धती अवलंबिली आहे. इथे सगळी राज्ये मिळून देश बनतो. प्रत्येक राज्याला आपली भाषा, संस्कृती तथा वेगळेपण जपण्याचा अधिकार आहे. जमीन हा राज्यांतर्गत विषय असून याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना आहेत. गोव्याच्या जमिनींची संसाधने कोमुनिदाद आणि भाटकारांकडे आहेत. या कोमुनिदाद आणि भाटकारांना जमिनींचे मोल लक्षात आल्यामुळे त्यांच्यातीलच काही झारीतील शुक्राचार्यांनी जमिनींचे सौदे करून जमिनी बड्या बिल्डर आणि रिअल इस्टेटवाल्यांच्या घशात घालण्यास सुरुवात केली आहे.
राजकारणाची सूत्रे वेगवेगळ्या लॉबींनी हातात घेतली आहेत. या लॉबींचे प्रतिनिधी आमदार म्हणून निवडून येत आहेत आणि आपापल्या लॉबींसाठी काम करत आहेत. या बदल्यात पैशांचा वापर करून या नेत्यांनी आपापले मतदारसंघ आपली वैयक्तिक जहागिरदारी बनवली आहे. हे काही नेते या मतदारसंघांचे जहागिरदार बनल्याने कुठलेही सरकार असले तरी हे नेते तिथे सत्तेचे वाटेकरी बनत आहेत. ही जहागिरदारी मोडून काढणे कठीण बनत आहे. भाजपने लोकांच्या मनांत आशा पल्लवित करून सत्ता मिळवली परंतु सत्तेच्या लालसेपोटी भाजप या जहागिरदारांना बळी पडला. अशावेळी बहुजन समाजातील युवकांनी पुढे येऊन एक नवी क्रांती सुरू केली. सत्तेच्या आणि आर्थिक बळाच्या जोरावर ही क्रांती थोपविण्यात विविध राजकीय जहागिरदारांनी यश मिळवले असले तरी या क्रांतीच्या मशालीचा भडका कधीही उडू शकतो हे ते जाणून आहेत. हा भडका न उडू देता ही मशाल विझवण्याकडेच त्यांचे लक्ष आहे. जनता गुलाम बनली आहे. दडपण आणि दबावाच्या बळावर कुणीही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बाहेर पडायला तयार नाही. या जनतेला निर्भय बनवण्याचे आव्हान या क्रांतीकारकांसमोर आहे. प्रतिक्षा आहे योग्य क्षण किंवा योग जुळून येण्याची. हा योग जुळून आला तरच या गोष्टी साध्य होतील किंवा आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल कारण परिस्थिती ही बदलत राहते हा निसर्गाचा नियम आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.