खोल खोल पाणी…


खरोखरच असेच चालणार की सरकारला या सगळ्या गोष्टींची धग जाणवणार? हे काळच ठरवेल.


राज्यात नेमके काय चालले आहे, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. कुणावरही आणि कशावरही सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. या परिस्थितीचा किंचितही परिणाम सरकारी नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ते बिनधास्तपणे “सगळे आलबेल आहे” अशा थाटात वावरत आहेत. अशा प्रसंगी सरकार बेपर्वा वागत आहे की जनताच संभ्रमात आहे, हेच कळेनासे झाले आहे.
राज्यात एकीकडे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. खून, मारामाऱ्या, रस्ते अपघात, हल्ले, लैंगिक अत्याचार, चोऱ्या हे आता नेहमीचेच झाले आहेत. याच दरम्यान सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेण्यासंबंधीच्या प्रकरणाने उचल घेतली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने आयएएस अधिकारी, अभियंता आणि एका मंत्र्याचे नाव घेऊन खळबळ उडवली आहे.
हे सगळे सुरू असतानाच नगर नियोजन खात्याकडून कलम ३९(ए) अंतर्गत भूरूपांतराच्या अधिसूचना एकापाठोपाठ एक जारी करण्याचा सपाटा सुरू आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण नेमके कुठे चाललो आहोत, हेच समजेनासे झाले आहे.
राज्यात एकीकडे स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद सुरू असतानाच सिद्धण्णा मेटी यांनी या वादात तेल ओतण्याचे काम केले आहे. मूळ गोंयकारांचा झेंडा घेऊन वावरणाऱ्या आरजीपी पक्षाला डिवचण्याचे काम मेटी यांनी केले. अर्थात, या वादामुळे गोंयकार एकत्र येणार नाहीत, पण परप्रांतीयांची एकजूट होईल, हे काही धूर्त राजकारणी बऱ्यापैकी ओळखून आहेत.
पूर्वी या वादामुळे दचकून असलेले अनेकजण आता उघडपणे बाहेर येऊन गोंयकारपणाचा अभिमान बाळगणाऱ्यांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे निश्चितपणे मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव काही राजकीय नेते खेळत आहेत, हे यातून अधोरेखित होते. या ध्रुवीकरणाच्या नादात गोव्याची शांतता आणि सामाजिक बांधिलकी बिघडू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
ही काळजी आपण तर घेऊच, पण परप्रांतीयांनीही घेणे गरजेचे आहे. काही राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी त्यांना जाणीवपूर्वक विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी वापरण्याचा धोका असल्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे पोलिस यंत्रणेला, विशेषतः गुप्तचर विभागाला, बारीक नजर ठेवावी लागेल.
या एकंदर परिस्थितीत लोकांसमोर फक्त एकच चेहरा प्राधान्याने दिसतो, तो म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाकी मंत्रीमंडळातील एकही चेहरा जनतेसमोर नाही. सर्वत्र केवळ मुख्यमंत्रीच दिसत आहेत, असे चित्र तयार झाले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जसे केंद्रबिंदू बनले आहेत, तशीच रणनिती भाजपने राज्यस्तरावरही अवलंबली आहे,केवळ मुख्यमंत्रीच दिसतील, अशी.
सहाजिकच, या सगळ्या गोष्टींचे खापर मुख्यमंत्र्यांवरच फोडले जात आहे आणि तेच टीकेचे धनी बनत आहेत. या टीकेबाबत त्यांना काहीच वाटत नसल्याचे त्यांच्या अविर्भावावरून स्पष्टपणे दिसून येते. सरकारने वेगवेगळ्या गोष्टींतून मतदारांना कसे बांधून ठेवले आहे आणि मतदार भाजपच्या कलानेच वागतील, असा आत्मविश्वास त्यांना वाटतो. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला हे सरकार काडीचीही किंमत देत नाही, हे त्यांच्या वागणुकीवरून स्पष्ट होते. खरोखरच हे असेच चालणार? की सरकारला या सगळ्या गोष्टींची धग जाणवणार? हे काळच ठरवेल.

  • Related Posts

    भाजप महिला जागी हो !

    भाजपमधील महिला संघटनात्मक पातळीवर सक्रिय असूनही समाजातील महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिलांशी संबंधित विषयांवर गप्प का राहतात, हा खरा चर्चेचा विषय आहे. महिला हीच खरी भाजपची ताकद आहे. भाजपाच्या यशात…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    पोलिस खाते असे वागू लागले तर ती धोक्याची सूचना आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास गेला तर प्रत्येकजण न्यायासाठी स्वतःचा मार्ग पत्करू लागेल. प्रत्येकाने स्वतःच न्यायनिवाडा सुरू केला तर राज्यात अराजकता माजण्यास…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…