भक्तीभावात आणि शांततेत जत्रोत्सव पार पडणार
कुंकळ्ळी, दि. २३ (प्रतिनिधी)
फातर्पेतील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीचा वार्षिक जत्रोत्सव ४ ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत साजरा होणार आहे. या जत्रोत्सवात परंपरागत धार्मिक सलोख्याचे जतन करून भक्तीभाव आणि शांततेत हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय महाजन मंडळींनी घेतला आहे. राज्यातील काही देवस्थानांत मुस्लीम धर्मिय व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचे सत्र सुरू असतानाच राज्यातील सर्वांत मोठा जत्रोत्सव म्हणून ख्याती प्राप्त या देवस्थान समितीने धार्मिक सलोख्याबाबत तडजोड न करण्याचा निश्चय करून सर्वधर्म समभावाचा आदर्श जपला आहे.
आमसभा शांततेत पडली पार
फातर्पेतील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणींच्या जत्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अलिकडेच देवस्थान समितीची आमसभा पार पडली. या सभेत विविध विषय चर्चेला घेण्यात आले. या चर्चेत परंपरागत जत्रौत्सवाशी संबंधीत विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. आमसभेसमोरील विषय यापूर्वीच ठरलेले असतात आणि त्यामुळे या विषयांत बदल करता येत नाहीत आणि त्यामुळे अन्य विषयांबाबत कुठलीच चर्चा या सभेत झाली नाही,अशी माहिती देवस्थानच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.
धार्मिक एकोप्याचा आदर्श
आपला गोवा हा धार्मिक एकोप्याचे आदर्श राखणारे राज्य आहे. आपल्याकडे विविध धर्मियांचे ऋणानुबंध असून कधीच धार्मिक तेढ निर्माण झालेली नाही. इतिहासात मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मगुरूंनी तथा राज्यकर्त्यांनी हिंदूंवर अत्याचार आणि जुलुम करण्याचे प्रकार घडले आहेत. तरिही हिंदूंनी आपल्या मनगटाच्या बळावर आपले अस्तित्व टीकवून ठेवले. आज वर्तमान वेगळे आहे आणि या वर्तमानात इतिहासाची भूती उरकून काढून समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करणे योग्य नाही,असे मत राज्यभरातील विविध नागरिकांत व्यक्त होत आहे.
देवस्थान समित्यांनी खबरदारी घेण्याची गरज
राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने काही घटक देवस्थान समित्यांच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हे निर्णय लादण्याचे काम करत आहेत. अशा लोकांपासून देवस्थान पदाधिकाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. देवस्थानचे काही मोजकेच महाजन मंडळी ही आमसभेला हजर असते. अशा आमसभेत कार्यक्रम पत्रिकेवर उल्लेख न केलेल्या विषयांवर निर्णय घेताना विचार करण्याची गरज आहे. देवस्थाने या खाजगी संस्था आहेत हे जरी खरे असले तरी आपल्याला कायद्याने आणि संविधानाच्या कक्षेतच वागावे लागणार आहे. संविधानाच्या कक्षेबाहेर जाऊन एखादा निर्णय घेतल्यास तो बुमरँग होण्याचीच अधिक शक्यता असल्याने त्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया जाणकारांनी दिल्या आहेत.