
सतत तीन वेळा सत्तेवर राहिलेल्या भाजपला लोक कंटाळल्याने आपल्याकडेच सत्ता येईल, अशा भ्रमात विरोधक आहेत. त्यामुळे विरोधी मतविभाजन होऊन त्याचा लाभ भाजपला होणार, हे तर स्पष्टच आहे.
विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी असताना भाजपने आधीच प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. विविध मतदारसंघांत कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन सुरू आहे. काल पणजीत झालेल्या सक्रिय कार्यकर्ता मेळाव्यात भाजपने २०२७ मध्ये २७ जागा आणि ५२ टक्के मतांच्या टक्केवारीचे लक्ष्य ठेवल्याचे जाहीर केले. अर्थात संघटन नियोजन आणि कार्यवाहीत भाजपला कुणीच तोड नाही. गेली १४ वर्षे राज्यात आणि १२ वर्षे देशात सत्तेवर राहिल्यामुळे पक्षाची तिजोरी भरलेली आहे. पैशांची आणि सत्तेमुळे लोकांची कमी नसल्यामुळे मेळावे, संमेलनांचा सुकाळ येण्यात काहीच अडचण नाही.
चिंतेची बाब एकच आहे की या पक्ष मेळाव्यांत राज्यासमोरील प्रमुख विषयांवर चर्चा कमी आणि राजकारणावरच चर्चा अधिक दिसते. भाजपचे कार्यकर्ते सजग आहेत, असा समज आहे. मात्र, अलिकडे कार्यकर्त्यांना केवळ हुकुमाचे ताबेदार बनवण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा खांब आहे. या कार्यकर्त्यांनी आपला ताठ कणा ठेवला तरच हे राज्य सुरक्षित राहणार आहे, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवण्याची गरज आहे. मेळावे आणि संमेलनांतून केवळ कार्यकर्त्यांना आभासी जग दाखवून काळोखात ठेवण्यापेक्षा त्यांना वास्तव आणि खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देणे ही पक्ष नेतृत्वाची जबाबदारी आहे.
राज्यात एकीकडे भाजपात निवडणूक ज्वर चढला असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. कुठेतरी एखाद दुसरी बैठक, त्यात जेमतेम कार्यकर्ते आणि या बैठकीत पक्षाला सत्तेवर आणण्याच्या आणाभाका—अशी दारुण अवस्था सर्वाधिक काळ राज्यात सत्तेवर असलेल्या या पक्षाची बनली आहे.
पक्षाने मंडळांची पुनर्निर्मिती केली असली तरी त्यांची घोषणा करण्याचे धाडसही पक्ष गमावून बसला आहे. कारण घोषणा झाली की लगेच ती माणसे कधी भाजपच्या गळाला लागतात, हे पक्ष नेतृत्वालाच कळत नाही, अशी परिस्थिती आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रीय सचिव डॉ. अंजली निंबाळकर हे आपल्या परीने पक्षात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न करत असले तरी स्थानिक नेतृत्वच अस्थिर आणि संशयी बनल्याने हे काम पुढे जाताना दिसत नाही.
काँग्रेसची पारंपरिक २५ टक्के मते राज्यात आहेत. त्यात आणखी १० टक्के मतांची भर घालण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी पक्षाला राज्यव्यापी मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. जुन्या वैभवाच्या जोरावर पक्षाचे नेते स्वप्ने पाहत आहेत. जनता भाजपला कंटाळलेली आहे. ती आपोआप काँग्रेसच्या पदरात मतदान टाकेल, ही मुंगरेलालची स्वप्ने ठरणार आहेत. पक्षाला जनमानसात विश्वास संपादन करावा लागणार आहे. भाजपला तोंड देण्याची काँग्रेसची ताकद आहे, हे दाखवून द्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपकडे जाणार नाही, हे लोकांना पटवून देण्याची गरज आहे.
राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील सध्याची परिस्थिती पाहता विरोधकांत एकमत होणे अशक्य वाटते. सतत तीन वेळा सत्तेवर राहिलेल्या भाजपला लोक कंटाळल्याने आपल्याकडेच सत्ता येईल, अशा भ्रमात विरोधक आहेत. त्यामुळे विरोधी मतविभाजन होऊन त्याचा लाभ भाजपला होणार, हे स्पष्ट आहे.
भाजपात दाखल झालेल्या नव्या नेत्यांमुळे जुने नेते नाराज आहेत. निवडणुकीत उमेदवारींवरून पक्षात नाराजीचा स्फोट होईल, हे देखील तितकेच खरे. परंतु त्यांना विरोधकांनी सामावून घेतल्यास निवडणुकीनंतर हे सगळे नेते पुन्हा भाजपात जाण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांना सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.
तत्पूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीत खरी कसोटी आहे. तिथूनच अंतिम सामन्याच्या परिस्थितीचे चित्र तयार होईल. पण या सेमी फायनलसाठी तरी काँग्रेसची तयारी अद्यापही दिसत नाही.