
भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा आणि त्यातील काही प्रमाणात जनतेवर खर्च केल्यानंतर एक प्रकारचे देवत्व प्राप्त होते आणि जनता डोक्यावर घेऊन अशा लोकांना नाचते.
फक्त पेडणे तालुक्यातील रेती व्यावसायिकांकडून महिन्याला १ कोटी रुपयांचे कलेक्शन केले जाते. यावरून भ्रष्टाचाराची गती किती पुढे आहे, हे लक्षात येते. अलिकडे “भ्रष्टाचार” हा शब्दच हरवलेला आहे. भाजपच्या काळात एकापेक्षा एक घोषवाक्ये जाहीर झाल्याने “भ्रष्टाचारमुक्त” हे पारंपरिक घोषवाक्य पूर्णतः हरवले आहे.
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वाहतूक खात्याच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगण्याचा एक भाग म्हणून थेट पत्रादेवीतील आरटीओ चेकपोस्टवर धडक दिली होती. केवळ दोन दिवसांत काही तासांतच ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांनी जमा केली. यावरून तिथे काय पैशांचा धबधबा सुरू असतो, हे लक्षात येते.
वाहतूक, गुन्हेगारी आदींसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणारे सरकार आरटीओ चेकनाक्यांवर काही लाख रुपयांचा खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरा का लावत नाही, याचे उत्तर मिळाले असते तर बरे झाले असते.
बस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी सुदीप ताम्हणकर यांना या आंदोलनापासून रोखण्यासाठी मोपा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तिथे दाखल झाले होते. त्यांनी सुदीप ताम्हणकर यांना आंदोलन बंद करण्याची विनंती केली होती. आपण राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून लवकरात लवकर तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
आता बरेच दिवस उलटून गेल्यानंतर ताम्हणकर यांनी याचा जाब मोपा निरीक्षकांना विचारला असता, सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले नाही आणि मोपाचे निरीक्षकही रजेवर असल्याची माहिती मिळाली. आता पुन्हा नव्याने आंदोलन छेडण्याची तयारी वाहतूकदारांनी केल्याने सरकार या प्रकरणी नेमके काय करते, ते पाहावे लागेल.
काही अपवाद वगळता बहुतांश सगळीच खाती भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहेत. पहिल्यांदाच भ्रष्टाचाराला मान्यता मिळाल्यागत परिस्थिती ओढवली आहे. भ्रष्टाचाराविरोधात कितीही तक्रारी दाखल केल्या तरी त्यांना फरक पडत नाही.
भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा आणि त्यातील काही प्रमाणात जनतेवर खर्च केल्यानंतर एक प्रकारचे देवत्व प्राप्त होते आणि जनता डोक्यावर घेऊन अशा लोकांना नाचते. कुणी एखादा न्यायालयात गेलाच तर त्याचा सामना करायची तयारी त्यांनी ठेवली आहे. त्यांना काहीच फरक पडत नाही.
एकेका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या सूरस कथा ऐकल्यावर काय भयानक परिस्थिती राज्यावर ओढवली आहे, याची ओळख झाल्याशिवाय राहत नाही. भ्रष्टाचाराचे विक्रम केलेल्या बहुतांश विक्रमविरांना भाजपने आपल्या पक्षात घेतले आहे.
या विक्रमविरांच्या संस्काराने भाजपातही आता भ्रष्टाचाराचे बीज अंकुरले आहे आणि हळूहळू पाहता भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपने कधीच काँग्रेसला मागे टाकले आहे.
आता तुम्ही म्हणाल एवढा गंभीर आरोप तुम्ही कसा काय करू शकता. या गोष्टीला वेगळ्या आरशाची गरज नाही. सत्ता आणि दादागिरीमुळे कदाचित जनता भीतीच्या छायेखाली असेलही, पण एक वेळ येईल जेव्हा या भ्रष्टाचाराचे दाखले पावलोपावली जनता सादर करेल.
दीर्घकाळ सत्तेवर राहिल्यामुळे भाजपला याचे महत्त्व कदाचित कळणारही नाही. परंतु सत्तेतून बाहेर पडल्यावर या सगळ्या गणितांचा हिशेब जनताच सादर करणार आहे, हे मात्र नक्की.