लोकमान्य टिळकांचे विचार आणि आजचा वर्तमान

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी. त्यांनी केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याचा पाया रचला. परकीय सत्तेमुळे आपण कसे कंगाल झालो, आपली शेती, व्यापार इंग्रज सत्तेने कसा उद्ध्वस्त केला याची जनजागृती त्यांनी केली. देशबंधूंवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला त्यांनी निर्भीडपणे वाचा फोडली. इंग्रजी कायदे आणि जुलमी राजवटीवर त्यांनी कठोर टीका केली.
टिळकांचा कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून तो सोप्या उदाहरणांसह मांडण्याचा हातखंडा विलक्षण होता. त्यांना भारतीय जनतेच्या मानसिकतेचे अचूक ज्ञान होते. म्हणूनच आजचा दिवस सर्व पत्रकारांनी आत्मचिंतनाचा दिवस मानावा. टिळक आपल्या अग्रलेखातून जे विचार मांडत होते, ते आजही तंतोतंत लागू पडतात.
४ जानेवारी १८८१ रोजी केसरीचा पहिला अंक प्रसिद्ध करताना त्यांनी लिहिले:
“नवीन वर्तमानपत्राची गरज काय? दोन-चार नामांकित वर्तमानपत्रे वगळता बाकीच्यांची स्थिती पाहिली तर वर्तमानपत्र म्हणजे केवळ बातम्या प्रसिद्ध करण्याचे साधन. पत्रकर्त्याच्या मनात यापलीकडे काही अर्थ येत नाही. परंतु वर्तमानपत्राने आपले काम निपक्षपातीपणे आणि निर्भीडपणे बजावले, तर सरकारी अधिकाऱ्यांवर मोठा दबदबा राहतो.”
दुर्दैवाने आज अनेक वर्तमानपत्रे केवळ जाहिराती मिळवून पैसे कमावण्याचे साधन बनली आहेत. काही तर राजकीय पक्षांची मुखपत्रे झाली आहेत. टिळकांची अपेक्षा होती की वर्तमानपत्रे सरकारी धोरणांचे संतुलित विश्लेषण करून जनतेच्या हितासाठी सरकारवर अंकुश ठेवतील.
शिक्षण आणि समाज
इंग्रज सरकारने सुरू केलेली शिक्षणपद्धती राष्ट्रासाठी कशी मारक आहे, हे टिळकांनी अनेक लेखांमधून स्पष्ट केले. “खरे विद्यापीठ कोणते?” या २५ फेब्रुवारी १८९६ च्या लेखात ते म्हणतात:
“युरोपियन विद्यापीठांचे अनुकरण करताना आमच्या पारंपरिक विद्यामंदिरांचा र्‍हास झाला आहे. विद्येचा सखोल अभ्यास करणारे संशोधक आमच्या देशात निर्माण होत नाहीत. विद्यापीठ म्हणजे विद्यामंदिर नसून परीक्षा घेणारी कंपनी झाली आहे.”
आजही ही परिस्थिती बदललेली नाही. “राष्ट्रीय शिक्षण” या २७ फेब्रुवारी १९०८ च्या अग्रलेखात टिळक म्हणतात:
“हल्लीच्या शिक्षणामुळे हलके काम करण्याची लाज वाटते, फाजील अभिमान शिरतो, डौलाचा शिरकाव होतो आणि मनुष्य देशाच्या कार्यासाठी नालायक ठरतो. राष्ट्रीय शिक्षण मिळाले नाही तर पुढील पिढी आंधळी होईल.”
आजचा सुशिक्षित तरुण समाज आणि देशहिताकडे पाठ फिरवलेला दिसतो. गोव्यात तर सरकारी नोकरीशिवाय काही करण्याची तयारीच नाही.
नोकरशाही आणि मानसिक दौर्बल्य
“परवश झालेल्या नेटिव्ह अंमलदारांचे मानसिक दौर्बल्य” या लेखात टिळकांनी सरकारी नोकरशाहीचे जे वर्णन केले आहे, ते आजही लागू पडते. ते म्हणतात:
“पांढरपेशा वर्ग बुद्धीने श्रेष्ठ असूनही स्वाभिमान बोथट झालेला आहे. सनदांचे अर्थविपर्यास, सारा वाढवणे, लोकांची जंगले घेणे याबाबतच्या युक्त्या याच वर्गाने परकीय सत्तेला शिकवल्या. सरकारी सेवेत तेजस्वी तरुण पडल्यावर थप्पड खातो आणि लवकरच दुसरा मार्ग स्वीकारतो.”
आजही सरकारी अधिकारी कायदे दुरुस्त करून पर्यावरणाचा ऱ्हास करतात, भू-माफियांना मोकळे रान देतात आणि भ्रष्टाचाराचे मार्ग दाखवतात. इंग्रजी शिक्षणपद्धती बदलली नाही, म्हणूनच आज समाजात नीतीमूल्यांचा ऱ्हास झाला आहे.
राजकारण आणि समाजहित
लोकनेते म्हणून टिळक स्वतःसाठी समाजाचा एक रुपयाही वापरत नव्हते. आज मात्र स्वतःच्या चारचाकीला पेट्रोल भरण्यासाठी विधानसभेत पगारवाढ मागणारे नेते आहेत. राजकारण समाजहितासाठी नसून स्वहिताचा धंदा बनले आहे.
पर्यावरण आणि जनजागृती
गोव्यात दर तासाला कुठे ना कुठे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सरकारकडे कायद्याचे बळ आहे, पण लोकांची मतदानाची शक्ती विकली जात आहे. काही जागृत नागरिक आणि संघटना लोकांना जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण बहुतेक नागरिक स्वतःच्या सुरक्षिततेच्या कोषात अडकले आहेत.
जोपर्यंत आग आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत काही करण्याची गरज नाही, असा दृष्टिकोन ठामपणे दिसतो.
अशा परिस्थितीत वर्तमानपत्रांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून, धारदार लेखणीने जनजागृती करावी, सरकारी भ्रष्टाचार आणि पर्यावरण ऱ्हास रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा ठेवून लेख संपवतो.
– श्री. गणपत सिद्धये,
बिठ्ठोण, बार्देश- गोवा

  • Related Posts

    ते पण अवतार होते!

    मला आठवते, मी त्यावेळी पहिलीत होतो. आम्हाला ख्रिसमसची सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे शेजारच्या प्रविणसोबत खेळण्यासाठी दिवसभर त्याच्याच घरी होतो. संध्याकाळी बाबा शेतातून आले. ते संध्याकाळी माझ्याकडून प्रार्थना म्हणून घेत आणि…

    विळखा!

    काही दिवसांपूर्वी गोव्यातील हडपडे (आरपोरा) गावात आग लागण्याची घटना घडली आणि त्यात तब्बल पंचवीस जणांचा मृत्यू झाला. या भयानक घटनेनंतर वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून या घटनेबाबत उद्वेग व्यक्त करणाऱ्या बातम्या छापून आल्या.…

    You Missed

    15/01/2026 e-paper

    15/01/2026 e-paper

    विधानसभेचे पावित्र्य जपा!

    विधानसभेचे पावित्र्य जपा!

    चिंबलकरांच्या आंदोलनाला जॅमरचा चाप

    चिंबलकरांच्या आंदोलनाला जॅमरचा चाप

    युनिटी मॉलचा अट्टाहास का ?

    युनिटी मॉलचा अट्टाहास का ?

    हडफडे दुर्घटनेच्या दोषींना सरकारी अभय?

    हडफडे दुर्घटनेच्या दोषींना सरकारी अभय?

    14/01/2026 e-paper

    14/01/2026 e-paper