
आरजीपी जर गोंयकारांसाठी काम करणारा पक्ष आहे, गोंयकारांचे हित जपणारा पक्ष आहे आणि गोंयकारांच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेला पक्ष असेल तर गोंयकारांनीच या पक्षाला मदत करावी लागेल आणि या पक्षामागे आपले आर्थिक बळ उभे करावे लागेल.
रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बैठक अलिकडेच पर्वरी येथे पार पडली. या बैठकीतील पक्ष प्रमुख मनोज परब यांची हजेरी अनेकांना सुखावणारी ठरली. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर अज्ञातवासात गेलेल्या मनोज परब यांना पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचे पाहून अनेकांना आनंद वाटला. अर्थात मनोज परब यांचे राजकीय शत्रू, प्रतिस्पर्धी आणि विशेष म्हणजे अल्प काळात त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्यांचा वैयक्तिक द्वेष करणारे बरेचजण दात-ओठ चावतील हे देखील तितकेच खरे. या बैठकीत मनोज परब यांच्यासह आमदार विरेश बोरकर, सरचिटणीस विश्वेष नाईक आणि खजिनदार अजय खोलकर हे देखील बैठकीला हजर होते.
पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सरासरी १० टक्के मते मिळवून आरजीपी पक्षाने आपला ठसा उमटवण्यात यश मिळवले. अर्थात आरजीपीच्या मतांमुळे भाजपला फायदा झाला हे जरी खरे असले तरी त्यात आरजीपीची चूक काहीच नाही. इतर पक्षांची निष्क्रियता आणि काहीच काम न करता केवळ सरकारविरोधातील नाराजीवर आपली पोळी भाजून घेण्याची आस हेच त्यांना नडले हे मात्र ते सोयीस्करपणे लपवत आहेत. आरजीपीने मिळवलेल्या मतांमुळे अनेकांची झोप उडाली, पण सरकार भाजपचेच बनल्याने त्याचे खापर विरोधकांनी आरजीपीवर फोडत आरजीपीची प्रतिमा भाजपची बी टीम अशी करून टाकली. एवढे करूनही लोकसभा निवडणुकीत आरजीपीने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे या अपप्रचाराला आणखी बळ मिळाले. आरजीपीबद्दल सहानुभूती किंवा आत्मीयता असलेले अनेक लोक पक्षापासून दूरावले, हे मान्य करावेच लागेल.
राजकारणात प्रामाणिकपणाला नेहमीच प्रतिसाद मिळतोच असे नाही. अनेकदा प्रामाणिकपणाची फजितीच होते. ढोंगीपणाला भूलून लोक प्रामाणिकपणाला फटकारतात हे देखील पाहायला मिळते. पण लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी जीवाची बाजी लावल्यानंतरच कुठेतरी राजकारणात यश मिळते. ह्यात उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर या भाजप नेत्यांची नावे देता येतील. या लोकांना सहज सत्ता मिळाली नाही. पक्षाची उभारणी करण्यासाठी या लोकांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही. प्रारंभी मनोहर पर्रीकरांचीही लोक टर उडवायचे, पण आपल्या कृतीतून त्यांनी आपले राजकीय विश्व निर्माण केले. या सगळ्या लोकांना अनेक कौटुंबिक संकटांना सामोरे जावे लागले, पण त्यांनी माघार घेतली नाही, हे विसरून चालणार नाही.
आरजीपीकडे सळसळत्या युवाशक्तीची ताकद आहे परंतु राजकारणात लागणारा पैसा त्यांच्याकडे नाही. सत्ताधारी पक्ष किंवा विरोधातील प्रमुख पक्ष पैशांच्या जोरावर तग धरू शकतो, पण आरजीपीसाठी तीच मोठी अडचण ठरली आहे. उद्योजक, व्यावसायिक किंवा अन्य भांडवलदार या पक्षावर गुंतवणूक करण्यास राजी होणार नाहीत कारण त्यांचे धोरण हे त्यांच्या फायद्याचे नाही. राजकारणातील पैशांचे महत्त्व कुणीही नाकारू शकणार नाही. पण आरजीपी जर गोंयकारांसाठी काम करणारा पक्ष आहे, गोंयकारांचे हित जपणारा पक्ष आहे आणि गोंयकारांच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेला पक्ष असेल तर गोंयकारांनीच या पक्षाला मदत करावी लागेल आणि या पक्षामागे आपले आर्थिक बळ उभे करावे लागेल. ते जर गोंयकारांना करता येणे शक्य नाही तर मग इतर पक्षांची लाचारी पत्करून गुलामीचीच सवय करून घ्यावी हे त्यांच्या फायद्याचे. मग गोव्याबद्दल कितीही कळवळा केला तरी त्याचा काहीच उपयोग नाही.