
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी लक्ष देण्याची मागणी
पणजी,दि.१३(प्रतिनिधी)
बांबोळी येथील मनोरूग्ण इस्पितळाच्या विस्तारीत प्रकल्पांची कामे रखडल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी पायाभूत सुविधांअभावी डॉक्टर, नर्सेस, पेशंट अटेंडंट यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यातून मनोरूग्णांचीही मोठी परवड होते. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ह्यात लक्ष घालून ताबडतोब विस्तारीत प्रकल्प कार्यन्वीत करावा,अशी मागणी होत आहे.
मनोरूग्णांची संख्या वाढते आहे
राज्यात मनोरूग्णांची संख्या वाढते आहे. ह्यात कमी प्रमाणात लोक मनोरूग्ण इस्पितळात दाखल होत असल्याने हे रूग्ण समाजातच वावरत असतात आणि त्यातून असंख्य सामाजिक प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. मनोरूग्णांच्या सेवेसाठी खूप चांगले डॉक्टर, नर्सेस तथा अन्य कर्मचारीवर्ग याठिकाणी तैनात असतानाही पायाभूत सुविधांची कमतरता चांगल्या सेवेच्या आड येत आहे. मनोरूग्णांसाठी जिल्हास्तरीय पूर्णपणे मनोरूग्ण इस्पितळ सेवा नसल्याने अगदी सत्तरी- पेडणे ते काणकोणपर्यंतच्या रूग्णांना बांबोळीला धाव घ्यावी लागत असल्याने अनेक कुटुंबांना रूग्णांना याठिकाणी दाखल करून घेणे शक्य होत नाही. सरकारने मानसिक आरोग्य कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी चोख व्यवस्था करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
उत्कृष्ट सेवेचा आदर्श
बांबोळी येथील मनोरूग्ण इस्पितळातील डॉक्टर, नर्सेस तथा अन्य कर्मचारीवर्ग खूप चांगल्या पद्धतीने काम करत असल्याच्या प्रतिक्रिया याठिकाणी रूग्ण तथा त्यांच्या नातेवाईकांनी दिल्या. पायाभूत सुविधांचा अभाव असूनही हे लोक प्रामाणिकपणे काम करतात. ओपीडीतून रूग्णांना वॉर्डमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी वाहनांची कमतरता तसेच मनोरूग्ण इस्पितळातून रूग्णांना बांबोळीतील गोवा वैद्यकीय इस्पितळात नेण्यासाठी रूग्णवाहिकांची कमतरता असल्याने तो एक मोठा अडचणीचा विषय ठरला आहे.
नियोजित विस्तारीत प्रकल्प आदर्श
मनोरूग्ण इस्पितळाचा नियोजित विस्तारीत प्रकल्प आदर्श ठरणार आहे. याठिकाणी डे केअर सेंटरचे काम पूर्ण झाले असून लवकरच हे केंद्र कार्यन्वीत केले जाणार आहे. मनोरूग्ण विभागाच्या विद्यार्थ्यासाठी खास हॉस्टेलची उभारणी सुरू आहे. या व्यतिरीक्त अतिरीक्त १०० खाटांच्या नव्या इमारतीचेही काम सुरू आहे. विशेष लेक्चर हॉल तथा अन्य सुविधांचाही ह्यात समावेश आहे.
पेशंट अटेंडटच्या सेवेचे कौतुक
मनोरूग्ण इस्पितळातील पेशंट अटेंडटच्या सेवेचे अनेकांकडून कौतुक होत आहे. या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ अशा रूग्णांवर नजर ठेवून राहावे लागते. अनेक रूग्ण हे हिंसक बनतात, त्यावेळी त्यांना सावरावे लागते. ओपीडी ते वॉर्ड असे मोठे अंतर असल्याने तिथून चालत जाऊन ही कामे करावी लागतात. कामाच्या वेळेला पूर्णवेळ सक्रीय राहूनच या कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असल्याने जीएमसीच्या तुलनेत इथल्या पेशंट अटेंडटचे काम हे अधिक असते. माजी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात २०१४ साली भरती करण्यात आलेले पेशंट अटेंडट अजूनही कंत्राटी पद्धतीवर काम करतात. त्यांना सेवेत दहा वर्षे उलटूनही १९ हजार रूपयांच्या मोबदल्यात ते काम करत आहेत. त्यांच्यानंतर अनेक कर्मचारी नियमीत सेवेत असूनही त्यांना कायम न केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत निश्चितच न्याय देतील, या आशेवर ते आहेत.