माणूसकीची श्रीगणेशा करू !

गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आपण प्रत्येकाने हातभार लावला, तर हे जग किती सुंदर बनू शकेल नाही? मग, या चतुर्थीपासूनच या उपक्रमाची श्रीगणेशा करायची का?

नारळ म्हणजेच श्रीफळ गोंयकारांच्या खाद्यसंस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक. मग आहार शाकाहारी असो वा मांसाहारी, नारळाशिवाय गोमंतकीयांना दुसरा पर्यायच नाही. गोमंतभूमी म्हणजे नारळांचे वन. अनेक कवींनी माडांचे वर्णन करून या भूमीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. आज एकीकडे गोंयकार आपल्याच भूमीत परका होत असल्याची चर्चा सुरू असताना, नारळ आयात करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. शेजारील कर्नाटकातून नारळ आयात करून प्रती नग ₹४५ दराने विकण्याची घोषणा सरकारने केली आहे. प्रती नग ₹४५ म्हणजे स्वस्त नारळाचा दर असल्याचे सरकार म्हणते, पण हा दर गरीबांची थट्टा तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतो. गोव्यात चवथ म्हणजे गणेश चतुर्थी हा सर्वांत मोठा सण. खर्चाच्या दृष्टीनेही हा सण मोठा असतो. तरीही सामान्य गोंयकार या उत्सवात आपला उत्साह कधीच कमी पडू देत नाही. कर्ज काढून तरी हा सण उत्साहात साजरा करण्याची परंपरा गोंयकारांनी टिकवून ठेवली आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवून काही राजकारणी या सणाला आपल्या पिशव्या लोकांना पाठवत असतात. काहीही असो, त्यातून लोकांना दिलासा मिळतो हे निश्चित.
अलिकडे या खर्चाची व्याप्ती इतकी वाढली आहे की सभोवतालची परिस्थिती पाहता साधेपणाने हा उत्सव साजरा करणेही शक्य होत नाही. सरकारने नियमित कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना चतुर्थीपूर्वी पगार देण्याची घोषणा केली आहे. परंतु सरकारमध्ये सुमारे दहा हजार रोजंदारी, कंत्राटी आणि हंगामी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. अजूनही अनेकांचे तीन-तीन महिन्यांचे पगार अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांनाही चतुर्थीचा सण लागतो, पण त्यांचा साधा विचारही कुणी करताना दिसत नाही. खरी पगाराची गरज या गरीब कर्मचाऱ्यांना असते, आणि त्यांच्याप्रती सरकार अगदी असंवेदनशीलपणे वागत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी तरी सर्व कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्व आणि दिवाळीपूर्व पगार वेळेवर मिळेल, याची सोय करावी, जेणेकरून सर्वजण आनंदाने आणि उमेदीने सण साजरा करू शकतील. महागाईने आपले डोके वर काढले आहे. चतुर्थीच्या सणात तर महागाईला पारावारच राहत नाही. माटोळीचे सामान सोन्याच्या भावाने विकले जाते. पूर्वी लोक रानांत जाऊन हे सामान आणायचे, पण वेळेअभावी आणि पूर्वीची रानेच नष्ट झाल्यामुळे ही पद्धत आता बंद झाली आहे. माटोळीच्या बाजारात सामान्य माणूस फिरला, तर आपली काय लायकी आहे हेच बाजारातील भाव दाखवून देतात. याव्यतिरिक्त मुलांना नवीन कपडे, इतर सामान यांचा हिशेब केला तरीही सामान्य कुटुंबाला किमान ₹१०,००० ते ₹१५,००० खर्च येतो. इतका साधा पगारही अनेकांना मिळत नाही. सण आणि उत्सवांची आपल्याकडे कमी नाही, परंतु महागाई आणि लोकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे सण आणि उत्सव सुख व आनंद घेऊन येण्याऐवजी चिंता आणि भीती निर्माण करणारे ठरू लागले आहेत. उधारी करून लोक हे सण साजरे करतात खरे, पण ती उधारी फेडताना त्यांची पंचाईत होते, हेही तेवढेच खरे. या परिस्थितीच्या अनुषंगाने समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा स्थिर असलेल्यांनी काही प्रमाणात का होईना, आपल्या अवतीभोवतीच्या गरीबांना मदत केली आणि त्यांच्या उत्सवात आपले योगदान दिले, तर खरोखरच या सणांना एक वेगळीच मानवतेची झालर प्राप्त होईल. सण-उत्सवांना माणुसकीची नवी ओळख मिळेल. गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आपण प्रत्येकाने हातभार लावला, तर हे जग किती सुंदर बनू शकेल नाही? मग, या चतुर्थीपासूनच या उपक्रमाची श्रीगणेशा करायची का?

  • Related Posts

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    महाराष्ट्रात १८ टक्के पावसाच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली. मग गोवा नेमकी कशाची वाट पाहत आहे? केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान २ ऑक्टोबर रोजी गोव्यातील…

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    जमीन खरेदी-विक्री करणाऱ्याची चौकशी करून उपयोग नाही. त्या व्यवहाराला आवश्यक कागदपत्रे, परवानग्या किंवा प्रशासकीय मान्यता कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हेही तपासले गेले पाहिजे. गोव्यातील जमीन हडप प्रकरणांची व्याप्ती पाहता…

    You Missed

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain