मोरजीत ‘बीग डॅडी’ चा बहुमजली कॅसिनो?

आमदार जीत आरोलकरांनी थोपटले दंड

पेडणे, दि. २८ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील मोरजी गावांत गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा.लिमिटेड या हॉटेल कॅसिनो कंपनीला बहुमजली कॅसिनो हॉटेल उभारण्यास नगर नियोजन खात्याने मंजूरी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या जागेत बेकायदा बोअरवेल खोदल्याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी काम बंदचे आदेश जारी केले आहेत. आमदार जीत आरोलकर यांच्यासह मोरजीतील स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात दंड थोपटले आहेत.
पेडणेतील सर्वांत उंच इमारत ठरणार
मोरजी येथील सर्वे क्रमांक ११६/१८ आणि ३२ या सुमारे ७,९९९ चौ.मीटर जागेत या हॉटेल प्रकल्पासाठी मंजूरी दिली आहे. ही जमीन सेटलमेंट असून पूर्वीच्या ६० टक्के एफएआर वाढवून तो २०० टक्के मंजूर केला आहे. प्रस्ताव मंजूर करताना इमारतीची उंची केवळ ९ मीटर होती आणि ती नव्याने २३.९५ मीटर उंचीला मान्यता दिली आहे. या उंचीच्या सहाय्याने याठिकाणी आठ ते नऊ मजली हॉटेल इमारत उभे राहू शकते,अशी शक्यता आहे. आत्तापर्यंत पेडणेत उभ्या राहीलेल्या बांधकामांपैकी ही सर्वांत उंच इमारत ठरणार आहे. नगर नियोजन खात्याच्या मंडळाकडून हे परवाने देताना स्थानिक परिस्थिती तथा स्थानिक पंचायतीलाही विश्वासात न घेता हे परवाने दिल्यामुळे स्थानिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे. आमदार जीत आरोलकर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करून आपण स्थानिकांसोबत उभा राहणार असल्याचे म्हटले आहे. हे सगळे परवाने ताबडतोब मागे घेण्यात यावेत,असे पत्रही आमदार जीत आरोलकर यांनी नगर नियोजन खात्याला केले आहे.
मांद्रे महाशिर परिसरात वृक्षतोड
मांद्रे येथील बहुचर्चित महाशिर आस्थापन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याची तक्रार पंचायतीकडे दाखल झाल्यानंतर आज पंचायत मंडळ तथा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाहणी केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाले असून तोडलेली लाकडे त्याठिकाणी जमा करून ठेवलेली आहे. वृक्षतोडीसाठीचा परवाना कंपनीकडून मिळवलेला असला तरी या परवान्यातील अटींचे पालन झाले की नाही, याची शहनिशा करूनच कारवाई करणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
धारगळीत सनबर्न विरोधी बैठकीचे आयोजन
धारगळ गावांत सनबर्न महोत्सव साजरा करण्यासाठी पंचायतीकडे रितसर अर्ज दाखल झाला आहे. या आयोजनावरून पंचायत मंडळातच दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून आपापल्या समर्थकांमार्फत या महोत्सवाच्या समर्थनार्थ तथा विरोधार्थ बैठका सुरू केल्या आहेत. पंचायत मंडळाचा पवित्रा संशयास्पद असल्याने लोकांनीच पुढाकार घेऊन हा महोत्सव बंद करावा लागेल, या हेतूने आता धारगळीतील जागृत नागरिकांनी आज एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत धारगळवासीयांनी एकजुटीने हे अरिष्ठ गावांबाहेर हाकलून लावण्यासाठी निर्धार करण्याचा विचार असून या बैठकीत नेमके काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

  • Related Posts

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली – श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवा निमीत्त बुधवार २५ मार्च २०२६ रोजी आयोजित कुशावती नदी आरती सोहळ्यास गोवा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भक्तांची भव्य उपस्थिती लाभली.…

    You Missed

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    27/03/2026 e-paper

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण