दिगंबर कामत यांना युवा शक्तीचे आव्हान

प्रभव, चिराग, सावियोचा सर्वंत्र प्रचार संचार

राजकीय प्रतिनिधी
पणजी – माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजपात केलेल्या प्रवेशामुळे मडगाव मतदारसंघात प्रदीर्घ काळानंतर निर्माण झालेला राजकीय अवकाश भरून काढण्यासाठी चिराग दत्ता नायक, प्रभव पांडुरंग (भाई) नायक व सावियो कुतिन्हो या तरुण राजकीय नेत्यांनी नेटाने प्रयत्न चालवले आहेत. कामत यांच्या मडगावमधील तीस वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा इशारा देऊन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही आपण मडगावात लक्ष घालणार असल्याचे जाहीर केल्याने मडगाव मतदारसंघात कधी नव्हे ती राजकीय रंगत निर्माण झाली आहे.

युवा नेत्यांचा मडगावांत धडाका
कामत यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मडगावचे माजी नगराध्यक्ष व कामत यांचे राजकीय विरोधक सावियो कुतिन्हो यांनी लगेच काँग्रेसमध्ये प्रवेश करून मडगावात पक्ष विखुरणार नाही याची काळजी घेतली. विविध विषयांवर सातत्याने आवाज उठवून त्यांनी मडगावात काँग्रेसचे अस्तित्व ठळकपणे जाणवून दिले. याच दरम्यान चिराग नायक यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर करून मडगावच्या राजकीय रिंगणात उडी घेतली. कामत यांच्यापूर्वी प्रदीर्घ काळ मडगाववर अधिराज्य गाजवलेलेल माजी मंत्री स्व. बाबू नायक यांचे नातू प्रभव नायक यांनीही कामत यांच्यावर प्रखर टीका करत या राजकीय रिंगणात एंट्री घेतली.
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपण गंभीर असल्याचे स्पष्ट संकेत प्रभव नायक यांनी दिले आहेत. मडगावमधील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ते सक्रीय आहेत. फेसबुक आदी समाज माध्यमांतही सातत्याने ते झळकत आहेत. आजोबा बाबू नायक यांची व स्वतंःची छबी असलेले चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावून त्यांनी निवडणूक लढवण्याची आपली राजकीय इच्छाशक्तीच एकाप्रकारे जाहीरपणे व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीत प्रभव नायक यांनी कामत यांचा हिरीरीने प्रचार केला होता. तथापि, कामत यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला असून सध्या ते कामत यांच्यावर जवळपास दररोज शरसंधान करताना दिसत आहेत. कामत यांचे राजकीय वैरी विजय सरदेसाई यांच्याशी त्यांचे वडील पांडुरंग (भाई) नायक यांची असलेली जवळीक ही प्रभव नायक यांची जमेची बाजू मानली जात आहे.
चिराग नायक हेही मडगावात आपले अस्तित्व दाखवून देत आहेत. जनतेला लाभदायक ठरतील असे सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत.
लोकसभा निकालाने आशा पल्लवीत
कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मडगावात भाजप उमेदवाराला पाच ते सहा हजार मतांची आघाडी मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तथापि, या निवडणुकीत भाजपला मडगावात अवघी १३२३ मतांचीच आघाडी मिळाली. कामत यांचा प्रभाव असलेल्या अनेक बुथांमध्येही काँग्रेसला आघाडी मिळाली. लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या या निकालामुळे कामत यांच्या ताकदीविषयी पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कामत यांच्या मडगावच्या तटबंदीला पडलेले हे खिंडार आहे, असे त्यांच्या राजकीय विरोधकांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभव नायक, चिराग नायक व सावियो कुतिन्हो यांचे मडगावमधील राजकीय अवकाश व्यापण्याचे प्रयत्न सुरु असून कसलेले राजकारणी असा लौकीक असलेले दिगंबर कामत ही राजकीय स्थिती कशा प्रकारे हाताळतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • Related Posts

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    टीकाकारांच्या तोंडाला कायदेशीर कुलुप पणजी,दि.२१(प्रतिनिधी)- सनबर्न महोत्सवाचे आयोजक स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीकडून स्थानिक धारगळ पंचायतीचा ना हरकत दाखला. पर्यटन खात्याची तत्वतः मान्यता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून सशर्त…

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    खाते विश्वजीतांकडे, सेवावाढीची मेहरनजर मुख्यमंत्र्यांची पणजी,दि.२०(प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याचे मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांच्या सेवावाढीला नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना जबाबदार धरले जाते. परंतु प्राप्त माहितीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    23/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 23, 2024
    • 2 views
    23/12/2024 e-paper

    सिद्धीकीचा व्हिडिओ आणि अटक

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 23, 2024
    • 4 views
    सिद्धीकीचा व्हिडिओ आणि अटक

    कुंकळळीकरिणीच्या चरणी धार्मिक सलोख्याची सेवा

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 23, 2024
    • 5 views
    कुंकळळीकरिणीच्या चरणी धार्मिक सलोख्याची सेवा

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 10 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 9 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 9 views
    ऑर्डर.. ऑर्डर…
    error: Content is protected !!