बाबूश मोन्सेरात यांच्यावर मौन का?

महसूल खात्यातील कथित भ्रष्टाचार हा नवा विषय नाही. तो लोकांच्या इतका अंगवळणी पडला आहे की त्याविरोधात आवाज उठणेही कमी झाले आहे.
———————————————-

आजोशी-मंडूर कोमुनिदाद जमीन प्रकरणात सादिक दोड्डामणी यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. वास्तविक, प्रा. रामराव वाघ आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी हा विषय सर्वप्रथम उघडकीस आणला. त्यानंतर सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी प्रकरण हाती घेत सीबीआयकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणामुळे सांत आंद्रेतील राजकारणही तापले आणि आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अनेक नेते सक्रिय झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी संबंधित प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा केली. मात्र, या संपूर्ण प्रकरणात महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना कोणीच जाब का विचारला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

जमिनीशी संबंधित कूळ, मुंडकार, फेरफार आणि रूपांतराचे व्यवहार प्रामुख्याने महसूल खात्याच्या अखत्यारीत येतात. हे खाते बाबूश मोन्सेरात यांच्याकडे आहे. नगरनियोजन खात्यातील कथित गैरप्रकारांवर सातत्याने चर्चा होते; परंतु महसूल खात्यात सुरू असलेल्या प्रकारांकडे मात्र तुलनेने दुर्लक्ष केले जाते.

नगरनियोजन खाते जमिनीचा झोन बदलू शकते; परंतु प्रत्यक्ष जमीन रूपांतरासंबंधीचे अधिकार महसूल खात्याकडे आहेत. तरीही सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष महसूलमंत्री व त्यांच्या खात्याबाबत आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे धाडस कोणी का करत नाही, याबाबत अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

आजोशी प्रकरणाच्या सुनावणीवेळी तिसवाडी उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. अनेकांनी भाषणे करून जमीन व्यवहाराचा निषेध केला. मात्र, या भाषणांमध्ये महसूलमंत्र्यांवर थेट टीका झाल्याचे दिसले नाही.

कूळ-मुंडकार आणि फेरफाराची अनेक प्रकरणे महसूल कार्यालयांत वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तरीही या दिरंगाईबद्दल महसूलमंत्र्यांना जाब विचारण्यात आला नाही.

दक्षिण गोवा वकील संघटनेने फेरफार प्रकरणांतील कथित गैरप्रकार उघड केल्यानंतर सरकारला दखल घ्यावी लागली. त्यानंतर महसूल खात्याने विशेष सुनावण्या आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास सुरुवात केली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली शेकडो प्रकरणे आता एका दिवसात निकाली निघत असतील, तर ती इतकी वर्षे प्रलंबित का ठेवण्यात आली, या प्रश्नाचे उत्तरही महसूलमंत्र्यांनी द्यायला हवे.

महसूल खात्यातील कथित भ्रष्टाचार हा नवा विषय नाही. तो लोकांच्या इतका अंगवळणी पडला आहे की त्याविरोधात आवाज उठणेही कमी झाले आहे. वाहतूक, नगरनियोजन आणि पंचायत खात्यांतील गैरप्रकारांवर चर्चा होते; परंतु महसूल खात्यातील कथित भ्रष्टाचाराबाबत विशेष बोलले जात नाही.

आल्वारा जमिनींचे छुपे व्यवहार सुरू असल्याचे आरोप आहेत. काही महसूल अधिकारीच मध्यस्थाची भूमिका बजावत बिल्डरांसोबत सामंजस्य करारांद्वारे जमिनींचे व्यवहार घडवून आणत असल्याची चर्चा आहे. महसूल यंत्रणेत अधिकारी, मध्यस्थ आणि प्रभावशाली व्यक्तींची एक साखळी निर्माण झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. मात्र, या आरोपांची सखोल आणि स्वतंत्र चौकशी झाल्याचे दिसत नाही.

विविध तालुक्यांतील काही उपजिल्हाधिकाऱ्यांनी कथितरीत्या स्वतःचे ‘कलेक्शन एजंट’ ठेवले असून त्यांच्यामार्फत पैसे दिल्यानंतर कामे झटपट होत असल्याचीही चर्चा आहे. या आरोपांमध्ये तथ्य असल्यास ही बाब अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्यांची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील राजकीय संबंधांबाबत अनेकदा चर्चा होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री आणि बाबूश मोन्सेरात यांच्यात उत्तम राजकीय समन्वय असल्याचे चित्र दिसते.

महसूल खात्यातील सुमारे ९० पदे थेट खात्यामार्फत भरण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याने मोन्सेरात यांच्यावर मुख्यमंत्र्यांची विशेष मर्जी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिसवाडीतील राजकीय समीकरणांची मोठी जबाबदारी मोन्सेरात यांच्यावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना राजकीय मोकळीक दिली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

आजोशी-मंडूर जमीन प्रकरणात महसूल खात्याची भूमिका केंद्रस्थानी असताना चर्चा केवळ मुख्यमंत्री, अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांभोवती फिरत आहे. संबंधित खात्याचे मंत्री मात्र प्रश्नांच्या कक्षेबाहेर आहेत. बाबूश मोन्सेरात यांना मिळालेली ही राजकीय मोकळीक आणि त्यांच्याबाबत सर्व स्तरांवर पाळले जाणारे मौन खरोखरच आश्चर्यकारक आहे.

  • Related Posts

    भाजपचे चक्रव्यूह काँग्रेस भेदणार ?

    जनतेला बदल हवा असेल तर त्या बदलाला सक्षम राजकीय पर्याय देण्याची जबाबदारी विरोधकांची आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी केवळ नाराजी पुरेशी नाही; त्यासाठी विरोधकांमध्ये विश्वास, एकजूट आणि ठोस कृती आवश्यक आहे.…

    सरकारी कार्यालये कालबाह्य?

    जनतेनेही प्रत्येक कामासाठी आमदार-मंत्र्यांचे उंबरठे झिजवण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची भूमिका घ्यायला हवी. अन्यथा प्रशासकीय हक्कांचे रूपांतर राजकीय उपकारांत होईल आणि लोकप्रतिनिधी लोकसेवकाऐवजी व्यवस्थेचे सर्वेसर्वा बनतील. ———————————————- राज्य सरकारने प्रलंबित…

    You Missed

    सादिक दोड्डामणीची ‘वरपर्यंत’ ओळख ?

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 25, 2026
    • 10 views
    सादिक दोड्डामणीची ‘वरपर्यंत’ ओळख ?

    25/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 25, 2026
    • 16 views
    25/11/2026 e-paper

    तुका म्हणे सेटल व्हावे !

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 25, 2026
    • 15 views
    तुका म्हणे सेटल व्हावे !

    बाबूश मोन्सेरात यांच्यावर मौन का?

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 25, 2026
    • 16 views
    बाबूश मोन्सेरात यांच्यावर मौन का?

    Talak Promoting Bollywood While Ignoring Goan Cultural Heritage: Vishal Pai Cacode

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 25, 2026
    • 11 views
    Talak Promoting Bollywood While Ignoring Goan Cultural Heritage: Vishal Pai Cacode

    २०२७ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी; दिल्लीत रणनीतीवर खल!

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 24, 2026
    • 8 views
    २०२७ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी; दिल्लीत रणनीतीवर खल!