सरकारी कार्यालये कालबाह्य?

जनतेनेही प्रत्येक कामासाठी आमदार-मंत्र्यांचे उंबरठे झिजवण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची भूमिका घ्यायला हवी. अन्यथा प्रशासकीय हक्कांचे रूपांतर राजकीय उपकारांत होईल आणि लोकप्रतिनिधी लोकसेवकाऐवजी व्यवस्थेचे सर्वेसर्वा बनतील.
———————————————-

राज्य सरकारने प्रलंबित महसुली प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांचे आयोजन सुरू केले आहे. शनिवार आणि रविवारीही महसूल अधिकारी सुनावण्या घेत असून, वर्षानुवर्षे रेंगाळलेली शेकडो प्रकरणे अवघ्या एका दिवसात निकालात काढली जात आहेत. सरकारच्या या उपक्रमाचे निश्चितच स्वागत करायला हवे. मात्र, या कार्यक्षमतेमुळे एक गंभीर प्रश्नही उपस्थित होतो. *जी प्रकरणे एका दिवसात निकाली निघू शकतात, ती वर्षानुवर्षे प्रलंबित का ठेवली गेली? याचे उत्तर सरकारने जनतेला द्यायलाच हवे.

अलीकडेच प्रुडंट मीडियाने गोवा विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणातून एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली. लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या प्रमुख अपेक्षा कोणत्या, या प्रश्नावर बहुतांश नागरिकांनी सरकारी कार्यालयांतील कामे विनाविलंब व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावरून सर्वसामान्य नागरिकांना भव्य घोषणा किंवा दिखाऊ उपक्रमांपेक्षा दैनंदिन प्रशासकीय कामकाजातील सुलभता अधिक महत्त्वाची वाटते, हे स्पष्ट होते.

या सर्वेक्षणातील निरीक्षणे आणि सरकारची कार्यपद्धती यांचा परस्परसंबंध तपासण्याची गरज आहे. सरकारी कार्यालयांत कामे अडकून पडायची आणि नंतर विशेष शिबिरे, जनता दरबार किंवा ‘सरकार तुमच्या दारी’सारख्या उपक्रमांतून ती मार्गी लावायची, ही पद्धत आता रूढ होत चालली आहे. त्यामुळे प्रशासकीय अकार्यक्षमतेतून निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करून राजकीय श्रेय मिळवण्याचा हा प्रकार तर नाही ना, असा संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे.

मुळात नागरिकांना निर्धारित कालमर्यादेत सरकारी सेवा मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. निवृत्त जिल्हाधिकारी एन. डी. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रशासकीय सेवा सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. सरकारने सेवा सनद आणि कालबद्ध सेवा देण्याची व्यवस्था स्वीकारली असली, तरी तिची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रत्येक खात्याच्या सेवांसाठी कालमर्यादा निश्चित असताना नागरिकांना वारंवार हेलपाटे का मारावे लागतात? विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर किती कारवाया झाल्या, याचाही हिशेब सरकारने द्यावा.

सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे सरकारी कार्यालयांपेक्षा आमदार आणि मंत्र्यांच्या कार्यालयांचे महत्त्व वाढवण्याची प्रवृत्ती. साध्या दाखल्यासाठी किंवा परवानगीसाठीही लोकप्रतिनिधींच्या शिफारशीची गरज भासावी, ही लोकशाही व्यवस्थेची शोकांतिका आहे. नागरिकांची कामे नियमानुसार होण्यासाठी राजकीय मध्यस्थीची आवश्यकता असूच नये. अन्यथा प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी होऊन लोकप्रतिनिधींवरील वैयक्तिक अवलंबित्व वाढत जाते.

दुसरीकडे, कोट्यवधी रुपये खर्चून सरकारी उपक्रमांची जाहिरातबाजी केली जाते; परंतु सरकारी कार्यालयांच्या पायाभूत सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. राजधानीतील सरकारी कार्यालये एकत्र आणण्यासाठी प्रस्तावित प्रशासकीय संकुलाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. पणजीवरील ताण कमी करण्यासाठी विकसित झालेल्या पाटो प्लाझामध्ये व्यापारी आस्थापनांना जागा मिळते; मात्र प्रशासनासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही, हा विरोधाभास बोलका आहे.

सरकारी सेवा हा जनतेचा अधिकार आहे; लोकप्रतिनिधींनी केलेला उपकार नव्हे.* विशेष न्यायालये किंवा जनता दरबार ही कायमस्वरूपी प्रशासकीय व्यवस्थेला पर्याय ठरू शकत नाहीत. सरकारने प्रलंबित प्रकरणांची कारणमीमांसा करून जबाबदारी निश्चित करावी आणि कालबद्ध सेवा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.

जनतेनेही प्रत्येक कामासाठी आमदार-मंत्र्यांचे उंबरठे झिजवण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची भूमिका घ्यायला हवी. अन्यथा प्रशासकीय हक्कांचे रूपांतर राजकीय उपकारांत होईल आणि लोकप्रतिनिधी लोकसेवकाऐवजी व्यवस्थेचे सर्वेसर्वा बनतील. लोकशाहीत जनता सार्वभौम असते, लोकप्रतिनिधी नव्हेत; याची जाणीव सरकार आणि नागरिकांनीही ठेवली पाहिजे.

  • Related Posts

    जमीन रूपांतरणाचा खेळ

    आज निर्णय घेणारे उद्या सत्तेत असतीलच असे नाही. मात्र त्यांच्या निर्णयांचे परिणाम पुढील अनेक पिढ्यांना भोगावे लागतील. म्हणूनच आज या धोरणांना जाब विचारणे आवश्यक आहे. ——————————————— गोव्याच्या विकासाच्या नावाखाली सुरू…

    सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी

    खरे सुशासन हे धमक्या, दबावतंत्र किंवा परिपत्रकांच्या संख्येवर अवलंबून नसते. ते स्पष्ट कायदे, सुलभ प्रक्रिया, निश्चित जबाबदारी आणि निष्पक्ष अंमलबजावणीवर उभे असते. ——————————————————————————- सरकारी प्रशासन हे लोकांच्या सेवेसाठी आहे. सरकारी…

    You Missed

    दिलेश तेली याला ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 23, 2026
    • 8 views
    दिलेश तेली याला ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न

    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 23, 2026
    • 10 views
    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 23, 2026
    • 12 views
    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    सरकारी कार्यालये कालबाह्य?

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 23, 2026
    • 13 views
    सरकारी कार्यालये कालबाह्य?

    23/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 23, 2026
    • 10 views
    23/11/2026 e-paper

    Goa Government Must Protect Sailor Dilesh Teli’s Future, Frame Welfare Policy for Goans Working Abroad: Prabhav Naik

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 23, 2026
    • 20 views
    Goa Government Must Protect Sailor Dilesh Teli’s Future, Frame Welfare Policy for Goans Working Abroad: Prabhav Naik