
शासन आज चुकीच्या मार्गाने जात आहे हे नजरेसमोर ठळक दिसत असतानाही विश्वजित राणे, सुदीन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, रवी नाईक तथा देव देवतांवर सदैव श्रद्धा असणारे दिगंबर कामत यांच्यासारखे दिग्गज नेते नरो वा कुंजरवा ही भूमिका घेताना दिसतात हे आश्चर्यकारक आहे.
देवदेवता स्थलांतरीत करण्यापूर्वी, प्रथम मंदिर उभारणी हिंदू शास्त्रोक्त पद्धतीनुसार करणे आवश्यक होते. देवतांची पुन: प्रतिष्ठापना करण्यापूर्वी प्रथम मंदिर उभारणी तथा प्रारंभी देवदेवतांचे कौल घेतल्याशिवाय, मनमानी कारभार, हुकुमशाही पद्धत करून इतरत्र देवदेवतांचे स्थलांतर करणे प्रशासनाला काळिमा फासणारे ठरले आहे आणि त्यामुळे हा प्रकार निंदनीयच ठरतो.
ही भोग भूमी नसून ही योग भूमी आहे हे वाक्य प्रशंसनीय आहेच, पण गोमंतभूमी ही सर्वात प्रथम देवभूमी आहे आणि ती आम्हास वंदनीय आहे. आदरणीय स्वामीजी यांना आज सुवर्ण संधी होती संपूर्ण गोमंतकीय जनतेची मनं जिंकण्याची. या जागतिक स्तरावरील आध्यात्मिक सोहळ्यातून सरकारला त्यांनी विनंती करायला हवी होती, की श्री देव खाप्रेश्वर व देवदेवता संदर्भात सरकारने मंदिर स्थलांतरण निर्णय मागे घेऊन सुंदर सुशोभित मंदिर ज्या स्थळी होते तिथेच उभारून…..हिंदू धार्मिक सलोख्याचा आदर करावा. आदरणीय स्वामीजींचा योग्य संदेश महत्त्वाचा होता, पण स्वामीजींनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अनेकांचा मात्र भ्रमनिरासच झाला.
मुख्यमंत्री यांची मूग गिळून गप्प बसणे ही भूमिका एका मंत्र्याचे खच्चीकरण करण्यासाठी उचललेला गनिमी कावा तर नव्हे. पण देव देवतांच्या बाबतीत धार्मिक सलोख्याने उच्चपदस्थ विराजमान झालेले मुख्यमंत्री आज भाजप पक्षाच्या अधोगतीला कारण ठरू शकतात. विश्वजित राणे यांच्याबरोबर असलेले शीतयुद्ध रोहन खंवटे यांच्यावर येऊन न संपले म्हणजे मिळवले. आज रोहन खंवटे यांच्याकडे गोव्याचे भावी नेतृत्व म्हणून बघितले जाते, पण त्यांनी धार्मिक सलोखा सांभाळुन प्रसंगी सरकार विरोधी भूमिका घेऊन आपण प्रथम एक कडवट हिंदू समर्थक नंतर सर्वकाही हे सिद्ध करण्याची संधी त्यांना होती परंतु त्यांनी ती पूर्णतः गमावली.
आपण हिंदुत्ववादी विचारांचे आहोत हे सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातील काही आमदार, मंत्री जाहीरपणे इच्छा नसतानाही आपण हिंदू आहोत किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रणेते आहोत हे आपल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचा खटाटोप करतात परंतु आज जेव्हा मंदिरावर सरकारने जबरदस्तीने घाला घातला तेव्हा हे प्रणेते मूग गिळून गप्प का बसले ? दूरगामी जर विचार केला तर भविष्यात भाजपची अधोगती ह्या सर्व गोष्टीतून होत असेल तर काही नेते औपचारिकरित्या ते स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. शासन आज चुकीच्या मार्गाने जात आहे हे नजरेसमोर ठळक दिसत असतानाही विश्वजित राणे, सुदीन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, रवी नाईक तथा देव देवतांवर सदैव श्रद्धा असणारे दिगंबर कामत यांच्यासारखे दिग्गज नेते नरो वा कुंजरवा ही भूमिका घेताना दिसतात हे आश्चर्यकारक आहे.
सर्व स्तरातून आज चौफेर टीका होत असताना विकासाच्या नावाखाली जे सुरू आहे ते अत्यंत चुकीचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर चालणारे हे सरकार आज केंद्रीय नेतृत्वाच्या नावाने स्वतः वाममार्गाला लागू नये अशी जनमानसात अपेक्षा आहे.
आज या कलियुगात जनतेचे उघडपणे वस्त्रहरण सुरू असताना प्रतिष्ठित महत्त्वाचे नेते ज्यांनी एकेकाळी सत्ता उपभोगली ते नेते आज आधुनिक धृतराष्ट्राची भूमिका घेऊन गप्प आहेत. भाजपा मध्ये चांगल्या विचारसरणीचे, प्रगल्भ विचारांचे नेते मंडळी असताना सरकार नेतृत्वहीन झाले आहे, प्रशासन ढासळलेले आहे तरी सुद्धा “आ बैल मुझे मार” म्हणी नुसार राहणे याचाच अर्थ भाजप रसातळाला पोचलेले दिसेल, पण एक गोष्ट खरी की हिंदुत्व धोक्यात आहे.
– अॅड. अमित अंकुश सावंत
माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य
मांद्रे, पेडणे गोवा.