ʻमै झुकेगा नही सालाʼ !

या एक वर्षाच्या प्रवासात आपण जशी साथ दिली, तशीच ती पुढेही चालू राहिली आणि त्यात अधिक भर पडली तर नक्कीच हा ʻगांवकारीʼचा प्रयोग मुक्त, स्वतंत्र पत्रकारितेचा एक नवा मानबिंदू ठरू शकेल हे नक्की! म्हणूनच मनाशी पक्के ठरवले आहे ʻमै झुकेगा नही सालाʼ!

परिस्थितीला शरण जायचे नाही, ही शिकवण माझ्या वडिलांनीच दिली आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जायचे. ʻप्रयत्नांती परमेश्वर’ हा विचार बालपणापासूनच मनात रुजलेला असल्यामुळे पत्रकारितेच्या वाटचालीतील हा एक वर्षाचा काटेरी काळ कधी संपला हे कळले देखील नाही. आधीचा ग्रामीण पत्रकार आणि नंतर बँकेची नोकरी सोडून पूर्णवेळ पत्रकारितेत प्रवेश केल्यानंतरचा १८ वर्षांचा काळ खूपच उत्साहवर्धक ठरला. अगदी उपसंपादक म्हणून रूजू होऊन चिफ रिपोर्टर ते संपादक हा प्रवास परिश्रम आणि निव्वळ पत्रकारितेच्या ध्यासापोटी कसा सरला हे देखील कळले नाही. वृत्तपत्र (मुद्रित) व दृकश्राव्य अशा दोन्ही माध्यमांचा अनुभव गाठिशी होता आणि त्यामुळे स्वतंत्र पत्रकारितेचा मार्ग निवडताना अजिबात चिंता नव्हती. पत्रकारांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा असतात. वाचक आणि समाजाशी प्रामाणिक राहून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराच्या मागे हाच समाज उभा राहतो का, हे जाणून घ्यायचे होते आणि म्हणूनच संपादकपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसरी नोकरी स्वीकारण्यापेक्षा स्वतःचा डिजीटल पेपर आणि यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचे ठरवले. जाहिरातींसाठी हात न पसरता समाजहिताची पत्रकारिता आजच्या या व्यावहारिक जगात तग धरू शकत नाही, असा सल्ला अनेकांनी दिला; पण स्वतः अनुभव घेण्यावाचून हा समज मान्य करून घेणे मला मान्य नव्हते. १७ एप्रिल २०२४ हा रामनवमीचा मुहूर्त निवडला आणि जय श्री रामाचा जयघोष करून ʻगांवकारीʼचा पहिला डिजीटल अंक प्रसिद्ध केला. अंक एक पानी, पण प्रत्येक दिवशी अग्रलेख असावा हा विचार करून अंकाची मांडणी केली. एका अनुभवी डीटीपी सहकाऱ्याची मदत घेतली आणि डिजीटल अंकाचा हा प्रवास सुरू झाला.

हा सगळा ‘एकला चलो रे’ प्रवास असल्यामुळे दर रविवारी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. काही कारणांस्तव कामात व्यस्त राहिलो किंवा कौटुंबीक जबाबदारी आल्यामुळे काही दिवस खंड पडला; पण ३६५ दिवसांतील एका वर्षात २९० अंक प्रसिद्ध झाले, ही गोष्ट मलाच आश्चर्य वाटावी अशी ठरली. २९० अंक म्हणजे २९० अग्रलेख ही गोष्ट स्वतःचा हुरूप वाढवणारीच होती. एकीकडे अंकाची जबाबदारी आणि त्यात यूट्यूब चॅनेलसाठीचा ʻकंटेटʼ ही दुहेरी जबाबदारी पार पाडताना बरीच कसरत करावी लागली. एका वर्षात ५ हजार यूट्यूब सबस्क्रायबर्स मिळाले. हा आकडा मला स्वतःला कमी वाटतो; पण मर्यादित ʻकटेंटʼ असूनही या उपरोक्त संख्येला गवसणी ही मोठी प्राप्ती असल्याची प्रतिक्रिया डिजीटल मीडियातील मित्रांनी दिली. रोज नव्या आणि वेगळ्या बातम्या देण्याचा प्रयत्न केला. अशा बातम्या जो विषय सहसा मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे हाताळत नाहीत किंवा जाहिराती वा अन्य दबावापोटी घेऊ शकत नाहीत, असे मुद्दे पोटतिडकीने हाताळले आणि त्यामुळे या एका वर्षात अंकाच्या वेगळेपणाचे वाचकांनी मुक्तकंठाने कौतुक केले.

आता हे सगळे ठिक आहे; परंतु शाश्वततेचे काय? कौटुंबीक जबाबदारी, रोजचा खर्च आणि नोकरीतील पगाराची परतफेड झाली का, हा सवाल कायम आहे. अगदीच नाही म्हणण्याइतकी कंजुषी मी करणार नाही; पण जो काय प्रतिसाद, मदतीचा हात मित्र, हितचिंतक, वाचक आणि प्रेक्षकांनी दिला तो उत्साह द्विगुणीत करणाराच होता. त्यांचा सदैव ऋणी आहे. इथे होणाऱ्या मिळकतीची नोकरीच्या पगाराशी तुलना करणे अव्यवहार्य ठरेल; पण निराश होण्यासारखी किंवा हार मानण्यासारखी परिस्थिती निश्चितच ओढवली नाही हे सांगण्यात काही कमीपणा वाटत नाही. पूर्वी साधू-संत भिक्षा मागत किंवा माधुकरी स्वीकारत. आधुनिक माधुकरीचा भाग म्हणून वाचक आणि प्रेक्षकांना ʻमहिना शंभर रुपये फक्तʼ असे धोरण राबवले. या पत्रकारितेसाठी वाचक किंवा प्रेक्षक महिना फक्त शंभर रुपये देखील खर्च करू शकत नसतील तर माझी पत्रकारिता ही एक भ्रमच ठरावा. राज्याची लोकसंख्या सुमारे १५ लाख. त्यात १२ लाख मतदार. ज्येष्ठ, युवा, गरीब आदी सगळ्यांना सुट देऊन फक्त १० हजार जरी नागरिकांनी स्वतंत्र पत्रकारितेला प्रोत्साहन देण्याचे ठरवले तरीही हा प्रयोग एक यशस्वी प्रयोग ठरेल आणि मग केवळ परिस्थितीमुळे नोकरदारी पत्रकारितेत अडकलेले अनेक प्रामाणिक पत्रकार माझ्यासारखाच धाडसी निर्णय घेऊ शकतील आणि त्यातून एका नव्या निर्भय, मुक्त पत्रकारितेला एक वेगळा मार्ग गवसेल, या इच्छेने हा प्रयोग सुरू आहे. अर्थात महिना शंभर रुपये आणि त्यापेक्षाही अधिक मदत ʻगुगल पेʼवरून पाठवणारे शेकडो वाचक, प्रेक्षक मिळाले. निरपेक्ष भावनेतून केवळ राज्यासाठी, समाजासाठी काही तरी चांगले काम करता असे सांगून मदतीचा हात पुढे करणारे दानशूर भेटले आणि विशेष म्हणजे ʻकाहीच काळजी करू नका. कधीही गरज लागली तर हक्काने हाक मारा, आम्ही उभे राहूʼ असा विश्वास देणारी अनेक माणसे ठामपणे पाठिशी राहिल्यावर हत्तीचे बळ येणे साहजिक आहे. स्वतंत्र पत्रकारिता करत असताना आपण दोन ते तीन लोकांना महिना पगार देतो ही भावना देखील एक वेगळाच आनंद देणारी ठरली आणि त्यातून जोश, उत्साह अधिक वाढला.

गेल्या १८ वर्षांत जे शिकता आले नाही, ते या एका वर्षात शिकायला मिळाले. बराच मोठा अनुभव मिळाला. आपण प्रामाणिक असलो तर जग देखील प्रामाणिक राहाते हे देखील अनुभवता आले. कुठलीही क्रांती घडायची असेल तर काहीजणांना वेडे व्हावे लागते. ते विधायक झपाटलेपण असते. माझ्यात ते अंगभूत आहे. त्यात त्याग आलाच, परंतु त्याचा दोष इतरांना नाही. हे ऐच्छीक स्थित्यंतर समाज उन्नयनाने भारलेले आहे. त्यातून मिळणारा आनंद केवळ शब्दातीत. समाजासमोर आणि राज्यासमोर अनेक जटिल प्रश्न उभे आहेत आणि ते हाताळण्यासाठी विश्वासार्ह पत्रकारितेची गरज आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचा उल्लेख होतो. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, ही सामूहिक जबाबदारी आहे. केवळ मीच हा विचार करून चालणार नाही तर समाजानेही तसा विचार केला तर अशक्य काहीच नाही.
बारा लाख मतदार राज्याचे भवितव्य ठरवतात. त्यातील फक्त ५ ते १० हजार नागरिकांनी किंवा वाचकांनी मुक्त, निर्भय, स्वतंत्र पत्रकारितेसाठी महिना फक्त शंभर रुपये दान देण्याचे ठरवले तर त्यातून पत्रकारितेत क्रांती घडू शकते हा विचार मला पोहोचवायचा आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ जर सोबतीला मिळाले तर पत्रकारितेतून अनेक गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडता येणे शक्य आहे. प्रत्येकाला त्याच्या कामाचा योग्य मोबदला हा मिळायलाच हवा. नोकरीतून जसा पगार मिळतो, त्याच पद्धतीने समाज हितासाठी सामाजिक सहकार्यातून अर्थार्जन होऊ लागले तर निश्चितच चांगली, हुशार माणसेदेखील या ʻअग्निकुंडातʼ उडी घ्यायला तयार होतील, हा विश्वास आता पक्का झाला आहे. त्यासाठी ५ ते १० हजार वाचकांनी मनाचा निश्चय करून या उपक्रमाला साथ दिली आणि महिना फक्त शंभर रूपये या कार्याला दान दिले तर हा प्रवास निरंतर सुरू राहणे शक्य आहे. हे अशक्य नक्कीच नाही; पण मूर्त स्वरुपासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि ती वाट पाहण्याची मानसिक तयारी ठेवूनच पुढील प्रवास करण्याचे योजले आहे. या एक वर्षाच्या प्रवासात आपण जशी साथ दिली, तशीच ती पुढेही सुरू राहिली आणि त्यात अधिक भर पडली तर नक्कीच हा ʻगांवकारीʼचा प्रयोग मुक्त, स्वतंत्र पत्रकारितेचा एक नवा मानबिंदू ठरू शकेल हे नक्की! म्हणूनच मनाशी पक्के ठरवले आहे ʻमै झुकेगा नही सालाʼ!

  • Related Posts

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Bicholim, 24 May:The ongoing protest movement at Karapur against the proposed project linked to the House of Abhinandan Lodha completed 50 days, with villagers and activists reaffirming their determination to…

    “भाजप सरकारने सामान्यांचे जगणेच महाग केले; प्रत्येक दरवाढ ही सर्वसामान्य कुटुंबांवरील थेट आर्थिक मार” : अमरनाथ पणजीकर

    पणजी, गोवा गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारच्या काळात इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींचा तीव्र निषेध केला. सामान्य जनता प्रचंड…

    You Missed

    BRIEF NOTE ON ARENDAMENTO, AFORAMENTO AND CONFERMENT TITLE OF EMPHYTEUSIS OVER COMMUNITY LAND BELONGING TO COMUNIDADES OF GOA.

    BRIEF NOTE ON ARENDAMENTO, AFORAMENTO AND CONFERMENT TITLE OF EMPHYTEUSIS OVER COMMUNITY LAND BELONGING TO COMUNIDADES OF GOA.

    सिंधुदुर्ग-गोवा नातेसंबंध बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना (UBT) ची मागणी

    सिंधुदुर्ग-गोवा नातेसंबंध बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना (UBT) ची मागणी

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Goan Talent Shines Nationally

    Goan Talent Shines Nationally

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Democracy Dies When Citizens Fear to Speak

    Democracy Dies When Citizens Fear to Speak