तपासाची दिशाभूल करू नका !

या घटनेनंतर अनेकांनी रवी नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात गुंडांचा कर्दनकाळ बनवून त्यांचा बंदोबस्त लावलेली आठवण काढली. हीच खरी राजकीय नेत्याच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर प्रकरणी सर्वच सात संशयित पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. आता पोलिस त्यांच्याकडून काय जबानी नोंदवून घेतात आणि त्या जबानीवरून तपासाची दिशा काय ठरते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शुक्रवारी स्वयंस्फूर्तीनं झालेल्या आंदोलनामुळे सरकारला या घटनेची दखल घ्यावी लागली. एका सामाजिक कार्यकर्त्यावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला होतो आणि सरकार आणि पक्ष मात्र सेवा पखवाड्याच्या नावाने कार्यक्रम करत असल्याचे चित्र असंवेदनशील शासनाचीच प्रचिती देणारे ठरले. सुदैवाने मुख्यमंत्र्यांना शहाणपण सुचले आणि त्यांनी जीएमसीत जाऊन रामा काणकोणकर यांची विचारपूस करून पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले.
शुक्रवारच्या आंदोलनानंतर सर्वांच्या नजरा या मारहाण घटनेमागील मास्टरमाईंड कोण आहे, याभोवती फिरत असतानाच संध्याकाळी प्रृडंट मीडियाने एक धक्कादायक बातमी प्रसारित केली. या बातमीत रामा काणकोणकर प्रकरणी अटक झालेल्या संशयितांनी रामा यांच्याशी वैयक्तिक शत्रुत्व होते, असा दावा केला आहे. गेले सहा महिने रामा त्यांना सोशल मीडियावरून व्हिडिओ आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकून सतावत होता आणि म्हणूनच त्या रागातून त्यांनी हा हल्ला केला, अशी जबानी दिल्याचे म्हटले आहे. बातमीदार सांगतो की, सहा महिन्यांपूर्वी आगशी पोलिसांनी या सर्व संशयितांना अटक केली होती.
एकीकडे रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कुणीतरी सूत्रधार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना, या एकूण प्रकरणाला वैयक्तिक भांडणाचे रूप देण्याचा प्रयत्न अनेकांना अजिबात रुचलेला नाही. संध्याकाळी अन्य दोघा संशयितांना पकडल्याची माहिती देताना पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी या घटनेमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसल्याचे सांगितले आणि तपास सुरू असल्याचे म्हटले. मग प्रृडंट मीडियाला ही माहिती मिळाली कुठून? पोलिसांनी याबाबतीत खुलासा करणे गरजेचे आहे.
हा प्रकार वैयक्तिक भांडणातून किंवा वादातून घडल्याची शक्यता कमी आहे, असे आम्ही म्हणतो, त्याची कारणे वेगवेगळी आहेत. या सात संशयितांपैकी चार संशयित हे मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात सहभागी होते. रायबंदर येथे २०१९ मध्ये कृष्णा कुट्टीकर हल्ला प्रकरणातील दोन संशयित ह्याच यादीतील आहेत. याव्यतिरिक्त सांताक्रुझ येथे २०२१ मध्ये शुटआऊट प्रकरण घडले होते, त्यात यापैकी एकाचा समावेश होता. वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणांत सर्रासपणे या गुंडांचा सहभाग दिसत असताना, वैयक्तिक वादातून ही घटना घडली, हा युक्तिवाद किंवा जबानीचा दावा अजिबात मान्य करता येणार नाही.
पोलिसांना या घटनेच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शिष्टमंडळाने भेट घेतली, तेव्हा त्यांनीही असाच सूर आवळला होता, अशी माहिती प्राप्त होते. मुळात हे सगळे गुंड एका कुप्रसिद्ध टोळीचे सदस्य असून, या टोळीचा म्होरक्या राजकीय वर्तुळात बराच लोकप्रिय आहे. या टोळीच्या म्होरक्याला सरकारी आश्रय असल्यामुळे या घटनेची सुई त्याच्यापर्यंत जाऊ नये, याची काळजी घेण्यासाठीच चौकशीत लपाछपी होण्याची भिती आहे.
परवाच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांचा वाढदिवस होता. या घटनेनंतर अनेकांनी रवी नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात गुंडांचा कर्दनकाळ बनवून त्यांचा बंदोबस्त लावलेली आठवण काढली. हीच खरी राजकीय नेत्याच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आपल्या नेतृत्वाचा ठसा असा काही उमटवावा की भविष्यात चांगल्या गोष्टीसाठी लोक अशीच त्यांची आठवण काढतील आणि खऱ्या अर्थाने ते पावन होतील.

  • Related Posts

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    जमीन खरेदी-विक्री करणाऱ्याची चौकशी करून उपयोग नाही. त्या व्यवहाराला आवश्यक कागदपत्रे, परवानग्या किंवा प्रशासकीय मान्यता कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हेही तपासले गेले पाहिजे. गोव्यातील जमीन हडप प्रकरणांची व्याप्ती पाहता…

    इन्कलाब झिंदाबाद !

    गोव्याचा युवक आपल्या जमीन, रोजगार, पर्यावरण आणि भवितव्याबाबत निर्भयपणे सवाल करू लागला, तर त्याच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल की त्याच्या सवालांनाच समस्या मानून त्यांना दिमागी नक्षल म्हटले जाईल ? शहीद…

    You Missed

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 16 views
    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    29/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 8 views
    29/09/2026 e-paper

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 22 views
    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 28 views
    चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 16 views
    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 28, 2026
    • 19 views
    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप