मास्टरमाईंडचा फुगा फुटला ?

रामाच्या जबानीतून मास्टरमाईंडचा हा फुगा फुटला आहे असेच भासवले जात आहे. आता हा विषय कशा तऱ्हेने पुढे जाणार. मास्टरमाईंडचे कुतूहल जर संपले, तर मग रामाला पाठींबा देणारी गर्दी टीकून राहील.

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी त्याचा जबाब हाच या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरेल, असे आम्ही यापूर्वी अग्रलेखात म्हटले होते. राम “नाम” सत्य है, अर्थात रामाच्या तोंडी जे नाव येईल, तेच सत्य समजून पोलिस तपास करतील, हे तर स्पष्टच होते. अखेर रामा काणकोणकर याचा जबाब पोलिसांनी नोंदवला. मिंगेल आरावजो नामक व्यक्तीशी एका अपघातावरून त्याचे वैमनस्य निर्माण झाले होते. तो त्याच्या मागावरच होता, असे त्याने जबाबात म्हटले आहे, असे वृत्तपत्रांतील बातम्यांतून कळते.
रामा काणकोणकरने नेमका काय जबाब दिला, याबाबत पोलिसांनी अधिकृत भाष्य केलेले नाही. हा तपशील वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून झळकत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी एका स्थानिक वृत्तवाहिनीने सात संशयितांना पकडल्याच्या दिवशीच पोलिसांचा हवाला देऊन, त्यांचे आणि रामाचे व्यक्तिगत वैमनस्य होते आणि त्यातून त्यांनी हा हल्ला केला, असे म्हणून हा तपासच संपवला होता. दुसऱ्याच दिवशी जेनिटो कार्दोझो याला अटक झाली. त्याने आपणच हा हल्ला घडवून आणल्याची जबानी दिल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले.
आता रामाच्या जबानीचा दाखला देत वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. या बातम्यांचे मुख्य लक्ष्य म्हणजे ह्यात अन्य कुणीही राजकीय मास्टरमाईंड नाही, हीच गोष्ट लोकांच्या गळी उतरविण्याची धडपड सुरू आहे की काय, असा संशय येण्यासारखी ही परिस्थिती आहे.
विशेष म्हणजे, रामा काणकोणकरवर हल्ला झाल्यापासून ते आजतागायत त्याचे सहकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आदी सगळेच जण राजकीय मास्टरमाईंडला अटक व्हावी, अशी मागणी करत आहेत. काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि आपचे आमदार वेन्झी व्हीएगश यांनी तर चक्क या हल्ल्यामागे मंत्रीमंडळातील एक सदस्यच आहे, असेही जाहीर वक्तव्य केले आहे. सामाजिक कार्यकर्ते हे देखील मास्टरमाईंडच्या विषयावरून अजूनही आग्रही आहेत.
मग रामा काणकोणकरच्या जबानीबाबत जे वृत्त प्रसिद्ध झाले आहे आणि पोलिसांचा हवाला देऊन ज्या बातम्या दिल्या जात आहेत, ते पाहता प्रथमदर्शनी तरी ह्यात राजकीय मास्टरमाईंडच्या सहभागाचा काहीच संदर्भ मिळत नाही. पोलिसांनी वास्तविक रामाने दिलेल्या जबानीबाबत अधिकृत माहिती देणे अपेक्षित होते. रामाच्या जबानीबाबत जी माहिती प्रसारमाध्यमांतून बाहेर येत आहे, ती कुणाची तरी पाठराखण करणारी किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे.
मास्टरमाईंडच्या अटकेची मागणी किंवा सहभागाची शक्यता मुळीच नाही, असा आभास निर्माण करण्याचा हा खटाटोप आहे की काय, असाही संशय या घडामोडींवरून दिसून येतो.
मुळात रामा काणकोणकरची जबानी नोंदवण्यात झालेला विलंब हाच या संशयाला बळकटी मिळवून देण्यात कारणीभूत ठरला. अर्थात, रामा काणकोणकरची परिस्थिती जबानी देण्यालायक होती की नाही, हे बिचाऱ्याच रामालाच माहित. परंतु या परिस्थितीचा नेमका फायदा काहीजणांनी उठवून रामाभोवती संशयाचे वातावरण तयार करण्यात यश मिळवले.
सामाजिक कार्यकर्त्यांबाबत राजकारण्यांनी एक संशयाचे वातावरण तयार केले आहे. सामाजिक कार्यकर्ते हे राजकीय नेत्यांकडे कसे सेट असतात आणि ते वेगवेगळे विषय हाती घेऊन त्यांच्याकडून पैसे कसे उपसतात, याच्या कथा राजकीय नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सांगितल्या जातात.
रामाच्या हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण, याबाबत समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. काही राजकारण्यांची नावेही उघडपणे घेतली जात आहेत. परंतु या राजकारण्यांची ताकद ही रामा काणकोणकरला सहजपणे सेट करण्याची असल्यामुळे रामा खरोखरच सेट होणार नाही ना, अशा संशयाचे पिल्लू या लोकांनी सोडले आणि त्यातूनच या चर्चेला उधाण आले.
रामाच्या जबानीतून मास्टरमाईंडचा हा फुगा फुटला आहे असेच भासवले जात आहे. आता हा विषय कशा तऱ्हेने पुढे जाणार. मास्टरमाईंडचे कुतूहल जर संपले, तर मग रामाला पाठींबा देणारी गर्दी टीकून राहील.

  • Related Posts

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    जमीन खरेदी-विक्री करणाऱ्याची चौकशी करून उपयोग नाही. त्या व्यवहाराला आवश्यक कागदपत्रे, परवानग्या किंवा प्रशासकीय मान्यता कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हेही तपासले गेले पाहिजे. गोव्यातील जमीन हडप प्रकरणांची व्याप्ती पाहता…

    इन्कलाब झिंदाबाद !

    गोव्याचा युवक आपल्या जमीन, रोजगार, पर्यावरण आणि भवितव्याबाबत निर्भयपणे सवाल करू लागला, तर त्याच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल की त्याच्या सवालांनाच समस्या मानून त्यांना दिमागी नक्षल म्हटले जाईल ? शहीद…

    You Missed

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 16 views
    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    29/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 8 views
    29/09/2026 e-paper

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 22 views
    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 28 views
    चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 16 views
    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 28, 2026
    • 19 views
    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप