हे अरिष्ट वेळीच आवरा

हे चित्र बदलले नाही तर गोव्याचे पर्यटन अनियंत्रित बनेल आणि त्यातून स्थानिकांना मोठा फटका बसेल हे निश्चित.



आपल्या गोव्याची पर्यटन स्तरावर प्रतिमाच अशी बनलेली आहे की इथे बिनधास्तपणे जिवाचा गोवा करता येतो. पर्यटक ज्या तऱ्हेने वागतात, गैरवर्तन करतात, सरकारी कायदे व नियम धुडकावतात आणि सगळे काही करून आपले राजकीय हितसंबंध वापरून सहिसलामत सुटका करून घेतात, हे चित्र असेच सुरू राहिले तर गोंयकारांना आपल्याच भूमीत पळता भूई थोडी असेल, असे म्हणावे लागेल.
राजधानीत एका मद्यधुंद पर्यटकाने आपली कार मागे घेताना दोघांना गंभीर जखमी करण्याचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोणतीही काळजी न घेता, बेदरकारपणे व बेपर्वाईने ही कार मागे घेतली गेली आणि दोघांना धक्का बसला, त्यात एकजण गंभीर जखमी झाला. लोकांनी त्याला चोप दिला वगैरे ठीक आहे; परंतु असे वागण्याची मानसिकता मुळी कशी तयार होते, हा गंभीर प्रश्न आहे.
मागे हरमल येथे एका पर्यटकाने कुत्र्यावरून झालेल्या भांडणामुळे एका महिलेवर कार चढवून तिचा मृत्यू घडवला होता. सोशल मीडियावरून पर्यटकांचे उघड होणारे अनेक कारनामे पाहिल्यानंतर राज्यात शासन व प्रशासन काही आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. मोकळीक देण्याच्या नावाने इतके स्वातंत्र्य दिले गेले तर पर्यटकांना आवरणे कठीण बनणार आहे. मग जरा देखील मर्यादा किंवा कारवाईचा बडगा उगारला की सोशल मीडियावरून गोव्याच्या पर्यटनाची बदनामी केली जाते.
हल्ली सोशल मीडियाचा वापर गोव्याच्या पर्यटनाला धमकी देण्यासाठी होत असल्याचे जाणवत आहे. जरा कुठे शिस्तीचा बडगा उगारला की गोव्यातील सरकारी यंत्रणांकडून अडवणूक व सतावणुकीच्या नावाने शिमगा घातला जातो. गोव्याच्या पर्यटनाची ओळखच बिनधास्तपणा असल्यामुळे अशा बदनामीकारक व्हिडिओंना प्रतिसाद मिळतो आणि त्याचे परिणामही पर्यटनावर जाणवतात, हे देखील तितकेच खरे.
या परिस्थितीबाबत काहीतरी तोडगा काढण्याची गरज आहे. इथे मोटरसायकल पायलट आणि टॅक्सी हा प्रमुख स्थानिकांकडील व्यवसाय असताना रेंट-ए-कॅब आणि रेंट-ए-बाईकची सोय आपल्या आप्तस्वकियांना मिळवून देण्यासाठी जो प्रकार सुरू झाला तो अधिकच गंभीर आहे. स्थानिक रस्त्यांची व ठिकाणांची कुठलीही माहिती नसलेल्या पर्यटकांकडून ज्या तऱ्हेने वाहने चालवली जातात, ते पाहिल्यानंतर रोज प्रवास करणाऱ्या स्थानिकांची बरीच अडचण होते. अनेकवेळा हे अपघातांचे कारण ठरते.
राजधानीत तर रात्री ९ नंतर कॅसिनो व संलग्न पर्यटकांसाठी रान मोकळेच दिले जाते. कुणीही सरकारी यंत्रणा याकडे लक्ष देत नाही. राजधानीत बिनधास्तपणे नो-एंट्रीमधून वाहने चालवली जातात. त्यांचीही चूक काहीच नाही, कारण नो-एंट्री किंवा तत्सम निर्देश देणारे व्यवस्थित फलकच लावलेले नाहीत. किनारी भागांची रात्रीची अवस्था तर बघायलाच नको.
ही अशी परिस्थिती काही पर्यटक व्यवसायिकांना हवी आहे आणि त्यांचे आर्थिक गणित या अवस्थेवरच अवलंबून आहे. या लॉबीच्या दबावापोटी सरकारी यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून या गोष्टींना मोकळीक देते आणि त्यातूनच मग अनेक गुन्हेगारी किंवा पर्यटनाला बदनाम करणाऱ्या घटना घडतात. हे चित्र बदलले नाही तर गोव्याचे पर्यटन अनियंत्रित बनेल आणि त्यातून स्थानिकांना मोठा फटका बसेल हे निश्चित.

  • Related Posts

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    स्मार्ट मीटर की स्मार्ट राजकारण ?

    विरोधकांचा विरोध हा जनहितासाठी आहे की राजकीय फायद्यासाठी, हा प्रश्न विचारला जात आहे. त्याचवेळी सरकारमधील अंतर्गत स्पर्धा आणि सत्तेतील राजकारण याचाही या वादाशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. देशात गेल्या…

    You Missed

    Gomantak Bhandari Samaj Condemns Chief Secretary’s Conduct Towards St. Andre MLA Viresh Borkar

    Gomantak Bhandari Samaj Condemns Chief Secretary’s Conduct Towards St. Andre MLA Viresh Borkar

    Transport Department Directs Strict Action Against Drunken Driving by Passenger Vehicle Drivers

    Transport Department Directs Strict Action Against Drunken Driving by Passenger Vehicle Drivers

    Congress Slams BJP’s Move to Urbanise 56 Villages, Demands Immediate Withdrawal

    Congress Slams BJP’s Move to Urbanise 56 Villages, Demands Immediate Withdrawal

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    ५६ गावांच्या शहरीकरणाविरोधात रोष

    ५६ गावांच्या शहरीकरणाविरोधात रोष

    26/06/2026 e-paper

    26/06/2026 e-paper