नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन

गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित ४५ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) गोवा दालनाचे उद्घाटन माहिती आणि प्रसिद्धी संचालक अभिर हेदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ‘विकास आणि विरासत’ या संकल्पनेवर आधारित या दालनातून गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक हस्तकला, स्थानिक उत्पादने आणि राज्याच्या विकासात्मक उपक्रमांचे दर्शन घडविण्यात आले आहे.

भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेतर्फे आयोजित या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात गोव्याच्या माहिती आणि प्रसिद्धी संचालनालयाने राज्याचे स्वतंत्र दालन उभारले आहे. गोव्याची पारंपरिक वास्तुकला आणि आधुनिक विकासाची संकल्पना यांचा संगम या दालनाच्या रचनेत साधण्यात आला आहे.

दालनाच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक माहिती अधिकारी शांतो नाईक, माहिती सहाय्यक सिद्धेश सामंत, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सदाशिव पंडित, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे गौरीश गावडे, गोवा राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे प्रकल्प वैज्ञानिक दीपक परब, गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे रुपेश वेळीप आणि अरविंद नाईक उपस्थित होते.

यावेळी ‘गोवा : व्हेअर हेरिटेज मीट्स द फ्युचर, अ लेगसी प्रिझर्व्हड, अ फ्युचर ट्रान्सफॉर्म्ड’ या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पारंपरिक गोमंतकीय घराची प्रतिकृती आकर्षण

गोव्यातील मिर्ची रिपब्लिक मीडिया प्रॉडक्शन या संस्थेने दालनाची संकल्पना, रचना आणि उभारणी केली आहे. आर्यन खेडेकर आणि सन्मान केंकरे हे या संस्थेचे भागीदार आहेत. पारंपरिक कौलारू छप्पर, बाल्कनी, मातीच्या भिंती आणि गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण कावी कला यांचा वापर करून गोमंतकीय घराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

‘टाईमलेस गोवा’ विभागातून राज्याची वास्तुकला, कला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविण्यात आले आहे. तर ‘स्वयंपूर्ण गोवा’ विभागातून विविध सरकारी योजना, विकासात्मक उपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न प्रदर्शित करण्यात आले आहेत.

गोव्याच्या जीआय उत्पादनांना विशेष स्थान

दालनात गोव्याचे काजू, मयंडोळी केळी, खाजे, दोदोल, बिबिंका, कोरगुट तांदूळ, आगशीची वांगी, सात शिरांची भेंडी, खोला मिरची आणि हरमल मिरची यांसारख्या स्थानिक व जीआय मानांकनप्राप्त उत्पादनांना स्थान देण्यात आले आहे.

त्याचबरोबर नारळाच्या करवंटीपासून तयार केलेल्या वस्तू, शिंपल्यांच्या कलाकृती, टेराकोटा, दगडी दागिने, क्रोशाचे काम, हातमाग उत्पादने आणि पारंपरिक कुणबी साडी यांचेही प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या ‘गोवन’ उपक्रमातून कोकम, काजू, मसाले आणि अन्य स्थानिक उत्पादनांची माहिती दिली जात आहे.

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, पर्यटन विकास महामंडळ, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, हस्तकला विभाग आणि जैवविविधता मंडळासह विविध सरकारी संस्थांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. राज्यातील गुंतवणुकीच्या संधी आणि सरकारी उपक्रमांची माहिती अभ्यागतांना दिली जात आहे.

मेळाव्यादरम्यान गोमंतकीय कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून चितारी कला आणि अझुलेजोस टाइल पेंटिंगसारख्या उपक्रमांमध्ये अभ्यागतांना प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. गोवा दालन भारत मंडपममधील हॉल क्रमांक ३, पहिला मजला, स्टॉल क्रमांक ३एफ-०४ए येथे उभारण्यात आले आहे.

  • Related Posts

    मराठीचा अभिमान भाषणापुरता नको, व्यवहारातही दिसावा : डॉ. घनश्याम बोरकर

    ज्येष्ठ कवी डॉ. घनश्याम बोरकर यांनी प्रतिपादन केले की, मराठी भाषेचा अभिमान केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता व्यवहारातही दिसला पाहिजे. तसेच गोव्यातील मराठी आणि कोंकणी भाषिकांनी संघर्षाऐवजी परस्पर सन्मानाची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात केले.

    केळशीमधील वाळूच्या टेकड्यांच्या नाशप्रकरणी फौजदारी कारवाई करा : खासदार विरियातो फर्नांडिस

    किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यातून वाळूच्या टेकड्या जाणीवपूर्वक वगळल्याचा संशय; रिसॉर्ट मालक, कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या संभाव्य संगनमताच्या चौकशीची मागणी

    You Missed

    मराठीचा अभिमान भाषणापुरता नको, व्यवहारातही दिसावा : डॉ. घनश्याम बोरकर

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 9 views
    मराठीचा अभिमान भाषणापुरता नको, व्यवहारातही दिसावा : डॉ. घनश्याम बोरकर

    नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 6 views
    नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन

    14/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 4 views
    14/11/2026 e-paper

    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 12 views
    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    केळशीमधील वाळूच्या टेकड्यांच्या नाशप्रकरणी फौजदारी कारवाई करा : खासदार विरियातो फर्नांडिस

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 10 views
    केळशीमधील वाळूच्या टेकड्यांच्या नाशप्रकरणी फौजदारी कारवाई करा : खासदार विरियातो फर्नांडिस

    महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापणार

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 12 views
    महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापणार