हळदोणा अपक्ष उमेदवाराची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)
थिवीतील मोठ्या रोख रकमेच्या चोरीप्रकरणी सखोल चौकशीची मागणी हळदोणा जिल्हा पंचायतीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले आलवितो जोझेफ ऑगस्त डिसिल्वा यांनी केली आहे. जिल्हा पंचायतीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने या काळात एखाद्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडणे नेमके काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना सादर केलेल्या पत्रात आलवितो जोझेफ ऑगस्त डिसिल्वा यांनी ही माहिती दिली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांत थिवी, बार्देश येथे चंद्रकांत गाड यांच्या घरी अंदाजे १.५ ते १.८५ कोटी रुपयांची मोठी रोख रक्कम साठवली गेल्याचे नमूद केले आहे. या रकमेची चोरी झाल्याची तक्रार त्यांनी कोलवाळ पोलिस स्थानकात दाखल केली होती आणि त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.
आचारसंहिता काळात एवढी रोख रक्कम कशी ?
थिवी या पंचायत क्षेत्रात आचारसंहिता काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशी साठवली जाते, हा प्रश्न उपस्थित होतो. आचारसंहितेनुसार रोख रक्कम साठविण्याबाबत मर्यादा असल्याने ही रक्कम खरोखरच कायदेशीर होती की निवडणुकीसाठी वापरण्याच्या उद्देशाने साठवली गेली होती, याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे आलवितो डिसिल्वा यांनी स्पष्ट केले. या रोख रकमेच्या आधारे संपूर्ण बार्देश तालुक्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांवर मतदारांना प्रभावित केले जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले.
या पत्रात आलवितो डिसिल्वा यांनी खालील मागण्या केल्या आहेत:
• थिवी गावातील रोख रकमेचा साठा व चोरीबाबत तातडीने व सखोल चौकशी सुरू करावी, तसेच स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालांची पडताळणी करावी.
• सदर रोख रकमेचा स्रोत व उद्देश निश्चित करावा आणि ती निवडणूक प्रक्रियेत वापरली गेली आहे का, वापरली जात आहे का किंवा वापरली जाण्याची शक्यता आहे का हे तपासावे.
• संबंधित प्रकरण योग्य अंमलबजावणी यंत्रणांशी समन्वय साधून, जप्त केलेली रोख रक्कम किंवा संबंधित पुरावे कायदेशीर ताब्यात घ्यावेत, जेणेकरून निवडणूक प्रक्रियेत त्याचा गैरवापर होऊ नये.
• चौकशीचे निष्कर्ष निवडणूक आयोग व संबंधित पक्षांना पारदर्शकपणे व वेळेवर कळवावेत, जेणेकरून मतदानापूर्वी आवश्यक ती सुधारात्मक पावले उचलता येतील.
• बार्देश तालुक्यातील निवडणूक अधिकारी व स्थानिक निवडणूक यंत्रणेला मार्गदर्शन/सूचना द्याव्यात, जेणेकरून रोख रक्कम किंवा इतर मौल्यवान वस्तूंचा बेकायदेशीर वितरण किंवा प्रलोभनासाठी वापर होऊ नये.
मतदानाच्या अगदी जवळ अशा मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा साठा व चोरीची घटना ही जनतेच्या विश्वासाला धक्का देणारी असून निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेस ठोस धोका निर्माण करते. त्यामुळे या बाबीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व कायद्यानुसार आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, जेणेकरून ही रक्कम मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी वळवली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती डिसिल्वा यांनी केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आत्तापर्यंत ७ लाख रुपयांची वसूली करण्यात आली आहे. पुढील रक्कम वसूल करण्यासंबंधी महत्त्वाची माहितीही पोलिसांच्या हाती आल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे. गाड कुटुंबियांशी परिचित व्यक्तीकडूनच ही रक्कम चोरी झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.





